BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ सप्टें, २०२२

सोलापूर पुणे महामार्गावर दोन अपघात



शोध न्यूज : सोलापूर - पुणे महामार्गावर झालेल्या दोन अपघातापैकी एका अपघातात जीप पलटी झाली तर दुसऱ्या अपघातात चार चाकी उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळण्याची घटना घडली आहे. एका अपघातात दहा जण जखमी झालेले आहेत. 


सोलापूर पुणे महामार्गावर सोलापूरकडून पुण्याकडे निघालेल्या ट्रॅक्स जीपला अत्यंत गंभीर अपघात झाला. इंदापूरजवळील बाह्य वळणावर हा अपघात झाला असून जीप रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात दोन जण गंभीर स्वरूपाचे जखमी झाले असून अन्य आठ प्रवाशीही जखमी झाले आहेत. सांगोला तालुक्यातील जवळा येथील हे जखमी प्रवासी आहेत.  जवळा येथील अमोल नारायण शिंदकर हे ट्रक्स जीप (एम एच ४५ एन ७६१४) घेऊन पुण्याच्या दिशेने निघाले होते. शिंदकर हेच सदर जीप चालवत होते. जीप घेऊन ते इंदापूरच्या बाह्यवळणावर आले तेंव्हा त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एक अज्ञात ट्रकने जीपला पाठीमागून जोरात ठोकरले. पाठीमागून जोराची धडक बसताच शिंदकर यांची जीप रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली आणि हा अपघात झाला. 


सदर अपघातात सांगोला तालुक्यातील घेरडी  येथील मंजिल सुखदेव गंगणे (वय ४७) लोणविरे (सांगोला) येथील राहुल लक्ष्मण दोडके (वय ५०) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यास आणि हातापायास मोठी दुखापत झाली आहे. याच जीप मधून प्रवास करणारे  सांगोला तालुक्यातील लोणविरे येथील अश्विनी मंजिल गंगणे (वय ४०), महादेव शंकर दोडके (वय ६४), पृथ्वीराज गुलाब दोडके (वय ५०), हर्षदा महिंद्र महागडे (वय ५) इलत गुलाब दोडके (वय ६०) , प्रियांका महेंद्र महागडे (वय २२) अष्टक उत्तम दोडके (वय ५१)  अवंता शशिकांत चंदनशिवे (रा. वासुद, ता. सांगोला  वय ५०) हे जखमी झाले आहेत. सदर प्रवासी जखमी झाले असले तरी त्यांना किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. हा अपघात होताच रस्त्यावरील वाहने थांबली आणि त्यांनी जखमीला मदत केली. तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले. 


चार चाकी पुलावरून खाली 

दुसऱ्या एका अपघातात ह्युंदाई असेट ( एम एच ०१ पी ए ९७४८) चार चाकी इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळून अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून ही गाडी खाली कोसळली तथापि या अपघातात जीवितहानी झाली नाही. या गाडीतून तीन जण प्रवास करीत होते यात एका महिलेचा देखील समावेश होता. पुलावरुन गाडी खाली कोसळल्यामुळे अपघातांचा मोठा  आवाज झाला आणि तो दूरपर्यंत ऐकू गेला. या आवाजाने लोणी देवकर येथील नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी जखमींना गाडीतून बाहेर काढले. 


हा अपघात नेमका कशामुळे घडला हे समजू शकले नसले तरी मोठा अपघात होऊननही सुदैवाने गाडीतील प्रवासी बचावले आहेत. या पुलावर वाहनांची प्रतीक्षा करीत अनेकजण थांबलेले असतात. या मार्गवरुन धावणाऱ्या अनेक बस लोणी देवकर बस थांब्यावर न थांबता महामार्गावरून निघून जातात त्यामुळे अनेक प्रवासी या पुलावर येऊन थांबतात. दररोज वीस पंचवीस विद्यार्थी याच उड्डाणपुलावर येऊन बसची वाट पाहात उभे असतात. हा अपघात झाला तेंव्हा सुदैवाने येथे कोणी नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !