BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ सप्टें, २०२२

--- म्हणून त्याने चोरल्या २९ मोटार सायकल !



शोध न्यूज : आपली दुचाकी चोरीला गेली म्हणून त्याने एक नाही तर तब्बल २९ दुचाकी चोरल्या असल्याची बाब पोलीस चौकशीत उघड झाली असून या चोरांच्या टोळीत चक्क दोन शेतकरी आणि एका व्यापाऱ्याचा समावेश आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

अनेक सराईत चोर दुचाकी चोरतात आणि दुसरीकडे जाऊन त्या मोटार सायकल मिळेल त्या किमतीत विकत असतात. या चोरांचा हा पैसे कमावण्याचा उद्योगच बनलेला आहे. चोरीची दुचाकी विकताना पोलीस सापळा लावून पकडतात, गुन्हा दाखल करून अटक करतात आणि जामिनावर बाहेर आल्यावर पुन्हा दुचाकी चोरीचा धंदा सुरूच ठेवतात. सराईत गुन्हेगारात हा प्रकार दिसून येतो पण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चोरांच्या टोळीचा वेगळाच फंडा समोर आला आहे. सोलापूर येथे दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून पोलीस दुचाकी चोरांच्या पाळतीवर असतात. असाच चोरांचा शोध घेत असताना पोलिसांना एक माहिती मिळाली. एक व्यक्ती दुचाकी विकण्यासाठी बोरामणी नाका परिसरात येणार असल्याची पक्की खबर मिळताच पोलिसांनी सापळा लावला. अपेक्षेप्रमाणे काही वेळाने येथे हा व्यक्ती येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 


सदर व्यक्तीची चौकशी पोलिसांनी सुरु केली आणि त्याने आपले नाव मच्छिंद्र भागवत जाडकर (सिंदवाडा, मोडनिंब) असल्याचे सांगत दुचाकी चोरीचा गुन्हा देखील कबूल केला, एवढेच नव्हे तर त्याने आपल्या दोन साथीदारांचीही नावे सांगितली. सचिन जालिंदर चव्हाण ( महावीर पथ, मोडनिंब, ता. माढा) आणि दत्तात्रय रावसाहेब शेळके (अरण, ता. माढा) या साथीदारांच्या मदतीने त्याने अनेक दुचाकी चोरल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांचाही मुसक्या आवळल्या आणि चोरलेल्या दुचाकींचा शोध सुरु केला. या तिघांना अटक करून तपास करीत असताना तब्बल २९ दुचाकी चोरल्या असल्याचे समोर आले आणि पोलिसांनी त्यांच्याकडून या दुचाकी हस्तगत केल्या. पार्किंग केलेल्या दुचाकी हे तिघे बनावट चावीचा वापर करून दुचाकी चोरी करीत होते आणि त्याची विक्री करीत होते हे समोर आले. 


मार्केट यार्डमधून आपली दुचाकी चोरीला गेली म्हणून जाडकर याने इतरांच्या दुचाकी चोरी करण्याचा धंदाच सुरु केला. मच्छिंद्र भागवत जाडकर याची मोटार सायकल मार्केट यार्डातून चोरीला गेली होती. (Farmers and traders in a gang of two-wheeler thieves) चोरीला गेलेली आपली गाडी परत कशी मिळेल याचा विचार करण्याऐवजी त्याने अन्य दोघांच्या साथीने दुसऱ्यांच्या दुचाकी चोरायला सुरुवात केली आणि पाहता पाहता या तिघांनी तब्बल २९ दुचाकी चोरल्या. 


शेतकरी आणि व्यापारी 

माढा तालुक्यातील तिघांच्या या टोळीच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून २९ दुचाकी जप्त केल्या गेल्या पण हे दुचाकी चोर शेतकरी आणि व्यापारी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आधीपासूनचे हे कुणी सराईत चोर नव्हते तर यातील प्रमुख आरोपी मच्छिंद्र जाडकर हा व्यापारी असून सचिन चव्हाण आणि दत्तात्रय शेळके हे दोघे शेतकरी आहेत. जाडकर हा टोमॅटोचा व्यवसाय करीत होता. चोरी केलेल्या दुचाकी तो गावातच विकत होता. 


चोरीला शेताचा आधार !

मार्केट यार्डातून दुचाकी चोरी करून चोरलेल्या या दुचाकी कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी ते शेतात लपवून ठेवत होते. चोरीच्या गाड्या कुणाच्या दृष्टीस पडून नयेत यासाठी घराच्या पाठीमागील बाजूला, शेतात कणसाच्या फडात तसेच निर्जनस्थळी लपवून ठेवत होते. संधी मिळेल तसे एकेका गाडीची विक्री करीत होते. त्यांचा हा चोरीचा धंदा कुणाच्याही लक्षात येत नव्हता पण पोलिसांनी अखेर त्यांचे बिंग फोडले आणि त्यांना गजाआड जाऊन बसावे लागले ! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !