BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ सप्टें, २०२२

विजेच्या धक्क्याने गणेशभक्ताचा दुर्दैवी अंत !


 शोध न्यूज : गणेशोत्सवाचा आनंद ओसंडून वहात असतानाच माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे एका तरुण गणेशभक्ताचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 


गणेशोत्सवाच्या काळात थोड्याशा बेपर्वाईमुळे अशा अनेक घटना घडत असतात. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते चोरून वीज घेण्याच्या प्रयत्नात अनेकदा विजेचा धक्का लागतो आणि त्यात प्राणही जाऊ शकतो. कित्येकदा चुकीच्या पद्धतीने जोडणी करून मंडपात वीज घेतली जाते आणि अशा वेळीही धोक्याची शक्यता असते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवात विद्युत रोषणाई करताना राहून गेलेली एक चूक देखील जीवावर बेतून जाते. आनंद आणि उत्साहात या सगळ्या गोष्टी होतात परंतु यातून काही दुर्घटना घडली तर सगळ्या आनंदावर पाणी पडत असते. असाच एक प्रकार माढा तालुक्यातील टेंभुर्णी यथे घडला आहे. 


टेंभुर्णी येथे जुन्या वेशीच्या जवळ घडलेली ही घटना गणेशभक्तांना प्रचंड वेदना देवून गेली आहे. गल्लीतील एका गाळ्यात गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. शटर असलेल्या या गाळ्यात गणपतीच्या जवळ अठरा वर्षे वयाचा मोबीन अजीज आतार आणि त्याचे काही मित्र गप्पा मारत थांबलेले होते. गणेशोत्सवासाठी त्यांनी गळ्याच्या शटरच्या वरच्या बाजूने वायर ओढून आत विजेची सोय केली होती. मोबीन याने एक दोन वेळा गळ्याचे शटर वर खाली केले होते पण नंतर या शटरमध्ये विद्युत प्रवाह उतरला हे लक्षात आलेच नाही. 


मोबीन आतार याचा हात शटरला लागताच त्याला विजेचा जोराचा धक्का बसला. वरून घेतलेल्या वायरमधून विजेचा प्रवाह थेट या शटरमध्ये उतरला होता त्यामुळे त्याला जोराचा धक्का लागला आणि तो खाली पडला. एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या मोबीनला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अवघ्या अठरा वर्षाच्या गणेश भक्ताचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गणेशोत्सवाच्या आनंदावर विरझण पडले आणि शोकाकुल वातावरण निर्माण झाले. गणेशभक्त आणि नागरिकात कमालीची हळहळ व्यक्त होत आहे. 


प्रत्येकाच्या काळजाला चटका लावून गेलेली ही घटना विचारात घेवून गणेश भक्तांनी आपली आणि इतरांची काळजी घेण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखील झाली आहे. (Electric shock Death of a young Ganesha devotee) थोडीशी चूक अथवा गाफिलपणा सगळा आनंद हिरावून घेवू शकतो याची जाणीव गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाला असण्याची आवश्यकता आहे हेच या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !