BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ सप्टें, २०२२

लाचखोर महावितरण अभियंता रंगेहात सापडला !



शोध न्यूज : विजेच्या बिलाची आकारणी न करण्यासाठी महावितरण अभियंता शेतकऱ्याकडून पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहात सापडल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडली असून यामुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे.


लाचखोरीत पोलीस, महसूल हे विभाग नेहमीच चर्चेत असतात परंतु अलीकडे महावितरण देखील लाचखोरीबाबत चर्चेला येऊ लागले असून आजवर काही अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. आता पुन्हा सोलापूर जिल्ह्यात अशी एक कारवाई झाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात महावितरण अभियंता अडकला आहे. एका शेतकऱ्याला लाच मागून ती स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि  लाचखोर अभियंत्याच्या यादीत आणखी एकाची भर पडली आहे. शेतकऱ्याने वीज वापर केला असतानाही त्याला बिल न आकारण्यासाठी ही लाचेची मागणी झाली होती. म्हणजे महावितरणच्या या कनिष्ठ अभियंत्याने महावितरणलाही चुना लावण्याचा प्रयत्न केला आहे. 


माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे एका शेतकऱ्याच्या शेतात स्वतंत्र आणि वयक्तिक डीपी बसविण्यात आला होता. २५ मार्च २०२२ रोजी महावितरणच्या सदाशिवनगर शाखा कार्यालयाकडून चार्जिंगसाठी परवानगी देण्यात आली आणि तेंव्हापासून सदर डीपी सुरु झाला होता. डीपी सुरु झालेला असतानाही त्यावर मीटर मात्र बसविलाच गेला नाही त्यामुळे संबंधित शेतकऱ्यास कुठल्याही प्रकारे विद्युत बिल आले नाही. महावितरणचे कनिष्ठ अभियंता सुमित गुलाबराव साबळे यांनी त्यांना नवीन मीटर बसविण्यास सांगितले. मीटर बसविल्यानंतर स्वतंत्र विद्युत बिल येईल. डीपी सुरु केल्यापासून आजवरचे कसलेही बिल न आकारण्यासाठी साबळे यांनी शेतकऱ्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम देणे अमान्य असल्याने संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली.

 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर त्यांनी सापळा लावला. महावितरण अभियंता सुमित साबळे हा शेतकऱ्याकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना या सापळ्यात रंगेहात अडकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सोलापूरचे पोलीस उप अधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली आहे. (A bribe-taking Mahavitaran engineer was found red-handed) लाच घेताना रंगेहात सापडतच अभियंता साबळे यांना ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.  या कारवाईमुळे सोलापूर जिल्हा महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !