BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ सप्टें, २०२२

चंद्रभागेला पूर, काही लोक मात्र जिवावर उदार !

 


शोध न्यूज : भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी पंढरीतील काही नागरिक अत्यंत बेफिकीर दिसत असून जीवावर उदार असल्याचे चित्र आजही पहायला मिळाले आहे.

 
उजनी धरणातून पाणी सोडल्याने भीमा नदीला पूर आला आहे. पंढरीचा दगडी पूल पाण्याखाली गेला असून भीमा नदीवरील काही बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत. उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे प्रशासनाने अत्यंत तातडीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत आणि नदीच्या पात्रात न जाण्याचेही आवाहन केलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच भीमा नदीला यापेक्षा अधिक पूर आलेला होता. तेंव्हाही प्रशासनाने सूचना दिल्या असताना या पुरात वाहून मृत्यू झाल्याचा घटना घडल्या आहेत. आज तर गणेशोत्सवाची सांगता होत असून विसर्जन करण्याचा दिवस आहे. मूर्ती संकलनाची केंद्रे ठिकठिकाणी उभारली असून गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर पुरापासून अधिक सावधानता बाळगण्याचा दिवस आहे. 


पुराची परिस्थिती निमाण झाली असतानाही काल जुन्या दगडी पुलावरून विसर्जन करण्याचा काहींनी अत्यंत धाडसी प्रयत्न केला. मोठ्या आकाराचा गणपती घेवून जुन्या दगडी पुलावरून पाणी वाहात असतानाही आत जाऊन विसर्जन करण्यात आल्याची मोठी चर्चा पंढरपूर शहरात झाली आणि आज तर पुराचे पाणी वाढलेले असताना अनेक महिला, पुरुष पुराच्या काठावर जाण्याचे धाडस करीत होते. परगावचे काही भाविक नदीपात्रात उतरून चंद्रभागेत हात पाय धुताना दिसून आले. वास्तविक प्रशासनाने त्यांना नदीपर्यंत जाण्याची मोकळीक कशी दिली हा एक प्रश्नच आहे परंतु पुराच्या परिस्थितीत नदीत उतरणे हे धोकादायक असल्याचे माहित असूनही अनेकजण बिनधास्तपणे हा धोका पत्करताना दिसून आले. 


विसर्जनादिवशी चंद्रभागेत पूर असल्याने प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना आवाहन केले आहे परंतु पुराच्या पाण्यात म्हशी धुण्याचा उद्योग देखील बिनधास्त सुरु होता. त्यामुळे 'गणपतीला बंदी आणि म्हशींना मोकळे रान' असे चित्र पाहायला मिळत होते. अलीकडेच पंढरीतील दोन तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत तरीही अशा  प्रकारचा धोका पत्करला जात आहे. उजनी धरणातून ६० हजार क्युसेक्स पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्यामुळे आणखीही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत भीमा आणि सीना नदीच्या काठावरील गावांसाठी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पण त्याकडे दुर्लक्ष करून अनेकजण धोका पत्करताना दिसत आहेत.   


पूर परिस्थितीमुळे उद्भवणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावे, नदी, नाले, ओढ्यावरील पुलावरील गार्ड स्टोनवरून पाणी वहात असेल तर पूल ओलांडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असे आवाहन प्रशासनाने आधीच केले आहे. (Bhima river floods, but citizens are careless) नागरिकांनी नदीच्या पात्रात उतरण्याचे धाडस न करणे हेच हिताचे असून तसे करणे धोक्याचे ठरणार आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचना नागरिकांनी काटेकोर पाळल्यास पूरपरिस्थितीत दुर्घटना टाळता येणार आहे.  






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !