BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ सप्टें, २०२२

पळून जाणाऱ्या वाळूचोरांना पंढरपूर तालुक्यात दणका !

 


शोध न्यूज : सांगोला तालुक्यातून येवून पंढरपूर तालुक्यात वाळूची विक्री करणाऱ्या आणि पोलीसांना धक्काबुक्की करून पळून जाऊ पाहणाऱ्या  दोन वाळू चोरांना पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. 


वाळूचोरांचा धुमाकूळ सगळीकडेच सुरु आहे आणि त्यांची वाढती मुजोरी देखील वारंवार समोर येत आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांची हत्या करण्यापर्यंत वाळू तस्करांची मजल गेली आहे. वाळूचा बेकायदेशीर उपसा करून त्याची भरमसाठ किमतीने विक्री करायची आणि याच पैशाचा आधार घेवून गुंडगिरी पोसायची हा प्रकार गेल्या काही काळात वाढीस लागला आहे. पंढरपूर तालुक्यात देखील वाळू चोरांचा धुमाकूळ सदैव सुरु असून नुकतेच पंढरपूर तालुक्यातील काही गुंडांना आणि वाळू चोरांना हद्दपार करण्यात आले आहे. प्रशासन वाळू चोरांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांची वाळू चोरी आणि वाढती मुजोरी कमी होताना दिसत नाही. 


आज पुन्हा एकदा या वाळू चोरांची मुजोरी समोर आली असून पंढरपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न वाळू चोरांनी केला. बेकायदा वाळू विक्री करणाऱ्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. सांगोला तालुक्यातील दोन वाळू चोर पंढरपूर तालुक्यात चोरटी वाळू घेवून आले होते आणि याची विक्री केली जात असतानाच पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी तेथे हजेरी लावली. (Two sand thieves were arrested after the police clashed) आज पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे एक पिकअप वाहन चोरटी वाळू खाली करीत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी आपला मोर्चा लगेच तिकडे वळवला. 


सदरचे वाहन वाळू खाली करून निघाले असतानाच पंढरपूर ग्रामीण पोलीस सदर ठिकाणी जाऊन पोहोचले. त्यांनी वाहन थांबवून विचारपूस आणि वाळूबाबत चौकशी केली. सदरची वाळू अवैधरीत्या आणून त्याची बेकायदा विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची हालचाल करू लागले. पिकअप चालक अशोक सुखदेव शिनगारे, तुषार राजेंद्र सलगरे यांनी पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळल्या आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 


सदर पिकअप वाहनाचे चालक अशोक सुखदेव शिनगारे, तुषार राजेंद्र सलगरे या दोघानाही पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांचा पुरता 'बंदोबस्त' करण्यात आला आहे. अवैधरीत्या वाळूची वाहतूक करून शेजारच्या तालुक्यात जाऊन विक्री करण्याची मजल तर गेलीच पण पोलिसांनी हटकल्यावर त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्याचे धाडसही त्यांनी केले. यावरून वाळू चोरांचे मनोधैर्य किती उंचावले असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी मात्र त्यांची पुरती हवा काढून सरकारी खोलीतील हवा खायला पाठवले. पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे दोघे पोलिसांच्या हाती लागले आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !