BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ सप्टें, २०२२

सप्टेंबर महिन्यात राज्याचा काही भाग पाऊस झोडपून काढणार !

 



शोध न्यूज : गणेशोत्सव सुरु होताच पावसाचे पुनरागमन झाले असून सप्टेंबर महिन्यात पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


यावर्षी जून महिन्यात पावसाने चिंता वाढवली परंतु जुलै महिन्यात त्याची भरपाई केली. जुलै आणि ऑगष्ट महिन्यात राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आणि काही भागात अतिवृष्टी झाली. यावर्षी धरणे लवकर भरली आणि नदी नाले तुडुंब भरून वाहिले आहेत. साहजिकच जमीनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. काही भागात पाउस नको म्हणण्याची वेळ आली तर राज्याच्या काही भागात अजूनही पावसाची मोठी प्रतीक्षा आहे. शेतकरी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. अतिवृष्टीमुळे राज्याच्या काही भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे तर काही भागात पाऊस नाही म्हणून पिके धोक्यात आहेत. 


आता सप्टेंबर महिना सुरु झाला असून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याच्या मार्गावर आहे. परंतु मोसमी पावसाच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्रातील अधिकाधिक भागात सरासरीपेक्षाही अधिक पाऊस या महिन्यात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. देशभरात सरासरीच्या तुलनेत १०९ टक्के पाऊस या कालावधीत होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. (Rain forecast in various parts of Maharashtra in September) पश्चिम महाराष्ट्र, कोकण, दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भ अशा काही भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भागात कमी पाउस झाला आहे आणि आजही पावसाची प्रतीक्षा आहे त्या भागांना दिलासा मिळणार आहे.


सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, उस्मानाबाद, लातूर, नाशिक, बीड, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, मुंबई, ठाणे,  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड,या जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


राज्याच्या काही भागात मागील आठवड्यापासून हवामानात बदल दिसत असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाने पुन्हा हजेरी लावलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातही काही भागात पाऊस होत आहे. राज्याच्या काही भागात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह ४ सप्टेंबर रोजी पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली असून विदर्भाच्या काही भागातही हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यात तुफान पाऊस झाला असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या इतर काही भागात देखील पाऊस होत असून आता सप्टेंबर महिन्याबाबत हवामान विभागाने अधिकाधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्र हे उत्सव पावसात भिजून चिंब होण्याची शक्यता आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !