BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ ऑग, २०२२

'राष्ट्रवादी' चा बडा नेता तुरुंगाच्या वाटेवर !


शोध न्यूज : एका पाठोपाठ एक नेते तुरुंगात जात असताना आता पुन्हा राष्ट्रवादीचा एक बडा नेता तुरुंगाच्या वाटेवर असल्याचे भाजपने सूचित केले असून यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 


महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा वावर वाढलेला असून आता आघाडीची सत्ता गेली तरीही त्यांचे नेते तुरुंगात जाताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे बडे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगात गेले आणि त्यांच्या पाठोपाठ दुसरे मंत्री नवाब मलिक यांना देखील ई डी ने तुरुंगात पाठवले आहे. या दोघांनी प्रयत्न करूनही त्यांना अद्याप जामीन मिळाला नाही त्यामुळे अजूनही ते 'आतच' आहेत. अगदी अलीकडेच शिवसेनेचे खासदार संजय राउत यांना देखील अटक करण्यात आली आणि ते देखील तुरुंगाच्या गजाआड जाऊन बसले आहेत. महाविकास आघाडीतील तीन नेते तुरुंगात असतानाच राष्ट्रवादीचे आणखी एक बडे नेते तुरुंगात जात असल्याचे भाजपने सूचित केले आहे.

 

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटमुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. भाजपचे किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांनी आजवर केलेल्या ट्वीट प्रमाणे तशा घटनाही घडलेल्या आहेत हा इतिहास आहे. 'ईडी ची रेड पडणार, अटक होणार, तुरुंगात जाणार' अशी माहिती या नेत्यांनी दिली आणि त्यानंतर तशा घटना घडलेल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांची माहिती भाजपच्या या नेत्यांना कशी मिळते असा सवाल देखील विरोधकांनी अनेकदा उपस्थित केला आहे. त्यांना माहिती कशी मिळते हे जरी गुलदस्त्यात असले तरी त्यांची माहिती ही खरी असते हे मात्र प्रत्येक घटनेत समोर आलेले आहे. त्यामुळेच आता मोहित कंबोज यांच्या एका ट्वीटने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

 

राष्ट्रवादीचा एक बडा नेता तुरुंगात जाणार असून आपण त्याचे नाव जाहीर करणार आहोत असे मोहित कंबोज यांनी म्हटले असून त्यांनी एका ट्वीटमध्ये सिंचन घोटाळ्याचा देखील उल्लेख केला आहे. (NCP's big leader on the way to jail) त्यांनी काल तीन वेळा वेगवेगळे ट्वीट केले असून पहिल्या  ट्वीटमध्ये त्यांनी 'हे ट्वीट सेव्ह करून ठेवा, राष्टवादी कॉन्ग्रेसचा मोठ्यात मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटणार आहे' असे म्हटले आहे. दुसऱ्या ट्वीटमध्ये लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भांडाफोड करणार आहे, या नेत्याची भारतातील आणि परदेशातील संपत्ती, बेनामी कंपन्या, या नेत्याच्या मैत्रिणीच्या नावे असणारी संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यात काम करताना केलेला भ्रष्टाचार, कुटुंबाचे उत्पन्न आणि संपत्ती याची यादी जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्याची बंद करण्यात आलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. 


राष्ट्रवादीचा कोणता बडा नेता आता तुरुंगात जाणार आहे ? हा प्रश्न सर्वांनाच पडला असला तरी हा रोख कुणाकडे आहे याचा अंदाज लावला जात आहे. राज्यात बहुचर्चित ठरलेल्या सिंचा घोटाळयाचा उल्लेख कंबोज यांनी केला आहे. एकेक नेते तुरुंगात जात असताना आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याबाबत भाजपने हे सूचित करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आज विधानसभा अधिवेशन सुरु होत असताना भाजपने हा मोठा धक्का दिला आहे. काही जण मात्र याला विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वापरलेले दबावतंत्र असल्याचे म्हणू लागले आहेत.


किसमे कितना है दम

 मोहित कंबोज यांनी आणखी एक ट्वीट केले असून 'अब तांडव होगा.. हर हर महादेव' असे त्यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे 'मोहित कंबोज, यंत्रणेला हाताशी धरून धमकी कुणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगारासकट लावतो, तुझी सत्तेची मस्ती आणि माज उतरवायला वेळ लागणार नाही, आ, देखे जरा, किसमे कितना है दम'  असे चव्हाण यांनी म्हटले आहे 


'त्यांनी' दिल्लीत बसावं !

मोहित कंबोज हे एवढे मोठे नेते कधीपासून झाले असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी विचारला असून 'काळ्या सोन्याचा व्यापार करणारा गुंड' असा उल्लेख त्यांनी केला आहे, हा गुंड काहीतरी भाष्य करतो आणि त्याची बातमी होते. त्यांनी आणि सोमय्या यांनी दिल्लीत जाऊन त्यांचा आकाजवळ बसावं अशा बातम्या घेत राहाव्यात असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !