BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ सप्टें, २०२२

सहा महिन्यांची मुलगी, तिच्या दर्शनाला हजारोंची गर्दी !



शोध न्यूज : अवघ्या सहा महिन्याच्या मुलीच्या दर्शनासाठी हजारोंची गर्दी उसळली आणि आजही अंधश्रद्धेचा पगडा किती मजबूत आहे याचेच धक्कादायक दर्शन पुन्हा एकदा घडले.


विज्ञान युग सुरु होऊन बराच काळ लोटला, लोक शिक्षण घेवू लागले आणि विज्ञानाच्या गप्पा मारू लागले. विज्ञानाच्या प्रगतीचा रोज लाभ घेवू लागले. पण आजही दुनिया किती मागे आहे याची साक्ष देणाऱ्या एकापेक्षा एक घटना या विज्ञान युगात घडताना दिसत आहेत. कधी गणपती दूध पितो तर कधी मंदिरातील गणपती चांगली मूर्ती बसवावी म्हणून रडू लागतो. कधी झाड रडते तर कधी भूत, पिशाच्च कुणाच्या अंगात घुसते. असे अंधश्रद्धेचे प्रकार आजही सुरूच आहेत. त्यामुळे शिकलेले लोक शहाणे झालेत काय ? हा प्रश्न कायम अनुत्तरीत रहात आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समिती वर्षानुवर्षे काम करीत असून लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न करीत आहे पण अजूनही समाजात अंधश्रद्धाळू लोक आहेत हे पुन्हा पुन्हा दिसून येत आहे. 


सहा महिन्याच्या मुलीचा अंगात देवीचा संचार होऊ लागल्याची अफवा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी गावात पसरली आणि अवघी पंचक्रोशी धावली. या छोट्या मुलीच्या दर्शनासाठी हजारो लोकांनी एकच गर्दी केली. या लहान मुलीच्या अंगात देवी येत असल्याची अफवा अनेकांना आश्चर्यचकित करून गेली. अंगात येणे हा प्रकार तद्दन खोटा असल्याचे अंनिस ने वारंवार पटवून दिला आहे पण तरीही काही महिलांच्या अंगात येण्याचे कथित प्रकार पाहायला मिळतात. आता तर केवळ सहा महिन्याचे वय असलेल्या मुलीच्याच अंगात देवी संचारली म्हणून अफवा उठविण्यात आली. लोक श्री गणेशाची पूजा सोडून या लहान मुलीचे दर्शन घेण्यासाठी रांग लावू लागले ! 


या मुलीच्या दर्शनासाठी म्हणून आलेल्या महिलात काही महिलांनी वेगळाच बनाव सुरु केला. या मुलीच्या घराच्या अंगणात अनेक महिला आपल्याही अंगात देवी आल्याचा बनाव करू लागल्या आणि यात अनेक अघोरी प्रकार देखील सुरु झाले. अनेक महिला येथे येत असून अंगात आल्याचे सोंग करू लागल्या आहेत. सदर अफवा केवळ सेनगावपुरती राहिली नसून पंचक्रोशीत ही अफवा वेगाने पसरली आणि मुलीच्या दर्शनासाठी हजारो लोकांची गर्दी झाली आहे. दुर्दैवाची आणखी एक बाब म्हणजे या चिमुकल्या मुलीला लोकांच्या दर्शनासाठी तासनतास गर्दीत बसवून ठेवले जात आहे. 


प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी या चिमुकल्या मुलीच्या कपाळावर आपोआप कुंकवाचे मळवट तयार होत आहेत आणि तिच्या घरात देवीची दगडी मूर्ती देखील निघाली आहे अशी देखील अफवा पसरली आहे. त्यामुळे गावाच्या परीसरासह दूरवरून लोक दर्शनासाठी मुलीच्या घरी येवू लागले आहेत. (The height of superstition, Huge crowd to darshan the girl) लहान मुलीच्या चेहऱ्यावर लाल चट्टे देखील आले आहेत. हा प्रकार नेमका कशामुळे आहे हे समजू शकले नाहीत परंतु जीवनसत्वाच्या अभावी हे चट्टे आले असतील त्यामुळे या मुलीची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी मागणी अंनिस ने केली आहे. अंधश्रद्धाळू लोक मात्र विज्ञानाला पायदळी तुडवत या मुलीच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. विज्ञानयुगातील हा प्रकार पाहून अनेकांनी कपाळावर हात मारून घेतला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !