BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ सप्टें, २०२२

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलांसह चौघांचा बुडून मृत्यू !

 



शोध न्यूज : गणेश विसर्जनाची सगळीकडे धामधूम सुरु असताना आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून यात दोन लहान बालकांचा समावेश आहे.


दहा दिवस अत्यंत आनंदाने महाराष्ट्राने गणेशोत्सव साजरा केला आणि आज 'पुढच्या वर्षी लवकर या' अशी साद घालत गणपती बाप्पांना निरोप दिला जात आहे. गुलालाची उधळण आणि ढोल ताशांचा निनाद रस्त्यारस्त्यावर पाहायला मिळत असताना वर्धा जिल्ह्यातील मांडवा गावावर मात्र शोककळा पसरली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी कुठे ना कुठे पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. महाराष्ट्रातील दोन घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. त्यातील एक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील असून दुसरी घटना वर्धा जिल्ह्यातील आहे.

 

गणपती विसर्जनासाठी गेलेला एक लहान मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी किशोर राजू माळी या २७ वर्षे वयाच्या तरुणाने नदीच्या पाण्यात उडी घेतली. किशोरने शर्थीचे प्रयत्न करून या मुलाला वाचविले पण दुर्दैवाने किशोर याचाच बुडून मृत्यू झाला आणि अवघे जामनेर हळहळले. दुसऱ्याचा प्राण वाचविण्यासाठी गेलेल्या किशोरचाच बुडून मृत्यू झाल्याची घटना अनेकांचे डोळे ओले करून गेली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशीच किशोर आणि त्याच्या कुटुंबावर हे संकट आले. 


वर्धा  जिल्ह्यातील घटना तर अत्यंत हृदयद्रावक आहे. मांडवा येथील मोती नाल्यावर गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तिघांना येथे जलसमाधी मिळाली. कार्तिक बलवीर (वय १४), अथर्व वंजारी (वय १२) आणि संदीप चव्हाण (वय ३५) हे तिघे मोती नाला येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेले होते. दोन्ही लहान मुले ही आपल्या कुटुंबासह या नाल्यावर गेली होती पण नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले पाण्यात बुडू लागली. पाण्याखाली असलेल्या चिखलात जाऊन ही मुले फसली होती. सदर प्रकार गणेश विसर्जनासाठी गेलेल्या संदीप चव्हाण यांच्या लक्षात आला. या दोन्ही बालकांना वाचविण्यासाठी चव्हाण यांनी पाण्यात उडी मारली. त्यांनी बालकांचा शोध घेवू लागले पण ते देखील पाण्याबरोबर वाहून गेले आणि  दुर्दैवाने तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्याची वेळ आली. 


मुलांना वाचवताना संदीप चव्हाण हे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. त्यांच्यासोबत आलेली तरुणी अंजली चव्हाण हिने गावात धाव घेत याची माहिती दिली. घटना समजताच गावकरी धावत घटनास्थळी आले. पाण्यात उड्या मारून गावकऱ्यांनी शोध घेतला. यावेळी दोन बालकांचे आणि चव्हाण या तिघांचेही मृतदेह त्यांच्या हाती लागले. गणेश विसर्जनासाठी गेलेल्या या तिघांचाही असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मांडवा गाव शोकात बुडाले आहे. (Ganesh immersion, death of four including two children) मोती नाल्यावर गणेश विसर्जनासाठी परवानगी देण्यात आली नव्हती परंतु तरीही काही जण येथे विसर्जनासाठी गेले आणि ही मोठी दुर्घटना घडली.   

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !