शोध न्यूज : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या गाडीला उर्से टोल नाक्यावर अपघात झाला असून सुदैवाने कुणालाच काही दुखापत झालेली नाही.
मुंबई - पुणे एक्स्प्रेस हायवेवर सतत अपघात होत असून अलीकडे तर या अपघातात वाढ झाली असल्याने चिंता व्यक्त होत आहे. या मार्गावरील अपघात थांबविण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची गरज व्यक्त होत असून महाराष्ट्रातील कलाकार, नेते यांच्यासह सामान्य प्रवाशांचा बळी या मार्गावर गेला आहे. उर्से टोलनाका येथे काल रात्री आमदार नितेश राणे यांच्या गाडीला अपघात झाला असून सुदैवाने हा अपघात किरकोळ स्वरूपाचा असल्यामुळे गाडीतील कुणालाही काही दुखापत झाली नाही. राणे कुटुंब पुण्याच्या दिशेने निघाले होते परंतु या गाडीत आमदार नितेश राणे नव्हते. (MLA Nitesh Rane's car met with an accident) नितेश राणे यांच्या पत्नी, मुले आणि नातेवाईक या गाडीतून प्रवास करीत असताना हा अपघात झाला आहे.
उर्से टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी नितेश राणे यांची गाडी थांबलेली असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने राणे कुटुंबीय असलेल्या गाडीला धडक दिली. पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने गाडीच्या मागच्या बाजूचा इंडिकेटर फुटला असून गाडीला थोडा मार लागला आहे परंतु गाडीत बसलेल्या कुणालाही इजा झालेली नाही. राणे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती राणे यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस उर्से नाक्यावर पोहोचले आणि त्यांनी संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतले. अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण समोर आले नसून ट्रकचे ब्रेक फेल झाले होते की आणखी दुसरे काही कारण होते याचा शोध घेतला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेल्या नितेश राणे यांच्या गाडीला अपघात झाला असल्याने या अपघाताची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहे.
दोन जागीच ठार !
मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा येथेही एक अपघात झाला असून या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत तर दहा जखमी झाले आहेत. माडद बोगद्याच्या जवळ एका ट्रकचा टायर पंक्चर झालेला होता. त्यामुळे हा ट्रक उभा असताना एक कार या ट्रकला पाठीमागून धडकली आणि हा अपघात झाला. एक तरुण आणि एक तरुण महिला असे दोघे जागीच ठार झाले आणि अन्य दहा जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. सदर कार ही सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंढावळे येथून मुंबईकडे निघाली होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !