BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ सप्टें, २०२२

काय झाडी.. काय डोंगार... नव्हे, आता मस्त गद्दार मटण थाळी !

 



शोध न्यूज : 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील .. ओक्के'! हे वाक्य महाराष्ट्रात गाजवलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात आता 'गद्दार मटण थाळी' मिळू लागली असून या नावाचीही आता राज्यात मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे. 


'गद्दार' हा शब्द गेल्या दोन अडीच महिन्यात राज्यात भलताच चर्चिला गेला आहे आणि आजही या शब्दाची चांगलीच चलती आहे. शिवसेनेतून फुटून चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि गद्दार या शब्दाला भलताच भाव चढला. शिवसेनेतून फुटून गेलेल्या चाळीस आमदारांना शिवसेना 'गद्दार' म्हणून संबोधित असते. बंडखोरी केलेल्या आमदारांवर हा गद्दारीचा मजबूत शिक्का शिवसेनेने मारला आहे. 'आम्ही गद्दार नाही' असे वारंवार या चाळीस आमदारांनी सांगितले असले तरी शिवसेनेकडून मात्र त्यांचा गद्दार असाच उल्लेख केला जात आहे. 


गद्दार हा शब्द कुणी उच्चारला तरी तो कुणासाठी आहे याची जाणीव आता सर्वसामान्यांना देखील होऊ लागली आहे. तसे पहिले तर हा गद्दार शब्द वाईट अर्थानेच वापरला जातो. बेईमानी करणाऱ्यासाठी या शब्दाचा वापर केला जातो. गद्दार म्हटलं की कुणालाही राग येतो. समाजात अनेक प्रकारचे गद्दार असतात पण आता गद्दार हा शब्द काही व्यक्तीविशेष साठी अधिक वापरला जात आहे. असे असले तरी सांगोला तालूक्यातील एका हॉटेलमध्ये चक्क 'गद्दार मटण थाळी' मिळू लागली आहे.  होय, हॉटेलमधील जेवणाच्या एका थाळीचा 'गद्दार' (Gaddar)  असे नाव देण्यात आले आहे.


शिवसेंनेतून फुटून चाळीस आमदार गेले तेंव्हा ते प्रथम सूरत आणि नंतरचा मुक्काम गुवाहाटी येथे केला होता आणि तेथूनच सगळी सूत्रे हलत होती. या घटनेने महाराष्ट्रात गुवाहाटीचे नाव झाले आणि नुकतेच पारनेर तालुक्यात 'हॉटेल गुवाहाटी गार्डन' चे उद्घाटन सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याच हस्ते आयोजित करण्यात आले होते. गुवाहाटी या नावामुळे या हॉटेलची राज्यात चर्चा झाली होती. विशेष म्हणजे गुवाहाटीला गेलेल्या चाळीस आमदारांत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा समावेश होता आणि तेथून झालेल्या फोनमधील 'काय झाडी, काय डोंगार.. काय हाटील' हा संवाद बहुचर्चित झाला होता तो संवाद देखील आ. शहाजीबापू पाटील यांचाच होता. आणि शहाजीबापू पाटील यांच्याच सांगोला तालुक्यात 'गद्दार मटण थाळी' मिळू लागली असल्याचे या थाळीचे नाव महाराष्ट्रात चर्चिले जाणार हे नक्कीच !


सांगोला तालुक्यातील शिरभावी येथे 'कांचन रिसोर्ट' नावाचे एक हॉटेल असून ग्रामीण भागातील हे हॉटेल वेगवेगळ्या थाळीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. या हॉटेलचे मालक समाधान सलगर यांनी आता आपल्या हॉटेलमध्ये 'गद्दार' नावाची मटण थाळी सुरु केली आहे. 'गद्दार' या शब्दाला मिळत असलेल्या प्रसिद्धीचा त्यांनी फायदा घेतला असून एका थाळीलाचा त्यांनी गद्दार हे नाव दिले आहे. (Kay zadi, kay dongar, no, Now the Gaddar Matan Thali in Sangola) साहजिकच या थाळीची चर्चा सुरु झाली आहेच पण गद्दार मंडळींचीही चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे बंडखोर आमदार शहाजीबापू यांच्या मतदारसंघातच गद्दार थालीने जन्म घेतला आहे त्यामुळे या थाळीला आणखी महत्व प्राप्त झाले आहे.


नाव फक्त गद्दार !
गद्दार हे नाव थाळीला देण्यामागे आपला अन्य कोणताही हेतू नसून केवळ थाळीला प्रसिद्धी मिळावी म्हणून आपण हे नाव दिले असल्याचे हॉटेल मालक समाधान सलगर यांनी सांगितले आहे. थाळीचे नाव गद्दार असले तरी त्यात आपण कसलीही गद्दारी करणार नाही, या थाळीत ग्राहकांना गावरान आणि उत्तम गुणवत्तेचे जेवण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 


चर्चा तर होणारच !
गद्दार हा शब्द सद्या राज्याच्या राजकारणात सतत गाजत असून अशा परिस्थितीत आणि सांगोला तालुक्यातील एक हॉटेलमधील एका थाळीला "गद्दार" हे नाव दिले असल्याने चर्चा तर होणारच ! त्यामुळे सोशल मीडियावरून गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरूही झाली आहे. आता या थाळीचे नाव राज्यभर पोहोचण्याची शक्यता आहे ! 

   
     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !