BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ सप्टें, २०२२

चेअरमन कल्याणराव काळे शिंदे गटाच्या वाटेवर ?




शोध न्यूज : पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून 'सहकार शिरोमणी' चे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या कथित पक्षांतराची मोठी चर्चा सुरु झाली आहे. 


राज्याच्या राजकारणात पक्षांतर आणि गटबाजी याचाच गोंधळ गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु आहे. सद्या कोण कधी आणि कुठल्या पक्षात अथवा गटात जाईल आणि गेले तरी परत कधी येईल याचा काहीच भरवसा राहिला नाही. या 'उड्यामारू' राजकारणाची मात्र राज्यभर चर्चा असून पक्ष निष्ठा, मतदारांनी टाकलेला विश्वास अशा कुठल्याच गोष्टीला काही अर्थ उरला नाही हे देखील यातून दिसून येवू लागले आहे. मुंबईपासून गाव पातळीपर्यंत सद्या पक्षांतर वाजत गाजत असताना पंढरपूर तालुक्यात देखील अशीच चर्चा सुरु झाली आहे आणि प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे अंदाज बांधताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्याबाबत जोरदार चर्चा पंढरपूर तालुक्यात सुरु आहे. 


कारखान्याच्या अडचणीमुळे कल्याणराव काळे यांनी यापूर्वी देखील पक्षांतर केलेले आहे. शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षातून त्यांचा प्रवास झाला आहे आणि आता शिंदे गटात दाखल होतात की काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. शिंदे गटातील आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे नुकतेच पंढरपूर दौऱ्यावर आले होते तेंव्हा कल्याणराव काळे यांनी त्यांची भेट घेतली आणि हाच विषय तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला आहे. अगदी अलीकडेच म्हणजे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोट निवडणुकीवेळी कल्याणराव काळे यांनी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु त्यांनी शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांची आवर्जून भेट घेतली त्यामुळे पक्षांतराच्या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत.


व्यक्तिगत राजकारणापेक्षा कारखान्याचे हित महत्वाचे आहे म्हणत त्यांचा विविध पक्षातून प्रवास झाला आहे आणि त्यांच्या या पक्षांतराचा त्या त्या वेळी कारखान्याला फायदा झाला आहे. भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून त्यांच्या कारखान्यास थकहमी देण्यात आली होती. त्यानंतर अगदी अलीकडेच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत बरेच काही घडू लागले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या बदलाची देखील चर्चा सुरु झाली होती त्यावेळी या पदासाठी कल्याणराव काळे यांचे नाव समोर येत होते. पक्षपातळीवर कल्याणराव काळे यांचे वजन असले तरी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीतील दुफळी त्यांच्यासाठीही अडचणीची ठरत आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांच्याशी असलेला त्यांचा वाद सर्वश्रुत आहे शिवाय विधानसभा पोट निवडणुकीत देखील राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद ठळकपणे दिसून आला होता. 


सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे हे शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांना भेटले असल्याचे जाहीर आहे, तशी ही भेट काही गुप्तपणे झाली नाही. कदाचित साखर कारखान्याच्या काही अडचणीबाबत देखील ही भेट असू शकते परंतु या भेटीला पक्षांतराचे स्वरूप दिले जात असून कल्याणराव काळे हे शिंदे गटात प्रवेश करतात की काय ? (Chairman Kalyanrao Kale on the way to the Shinde group) अशी नवी चर्चा उफाळून आली असून पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात या चर्चेनेही खळबळ उडवून दिली आहे. कल्याणराव काळे हे कारखान्याच्या हितासाठी शिंदे गटात प्रवेश करू शकतात असाही कयास काही मंडळी लावताना दिसत आहे. 


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !