BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ सप्टें, २०२२

शिंदे गटाकडून फोटो मार्फ करून खा. सुप्रिया सुळे यांची बदनामी !



शोध न्यूज : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मॉर्फ केलेला फोटो ट्वीट करून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी सुळे यांची बदनामी करण्याचा केलेला प्रयत्न अंगलट आला असून राष्ट्रवादीने त्यांचे पितळ उघडे केले आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसले असल्याचा एक फोटो राज्यभर चर्चेला आला होता. या फोटोवरून मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता. परंतु यावर श्रीकांत शिंदे यांनी खुलासा केला आणि हे प्रकरण हळूहळू शांत होत असतानाच शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी झालेल्या शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला एक फोटो ट्वीट केला. त्याबरोबरच राष्ट्रवादीने 'दूध का दूध, पानी का पानी' करीत हे कुभांड उघडे पाडले. मॉर्फ केलेला फोटो आणि मूळ फोटो राष्ट्रवादीने जाहीर केला त्यामुळे फोटोशी छेडछाड करून कसा खोटा फोटो तयार करण्यात आला हे उघडकीस आले.

 
शिंदे गटाच्या म्हात्रे यांनी हा खोटा फोटो व्हायरल करून खा. सुप्रिया सुळे यांची बदनामी केल्यामुळे राष्ट्रवादी अत्यंत आक्रमक झाली असून आदिती नलावडे यांनी वरळी पोलिसांच्या सायबर विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न शीतल म्हात्रे यांनी केल्याची ही तक्रार आहे. राष्ट्रवादीने मूळ फोटो आणि म्हात्रे यांनी ट्वीट केलेला खोटा फोटो शेअर करून शिंदे गटाच्या खोटेपणाचा मुखवटा फाडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या रिकाम्या असलेल्या खुर्चीवर खा. सुप्रिया सुळे यांचा दुसरीकडील फोटो लावून, खा. सुळे याच त्या खुर्चीवर बसल्या असल्याचे भासवण्यात आले आहे. खरा आणि म्हात्रे यांनी शेअर केलेला खोटा असे दोन्ही फोटो एकदम राष्ट्रवादीने शेअर केल्यामुळे खोटेपणाचा बुरखा आपोआप फाटला गेला आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मात्र अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. वरळी पोलिसात म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार तर देण्यात आलीच आहे पण अत्यंत कडक शब्दात राष्ट्रवादीच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. (Defamation of Supriya Sule by morphing the photo) बिंग फुटल्यावर मात्र शिंदे गटातील शीतल म्हात्रे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 'हा फोटो खरा असल्याचे आपण कुठेच म्हटले नाही' असा बचाव त्यांनी सुरु केला असून पोलिसातील तक्रारीबाबत कायदेशीर सल्ला घेवून पुढील निर्णय घेवू असे त्यांनी म्हटले आहे. 


मिंधे गटाला खूष करण्यासाठी !
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी अत्यंत कडक शब्दात म्हात्रे यांना सुनावले आहे, "म्हात्रे ताई, मिंधे गटाला खूष करण्यासाठी हा फोटो टाकला आहे काय ?" असा सवाल त्यांनी शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे. "गद्दारांना क्षमा नाही, गद्दार फेम शीतल म्हात्रे यांनी मिंधे गटाला खुश करण्यासाठी जाणीवपूर्वक एडीट केलेला फोटो ट्वीट करून एक महिला असूनही सुप्रिया सुळे यांची बदनामी केली आहे. अमृता फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केली तर लगेच गुन्हा दाखल होतो. आत तीच तत्परता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस दाखवतील काय ? असा सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे. 

 
    
माफी मागा अन्यथा -- !
म्हात्रे यांनी एडीट केलेला सुप्रिया सुळे यांचा फोटो पोस्ट केला आहे. खा. सुळे यांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा हेतू या फोटोतून दिसत आहे. मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, म्हात्रे यांनी माफी मागून पोस्ट डिलीट करावी अन्यथा राष्ट्रवादी कायदेशीर कारवाई करेल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !