BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ सप्टें, २०२२

लाचखोर पोलीस उपनिरीक्षकास पाच वर्षांचा कारावास !

 


शोध न्यूज : फुकटच्या पैशाचा मोह भलताच महागात पडला असून सोलापूरच्या एका पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.


सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या लाचखोरीचे प्रमाण अलीकडे प्रचंड वाढलेले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सतत लाचखोराना सापळ्यात पकडून त्यांच्यावर कारवाई करीत आहे. विविध सरकारी विभागातील साहेबापासून शिपायापर्यंत अनेकजण लाच घेताना सापडत आहेत. लोक देखील जागरूक झाले असून कुणी लाच मागितली तर थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून धडा शिकवतात तरी देखील लाच घेण्याचे प्रकार नियंत्रणात आलेले दिसत नाहीत. लाच घेताना पकडलेल्या लोकसेवकाला न्यायालयात शिक्षा झाल्याची उदाहरणे फारशी प्रकाशात येत नाहीत. जामीन झाला की काही दिवसात पुन्हा नोकरीवर हजर होता येते त्यामुळे या अटकेची देखील फारशी दहशत उरत नाही पण एका लाचखोर पोलीस उपनिरीक्षकास न्यायालयाने तब्बल पाच वर्षांची शिक्षा ठोठावल्याने मात्र लाचाखोरानी धसका घेतला आहे. 


लाचखोरीत पोलीस आणि महसूल खात्यातील अधिक प्रकरणे समोर येतात. सोलापुरात न्यायालयाच्या आदेशानुसार नॉमिनल अटक करून जामिनावर सोडतो आणि तपासात मदत करतो असे सांगून पोलीस उप निरीक्षक सर्जेराव शिंदे याने आरोपीकडे वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. सचिन गैबू जाधव आणि अन्य पाच आरोपीवर सोलापूर रेल्वे पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक सर्जेराव सखाराम शिंदे याच्याकडे होता. न्यायालयीन आदेशानुसार आरोपीस नॉमिनल अटक करून जामिनावर सोडतो आणि पुढील तपास कामात देखील मदत करतो परंतु त्यासाठी वीस हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे याने आरोपींकडे केली होती. 


आरोपी तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून लाचेच्या मागणीबाबत तक्रार दिली. संबंधित विभागाने याची पडताळणी करून सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर शिंदे याला पकडण्यासाठी सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उप निरीक्षक सर्जेराव शिंदे हा या सापळ्यात रंगेहात अडकला. त्यामुळे त्याच्यावर सोलापूर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक लाच प्रकरणी पकडला गेल्याने खळबळ उडाली होती आणि रेल्वे विभागात देखील याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. वीस हजार रुपयासाठी पोलीस उप निरीक्षक दर्जाचा अधिकारी भलताच गोत्यात आला होता. 


लाच प्रकरणी सदर पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव शिंदे याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. या सुनावणीत सरकार पक्षाच्या वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले. (Five years imprisonment for bribe-taking sub-inspector of police) पोलीस उप निरीक्षक सर्जेराव शिंदे याच्याविरोधात लाच मागितली आणि ती स्वीकारली असल्याचा गुन्हा सिद्ध झाला त्यामुळे त्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने पोलीस दलात खळबळ उडाली असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.  

   

  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !