BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ सप्टें, २०२२

पंढरपूर तालुक्यातील गावकऱ्यांचा अवैध व्यवसायाला विरोध !

 


शोध न्यूज : गावातील अवैध दारूच्या विरोधात पंढरपूर तालुक्यात जागृती होऊ लागली असून आणखी एका गावाने गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे, आता याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. गावकरी मागणी करतात पण पुढे काहीच होत नाही असेही अनुभव आहेत.


बेकायदा हातभट्टी दारूचा गावागावात सुळसुळाट असून चोरट्या मार्गाने देशी विदेशी देखील मिळत असते. विविध सरकारने अनेकदा घोषणा केल्या, काही मोहिमा राबविल्या परंतु हातभट्टीच्या दारूवर अद्याप तरी कसले नियंत्रण आले नाही. गावागावात एक वेळ पिण्याचे पाणी मिळणार नाही पण हातभट्टी दारूची कधीही टंचाई निर्माण होत नाही. या दारूमुळे घरातातील महिला वैतागून गेलेल्या असतात तर गावातील भांडण तंटे या दारूच्या प्रभावाने होत असल्याचेही दिसून येत असते. हे तळीराम गावात कुठल्याही रस्त्यावर आढळून येतात आणि गावातील महिलांना यांचा उपद्रव सहन करावा लागतो.रस्त्यावर उभे राहून जोराने आरडाओरडा करणे, कुणाला तरी शिवीगाळ करणे असे प्रकार गावागावात पाहायला मिळतात. यातूनच पुढे भांडण तंटे होण्याची वेळ येते.


पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात असेच चित्र असून आता गावकरीच याविरोधात उभे राहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे ग्रामसभेत अवैध दारूचा विषय प्रकर्षाने पुढे आला आणि गावाच्या हद्दीतील अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवस लोटले परंतु अद्याप तरी अवैध व्यवसाय बंद झालेले दिसत नाहीत. पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथे देखील संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. आता प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होतेय याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले असून पोलीस प्रशासन कितपत प्रतिसाद देतेय यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. पंढरपूर तालुक्यातील एकेका गावात अवैध दारूबाबत जागरुकता येऊ लागली असून प्रत्यक्ष परिणाम दिसू लागल्यास आणखीही गावे पुढे येण्याची शक्यता आहे. 


पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेवून गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे सरपंच सज्जन लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत गावातील अवैध दारूबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. गावात संपूर्ण दारूबंदी व्हावी हा विषय ग्रामसभेत गाजला. गावात खुलेआम दारू विक्री होत असल्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन बनले आहेत, अनेक घरात भांडणे होत आहेत. या सर्व प्रकाराला ग्रामस्थ वैतागले होते. 


यापूर्वीही गावात संपूर्ण दारू बंदी करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला होता, मात्र तरीही गावात खुलेआम दारू विक्री सुरूच होती. आताही नव्याने दारू बंदीचा ठराव करण्यात आला असून पोलिस प्रशासनाकडून या ठरावाची कशा प्रकारे अमंलबजावणी होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.  उपसरपंच छाया पवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखे, सोसायटीचे माजी चेअरमन अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य शहाजी जमदाडे, पोलिस पाटील नंदिनी गवळी, माजी उपसरपंच सिध्देश्वर पवार, सुरेश पवार, बंडू पवार, संतोष पवार, ग्रामसेवक व्ही. बी. गायकवाड, कृषी अधिकारी श्री. गुंड, वैद्यकीय अधिकारी  गवळी, विकास पवार या ग्रामसभेसाठी बालाजी पवार, तानाजी पवार,  सज्जन पवार, पप्पू साळुंखे, गणेश पाटील, राजकुमार जमदाडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अवैध व्यवसाय बंद व्हावेत यासाठी ग्रामस्थांना ग्रामसभेत मागणी करण्याची वेळ येवू लागली आहे. गावकरी कितीही त्रस्त होत असले तरी गावागावात हातभट्टीचा महापूर सुरूच असतो. तक्रारी वाढल्या की काही दिवसांपुरते हे अवैध व्यवसाय बंद होतात आणि पुन्हा 'पहिले पाढे पंचावन्न' सुरु होतात. त्यामुळे लोक तक्रारी करण्याच्याही फंदात पडत नाहीत. (Demand to stop illegal liquor in Pandharpur taluka) आता संपूर्ण गाव एकत्र येवून ही मागणी करू लागल्यामुळे पोलीस प्रशासन नेमका किती प्रतिसाद देतेय यावर गावातील दारूबंदी अवलंबून असणार आहे. गावकरी आता हीच प्रतीक्षा करू लागले असून टाकळी येथील अवैध व्यवसाय देखील कधी बंद होणार आहेत याचीही प्रतीक्षा आहेच. 


   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !