BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ ऑग, २०२२

भीमा नदीत एकाचा मृतदेह मिळाला तर दुसरा तरुण बेपत्ताच !

 



शोध न्यूज : भीमा नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या एका तरुणाचा मृतदेह  सापडला असला तरी दुसरा एक तरुण अजूनही बेपत्ताच आहे. भीमा नदीला आलेला पूर ओसरण्याची प्रतीक्षा आता सर्वांनाच लागली आहे. 


धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरणे तुडूंब झाली तसेच खडकवासलासह अन्य धरणातील पातळी वाढली त्यामुळे उजनी धरणात येणारे पाणी वाढत राहिले. उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतरही जलाशयात पाण्याची आवक वाढत राहिली त्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडावे लागले. उजनीतून आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे भीमा नदीला पूर आला. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक विचारात घेवून विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला आणि भीमा नदीला आलेल्या पुराची परिस्थिती आणखी वाढत गेली. या पुराच्या दरम्यान पंढरपूर येथे काही दुर्दैवी घटना घडल्या. पंढरपूर येथे पद्मावती झोपडपट्टीत राहणारा शेट्टी ज्ञानोबा बंदपट्टे ही ३५ वर्षे वयाची व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली. (bhima river flood) नेहमी चंद्रभागेत स्नानासाठी जाणारा शेट्टी पूर आलेला असतानाही स्नानासाठी गेला आणि पुरात तो वाहून गेला. 


पुराच्या पाण्यात वाहून गेलेला शेट्टी याचा त्या दिवशी काहीच तपास लागला नाही पण दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. परंतु पुरात उडी मारलेला आणखी एक तरुण बेपत्ताच आहे. लखुबाई मंदिराजवळ राहणारा २८ वर्षीय करण खंडागळे याने १४ ऑगष्ट रोजी नवीन पुलावरून चंद्रभागा नदीत उडी मारली होती. करण खंडागळे हा आपला भाऊ आणि काही मित्रांच्या सोबत नवीन पुलावर गेला होता. तेथे त्याने सर्वांच्या डोळ्यादेखत पुराच्या पाण्यात उडी मारली. पुराचे पाणी वेगाने वाहत असल्यामुळे तो पाण्यात वाहत गेला. वेगवान प्रवाही पाणी असल्यामुळे पाण्याबरोबर अनेकांच्या डोळ्यादेखत तो वाहत राहिला आणि  काही  क्षणात दिसेनासा झाला. त्याचा शोध घेतला गेला पण तो अद्याप सापडला नाही.  


पुरामुळे काही दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रशासन सातत्याने आवाहन करीत आहे, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करूनही अशा घटना घडल्या आहेत. नदीत उतरू नका असे आवाहन केले जात असताना काही हौशी मंडळी पुराच्या पाण्यात नौकाविहार करतानाही दिसून आले. पंढरपूर येथे पुरात घडलेल्या दोन्ही घटना या अपघाताने घडलेल्या नसून एक जण स्नानासाठी म्हणून या पुरात गेला तर दुसऱ्याने धोका दिसत असतानाही पुराच्या पाण्यात उडी घेतली. (
Youth goes missing in Chandrabhaga flood) त्यामुळे या दोन घटना घडून गेल्या आहेत.


नशीब बलवत्तर !
पूर आलेला असताना भारती चव्हाण या वृद्ध महिलेने पुरात उडी घेतली होती, दगडी पुलाजवळील नव्या पुलावरून पाण्यात पडलेली ही दूरपर्यंत वहात राहिली. स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या निदर्शनास हे येताच नगरपालिकेच्या अग्निशामक बोटीने पुरात झेप घेतली आणि या महिलेला वाचवले गेले. पुराच्या पाण्याला प्रचंड वेग असतानाही ही महिला बुडाली नाही आणि वाहून जाण्याच्या आधीच तिचे प्राण वाचवले गेले. या महिलेचे नशिबच बलवत्तर !


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !