BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ सप्टें, २०२२

अपत्य होत नाही म्हणून शेतकरी दांपत्याने घेतला गळफास !


 

शोध न्यूज : अनेक वर्षे झाली तरी अपत्य होत नसल्याने निराश झालेल्या पती पत्नीने गळफास घेवून आपल्याही जीवनाचा शेवट केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून यामुळे हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. 


गेल्या काही काळापासून विविध कारणाने आत्महत्या होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. नुकतेच सोलापूर जिल्ह्यात एका प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेवून जीवन संपवले असल्याची घटना समोर आली होती. विविध कारणांनी निराशा आली की तरुण तरुणी थेट टोकाचे पाउल उचलत असल्याचे दिसत असून सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातून तर धक्कादायक आणि तितकीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केवळ अपत्य नसल्यामुळे आलेल्या निराशेतून हे पाऊल उचलले गेले आहे. विज्ञान युगात देखील या घटना घडतात हे नक्कीच धक्कादायक आहे. आजच्या काळात विज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. कित्येक दांपत्यांना लवकर अपत्य होत नाही परंतु वैद्यकीय मदत घेवून त्यांना अपत्य झाल्याची अगणित उदाहरणे आहेत.


लग्न होऊन दहा वर्षे झाली तरी अपत्य होत नाही या निराशेने ग्रासलेल्या तानाजी राजपुरे आणि त्यांची पत्नी पूजा राजपुरे या दोघांनीही गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. अपत्य असावे ही प्रत्येक पतीपत्नीची इच्छा असते. काही जोडप्यांना उशिरा अपत्ये होतात तर काहीना वैद्यकीय मदत घेतल्यानंतर अपत्यप्राप्ती होते. आत्महत्या करणे हा उपाय नसला तरी निराशेचे वादळ उठले की त्यातून अविचाराने अशा घटना घडताना दिसतात. राजपुरे कुटुंबाने देखील असाच धक्कादायक निर्णय घेतला आणि गळफास घेऊन कणूर गावातील राजपुरे कुटुंबाने थेट टोकाचे पाऊल उचलले. दहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. 


विवाह होऊन दहा वर्षे उलटली तरी या जोडप्याला अपत्य नव्हते त्यामुळे ते निराशेत आणि चिंतेत होते. वैद्यकीय मदत घेतली परंतु तरीही अपत्य होत नाही याचे दु:ख त्यांना होते. अपत्यप्राप्तीसाठी या शेतकरी कुटुंबाने बरेच प्रयत्न केले तरीही यश येत नाही हे पाहून त्यांना निराशा आली होती. (A farmer couple hanged themselves for not having a child)   आणखी प्रयत्न करीत राहण्याऐवजी पती पत्नी हे दोघेही मनाने खचून गेले आणि त्यामुळे त्यांची निराशा अधिकच वाढली. अखेर त्यांनी टोकाचा विचार केला आणि थेट आपले आयुष्य संपवले. या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. तानाजी राजपुरे यांचे वय ४० तर त्यांची पत्नी पूजा राजपुरेचे वय ३६ वर्षांचे होते. 


हल्लीच्या काळात मुलेच आपल्या आई वडिलांच्या जीवावर उठलेली पाहायला मिळतात. ज्यांना वाढवले, सक्षम बनवले तेच आपल्या जन्मदात्यांचे खून करीत असल्याच्या अनेक घटना समाजात घडत आहेत. आई वडिलांना केवळ दु:ख देण्याचेच काम काही कुपुत्र करीत असतात,  आई वडील मात्र मुलासाठी आपल्या जीवनाचा त्याग करतात अशी विसंगती देखील आजच्या काळात दिसू लागली आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !