BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ सप्टें, २०२२

गरीब मजुराच्या खात्यात आले कोट्यावधी रुपये पण ---


 

शोध न्यूज : गरीब मजुराच्या बँक खात्यात अचानक कोट्यावधी रुपये आले आणि सगळीकडे आश्चर्य व्यक्त होता असतानाच खाते पुन्हा रिकामे झाल्याची आगळीवेगळी घटना घडली आहे.


गरिबाचे बँक खाते म्हणजे नावापुरतेच असते, त्यात कसली रक्कम नसते की कसला व्यवहार नसतो. कुठल्यातरी सरकारी योजनेचे पैसे येतील म्हणून हे खाते वाट पाहत बसलेले असते. एरवी या गरिबाला बँकेचा रस्ताही कधी आठवत नसतो. सकाळी उठले की कुठेतरी काम धंदा करायला जायचे आणि मिळेल त्या मजुरीवर मीठ भाकरी खायची एवढाच त्याचा दिनक्रम असतो. पण असा गरीब अचानक कोट्याधीश झाला तर काय अवस्था होईल ! एखादी लॉटरी लागल्याशिवाय हे काही शक्य नाही आणि लॉटरी अशी लागतही नाही. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यातील एका मजुराला मात्र अशी लॉटरी लागली पण हाती निराशा आली.


मांगली गावाचा गरीब राजू देवरा मेश्राम हा चाळीस वर्षाचा मजूर असाच मोलमजुरी करून जगतो. आपल्यासह आपल्या कुटुंबाचे पोट कसेबसे भरतो. रोजची खायची मारामार असताना त्याच्या बँक खात्यात तब्बल ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपये जमा झाले. कोटी म्हणजे किती हेच ज्याला माहित नाही तो अचानक कोट्याधीश झाला आणि गावकरी देखील आश्चर्यचकित झाले. राजू तर वेड्यासारखा फक्त पहात राहिला. हजार दोन हजाराच्या नोटा ज्याला व्यवस्थित मोजता येत नाहीत त्याच्या खात्यावर चक्क कोट्यावधी रुपये आले होते. या घटनेची परिसरात चर्चाही सुरु झाली.  एवढी रक्कम जमा झाल्याचा मेसेज पाहून सुरुवातीला त्याला काही समजलेच नाही. त्याने हा मेसेज गावकऱ्याना दाखवला तेंव्हा ही माहिती त्याला मिळाली. 


बँकेच्या अधिकाऱ्यांच्याही लक्षात ही बाब आली आणि बँक ऑफ इंडियच्या शाखेतून राजू मेश्राम याला फोन आला. एवढी मोठी रक्कम एका खातेदाराच्या खात्यात कुठून आणि कशी आली ? याचे कोडे बँकेलाही पडलेले होते. बँकेने फोन करून राजूकडे याची चौकशी केली. एकीकडे कोट्यावधी जमा झाले आणि दुसरीकडे बँकेकडून विचारणा होऊ लागली त्यामुळे गरीब राजू गोंधळून गेला, घाबरूनही गेला. एका सहकाऱ्याला सोबत घेवून राजू तातडीने बँकेत गेला आणि तेथील अधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी बँकेने राजूकडे चौकशी केली आणि एवढी मोठी रक्कम कुठून आली ? याची विचारणा करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या राजूने मात्र ही रक्कम आपली नाही, काहीतरी चूक झाली असेल आणि ही रक्कम आपल्या खात्यात जमा झाली असेल असे सांगितले. 


बरीच काही विचारपूस झाल्यावर बँकेची खात्री झाली आणि ही रक्कम चुकून या खात्यावर जमा झाली असल्याची कल्पना बँकेला आली. अखेर बँकेने ही रक्कम ज्या खात्यावरून वळती झाली होती त्याच खात्यावर ती परत पाठवली आणि गरीब  राजूने सुटकेचा श्वास घेतला. (Crores of rupees came into the account of the poor laborer but ---) दरम्यानच्या काळात मजुरी करीत असलेला गरीब राजू काही काळासाठी कोट्याधीश बनला होता आणि परिसरात त्याची मोठी चर्चाही झाली होती. काही काळापुरता कोट्याधीश बनलेला गरीब राजू पुन्हा गरीब झाला आणि टिकाव फावडे घेवून पुन्हा मजुरीच्या कामावर निघून गेला.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !