BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० सप्टें, २०२२

'बारामती'चा नाद करू नका, दगडावर डोकं आपटेल !

 


शोध  न्यूज : 'बारामतीचा नादाला लागू नये, दगडावर डोके आपटेल' असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्ष आणि भाजप नेत्यांना दिला आहे. एक प्रकारे भाजपच्या नेत्यांच्या विधानांची खिल्लीच त्यांनी उडवली आहे. 


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'मिशन बारामती' हाती घेतली असून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य काही नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येण्याबाबत वक्तव्य केले आहे. याचा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी देखील आपल्या शेलक्या भाषेत भाजपाला सुनावलेले आहे शिवाय भाजपच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली गेली आहे. 'बारामतीचा पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करू' अशा प्रकारची वक्तव्ये भाजप नेत्यांकडून नुकतीच करण्यात आली आहेत. अनेक नेत्यांनी या विधानांना हास्यास्पद म्हणून किरकोळ लेखले आहे तर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार फटकारले आहे.


'भारतीय जनता पक्षाने बारामतीच्या नादाला लागू नये, दगडावर डोके आपटण्यासारखे हे आहे. शिवाय वेळ आणि उर्जा यांचाही हा अपव्यय आहे त्यामुळे ती शक्ती आणि वेळ दुसऱ्या कुठे तरी खर्च करावी, उगी भलत्या सलत्या ठिकाणी कुठं जायला लागला आहात?' असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. (Leave the subject of Baramati; Chhagan Bhujbal criticizes BJP) आपल्या उंचीचा तरी विचार करावा, तुमची उंची किती? त्यांची उंची किती आहे याचा तरी विचार करावा आणि मग डोके आपटावे ! अशी खिल्ली देखील छगन भुजबळ यांनी उडवली आहे.


विद्यमान सरकारबद्धल बोलताना त्यांनी टीका केली आहे. हे सरकार नुसत्या घोषणा करीत आहे, त्याच्यापलीकडेही जाऊन लवकर निर्णय घ्यावेत आणि जनतेचे प्रश्न सोडवावेत. गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाहीत तर हे सरकारच विघ्नहर्ता आहे अशी जाहिरातच त्यांनी केली आहे. नवे सरकार आले आणि हिंदू सणावरील विघ्न कमी झाले असे हे म्हणू लागले आहेत त्यामुळे विघ्नहर्ता गणपतीऐवजी आता हेच विघ्नहर्ते झाले आहेत, राज्यावर अनेक विघ्ने आहेत. या शासनाने ती दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत.    


नुकतेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शेलक्या शब्दात आणि आपल्या शैलीत या विषयावर भाष्य केले होते. "बारामतीला धडाका मारून काय होणार आहे का ? मागं असंच मागच्या इलेक्शनला कुणाला तरी उभं केलं, म्हणलं रहा बाबा, मी कुठलंही इलेक्शन असलं तरी समोरचा माणूस ताकदवान आहे असे समजूनच इलेक्शनला उतरतो. ते ताकदवान आहे म्हणून उतरलो, त्याज्यासकट सगळ्यांची डिपॉजिटच गेली ! मला काहींनी विचारलं, अहो, हे येणार आहेत, ते येणार आहेत ! म्हटलं, येऊ दे म्हटलं, तुमच्या का पोटात दुखतंय ? आम्ही त्यांचं स्वागत करू, त्यांचा अधिकार आहे !"  असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !