BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ सप्टें, २०२२

चाऱ्यामधून विषबाधा होवून अकरा गाईंचा मृत्यू !

 



शोध न्यूज : लम्पीच्या प्रादुर्भावामुळे पशुपालक चिंतेत असतानाच चाऱ्यामधून विषबाधा होऊन अकरा गाईंचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे जनावरांची अधिकच काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 


लंपीचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने आणि एकेका जनावरांचा मृत्यू होऊ लागल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. प्रशासनाने लसीकरणाची मोहीम हाती घेवून पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पशुपालक मात्र धास्तावलेल्या अवस्थेत असून आपले पशुधन वाचविण्याचे एक मोठे आव्हान त्याच्यासमोर उभे आहे. त्यातच चाऱ्यामधून विषबाधा होऊन अकरा गाईंचा मृत्यू ओढविल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. यामुळे शेतकरी बांधवांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नेवासा तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी रोहिदास ढेरे यांच्या गोठ्यात ही घटना घडल्याचे दिसून आले.


रोहिदास ढेरे यांच्याकडे २९ जनावरे आहेत. गोठ्यात असलेल्या या जनावरातील अकरा गाई दोन दिवसात दगावल्या आहेत त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला असून लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. अचानक गाई दगावण्याचे कारण सुरुवातीला समजू शकले नाही परंतु वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ऑक्सलेट नावाचे विषारी द्रव्य गाईंच्या शरीरात आढळून आल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाले. या गाईना चारा म्हणून ऊस देण्यात आला होता आणि या उसात नायट्रेटचे प्रमाण आढळून आले त्यामुळे या गाईना नाइट्रिक पॉयझनिंग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जनावरांना दिलेला चारा हाच त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचे समोर आले आहे. 


अकरा गाईंचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी हादरले असून गोठ्यातील अन्य जनावरे देखील अत्यवस्थ अवस्थेत आहेत त्यामुळे त्यांचा जीव वाचविण्याचे आव्हान समोर आहे. पशुवैद्यकीय अधिकारी आणि परिसरातील डॉक्टर मिळून इतर गाईना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागले आहेत. सगळी निगा राखूनही ही घटना घडली आहे. जनावरांना चार देतानाही आता पशुपालाकास खात्री करून घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जनावरांचा चारा म्हणून बाजारातून ऊस खरेदी केला जातो, अशा ऊसावर फवारणी केलेली विविध द्रव्ये विषारी असू शकतात आणि त्यामुळे हा चार खाल्लेल्या जनावरांना धोका होण्याची शक्यता वाढते. 


शेतकरी रोहिदास ढेरे यांच्या गोठ्यातील अकरा गाईंचा मृत्यू होऊन अन्य गाई देखील अत्यवस्थ झाल्याने ढेरे यांना तर धक्का बसलाच आहे पण या घटनेने अन्य शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. (Eleven cows died due to nitric poisoning) लंपीमुळे चिंतेचे ढग असताना अशा प्रकारे गाईंचा एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू होणे ही बाब पशुपालकांसाठी चिंतेची बनली आहे.      



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !