BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ सप्टें, २०२२

आमदारांनी धमकावल्याचा डॉक्टरांचा आरोप !


शोध न्यूज : भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्याला धमकावले असल्याचा मोठा आरोप अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप आडके यांनी केला असल्याने सोलापूर जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.  




आमदारांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना धमकावले, फोनवरून आक्षेपार्ह शब्द वापरले याबाबत नेहमीच बातम्या येत असतात. काही आमदारांचे फोनवरील संवाद सोशल मीडियावरून व्हायरल देखील होत असतात तर व्हिडीओ प्रसार माध्यमातून पाहायला मिळत असतात पण सोलापूर जिल्ह्याबाबत अशा प्रकारच्या तक्रारी सहसा समोर आलेल्या नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याबाबत मात्र अशी एक तक्रार पुढे आली असून ती एका डॉक्टरांनीच केली आहे त्यामुळे या तक्रारीला वेगळे महत्व दिले जात आहे. 

भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर भाजपने आणखी एक जबाबदारी दिली असून नुकतेच ते भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष झाले आहेत. या नव्या पदामुळे त्यांचे अभिनंदन केले जात असताना सोलापूर विचार मंचाचे सदस्य असलेले अस्थिरोग तज्ञ डॉ संदीप आडके यांनी आ. कल्याणशेट्टी यांच्यावर मोठे आरोप करून तक्रार केली आहे. एकीकडे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात शिवसेनेने रान उठवले असताना आता सोलापूर जिल्ह्यातीलच आणखी एका आमदारांची चर्चा सुरु झाली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मात्र आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि यात काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. 

सोलापूर येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप आडके हे सोलापूर येथील विमानसेवा पूर्ववत सुरु व्हावी यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी हा विषय अधिवेशनात उपस्थित करावा अशी विनंतीही त्यांनी जिल्ह्यातील आमदारांना केली होती. याच विषयावर आमदार कल्याणशेट्टी (Mla Sachin Kalyanshetti) यांनी आपल्याला व्हॉट्स एप कॉलच्या माध्यमातून अरेरावी केल्याचे आणि धमकावल्याचा आरोप डॉ. आडके यांनी केला आहे. डॉ. आडके यांनी याबाबत पोलीस महासंचालक यांच्यासह भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे देखील तक्रार केली आहे.  

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीच डॉ. आडके यांनी केली असून त्यांनी याबाबत एक ई मेल पोलीस महासंचालक यांना पाठवला आहे. (BJP MLA Sachin Kalyanshetty threatens doctors) याबरोबरच भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे केली असल्याची माहिती डॉक्टर संदीप आडके यांनी दिली आहे.   


आरोप फेटाळले !

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मात्र डॉक्टरांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. डॉ. आडके यांच्याशी आपला परिचय देखील नाही, एक मेसेज त्यांनी मला पाठवला होता त्याबाबत आमच्यात बोलणे झाले आहे पण मी कसलीही चुकीची भाषा त्यांना वापरलेली नाही. आपण अत्यंत संयमाने काम करणारी व्यक्ती आहोत असे आमदार कल्याणशेट्टी यांनी म्हटले आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !