BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० सप्टें, २०२२

सोलापूर पोलीस आणि गणेशोत्सव मंडळात वादावादी !

 



शोध न्यूज : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव मंडळ आणि पोलीस यांच्यात जोरदार वादावादी झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले परंतु नंतर वाद मिटला आणि विसर्जन मिरवणूक पुढे सरकली. 


गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांवर मोठा ताण असतो आणि गणेश भक्तांचा उत्साह देखील शिघेला पोहोचलेला असतो. विसर्जन मिरवणूक वेळेत आणि शांततेत पार पडेल यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु असतात पण गणेशभक्त मनमुराद नाचत, विविध खेळ खेळत विसर्जनासाठी जात असतात. त्यांना पोलीस पुढे ढकलत असतात पण नेमके हेच गणेश भक्तांना मान्य नसते. यातूनच पोलीस आणि गणेश मंडळे यांच्यात संघर्ष होत असतो. कर्णकर्कश आवाज हे देखील पोलीस आणि गणेशभक्त यांच्यातील वादाचे आणखी एक कारण आहे. मर्यादेपेक्षा आवाजाची पातळी अधिक झाली की पोलीस कारवाई करतात आणि येथेच संघर्षाला सुरुवात होत असते. सोलापुरात देखील अशाच प्रकाराने विसर्जन मिरवणुकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 


लष्कर गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाचा गणपती मिरवणुकीने विसर्जनासाठी निघाला तेंव्हा त्यांच्या डॉल्बीचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी कारवाई करीत डॉल्बीच्या पिना काढून घेतल्या. यामुळे उत्साहात निघालेल्या मिरवणुकीतील गणेश भक्त संतापले आणि त्यांनी विसर्जन मिरवणूक जागीच थांबवली. या गणेश मंडळाची मिरवणूक वाजत गाजत लष्कर चौकात आली तेंव्हा डॉल्बीला आवाज अत्यंत मोठा होता आणि तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस होते. बंदोबस्तासाठी असलेल्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या या पोलिसांनी गणेश मंडळाला आवाजाची पातळी कमी करण्यास सांगितले पण मंडळ त्या मनस्थितीत नव्हते. पोलीस सांगत राहिले पण आवाज जरासाही कमी होत नव्हता त्यामुळे पोलीस देखील संतापले होते. 


गणेश मंडळाला सांगून देखील ते ऐकायच्या मनस्थितीत नाहीत आणि पोलिसांनी पुन्हा पुन्हा सांगूनही ते आवाज कमी करायला तयार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनी डॉल्बीच्या पिना काढून घेतल्या आणि 'आवाज' बंद केला. मोठ्या उत्साहात निघालेल्या मिरवणुकीतील आवाज पोलिसांनी बंद केल्याने गणेश मंडळाचे कार्यकर्ते संतापले. विसर्जन मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला. मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात वादावादी सुरु झाली. अखेर गणेश मंडळाने मिरवणूक जागेवरच थांबवली आणि तेथेच ठिय्या मारला. यामुळे वातावरण अधिकच तणावाचे बनू लागले. अखेर लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे काही पदाधिकारी मध्ये पडले आणि त्यांनी गणेशभक्त आणि पोलीस यांच्यात समझौता केला. 


पोलीस आणि गणेश मंडळ यांच्यातील वाद मिटल्यानंतर गणेश विसर्जनाची मिरवणूक पुढे निघाली. कार्यकर्ते मात्र आपली नाराजी व्यक्त करीतच राहिले. (Controversy in Solapur Police and Ganeshotsav Mandal) लष्कर मध्यवर्तीच्या मिरवणुकीत आजवर कसलाही गोंधळ अथवा वाद निर्माण झालेला नव्हता, पोलिसांनी समन्वयाच्या भूमिकेतून पाहायला हवे, इतर उत्सवात पोलीस हस्तक्षेप करीत नाहीत मग गणेशोत्सवातच त्यांना हस्तक्षेप का होतो ? असा सवाल देखील संतापलेले कार्यकर्ते करीत होते. वेळीच हा वाद मिटला आणि विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली त्यामुळे अधिक तणाव निर्माण झाला नाही.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !