BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ सप्टें, २०२२

पन्नास नव्हे, दोनशे खोके, सांगोल्याचे पोलीस ओक्के !

 



शोध न्यूज : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सांगोला पोलिसांनी अवैध दारूचे दोनशे दहा बॉक्समधून १४ लाखांची दारू पकडून पंढरपूर तालुक्यातील तिघांना ताब्यात घेतले आहे. 


गणेशोत्सवाच्या काळात सरकारी परवान्याची दुकानेही दोन तीन दिवस बंद ठेवली जातात परंतु चोरट्या मार्गाने ही दारू महागड्या किमतीने विकली आणि खरेदी देखील केली जाते. गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा दक्ष असून अनेकांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे तर अनेकांना  नोटीसा देण्यात आल्या आहेत. अवैध दारूवर नियंत्रण आणण्यासाठी देखील पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे आणि गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई केली आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील ... ओक्के" या संवादावरून 'पन्नास खोके, एकदम ओक्के' (Pannas khoke, ekadam ok) अशा घोषणा पावसाळी अधिवेशनावेळी विरोधी आमदारांनी दिल्या होत्या. परंतु आता सागोल्याच्या पोलिसांनी केलेली कारवाई पाहता "पन्नास नव्हे, दोनशे खोके, सांगोल्याचे पोलीस ओक्के' असे म्हणण्याची वेळ आली आहे. 


गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सांगोला पोलिसांनी सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथे मोठी कारवाई करीत अवैध दारू साठा जप्त केला. १४ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचा देशी दारूचा अवैध साठा पोलिसांनी जप्त करून पंढरपूर येथील तिघांना ताब्यात घेतले आहे. विशेष  पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेवून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारूवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस कामाला लागले आणि सांगोला पोलिसांनी अशा अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी पथके निर्माण केली होती. सांगोला पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथील अवैध दारूच्या साठ्याबाबत माहिती मिळाली. 


सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथे एका रस्त्यालगत उत्तम भगवान रणदिवे यांच्या घराशेजारी अवैध दारूचा मोठा साठा असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि त्याच्या आधारे पोलिसाचे एक पथक मध्यरात्रीच्या नंतर सदर ठिकाणी जाऊन धडकले. या ठिकाणी अवैध दारूचे २१० दहा बॉक्स आढळून आले. या अवैध दारूची किंमत १४ लाख ११ हजार २१० रुपये आहे.  पोलिसांनी या बॉक्समधून तब्बल २० हजार १६० बाटल्या जप्त केल्या. गणेशोत्सवाच्या प्रारंभीच सांगोला पोलिसांनी केलेली ही कारवाई अलीकडील काळातील मोठी कारवाई मानली जात आहे. एकाच ठिकाणी २० हजाराहून अधिक बाटल्या आढळल्याने पोलीस देखील पाहत राहिले. (Illegal liquor stock seized by Sangola police) हजारो बाटल्या एकाच ठिकाणी मिळाल्याने हा चोरटा उद्योग किती मोठा आहे याचा सहज अंदाज येवून जातो. 



पंढरपूरशी 'कनेक्शन' !   

अवैध दारूचे बॉक्स सांगोला तालुक्यात मिळाले असले तरी याचे कनेक्शन पंढरपूरशी आहे. सांगोला पोलिसांनी पंढरपूर येथील शुभम राजेश वाघमारे, किरण साधू खिलारे आणि पंढरपूर तालुक्यातील रवी अर्जुन खिलारे या तिघांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !