शोध न्यूज : 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील ...... ओक्के ' एवढ्या माणदेशी वाक्यावर प्रसिद्धीला आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे.
एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना घेवून बंद केले पण बंडापेक्षाही सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील अधिक गाजले, दोन महिने झाले तरी लोक त्यांचे 'काय झाडी, काय डोंगार..' विसरायला तयार नाहीत आणि प्रसिद्धी माध्यमे आता बापूंच्या प्रत्येक विधानावर लक्ष ठेवून राहू लागले आहेत. शिवसेनेने देखील या बंडानंतर शहाजीबापुना टार्गेट केले आहे तर शहाजीबापू देखील एक पाऊलही मागे येण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. पुढच्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना पराभूत करण्याची गणिते जुळवली जात असताना शिवसेना आणि आ. पाटील यांच्यात शब्दांचे युद्ध सुरु आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी थेट सांगोल्यात सभा घेवून करता येईल तेवढी टीका बापूंवर केली आणि बापूनी देखील कोकणात जाऊनच उत्तर देईन असे सांगितले आहे.
शिंदे गटातील दहा पंधरा आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत असे नुकतेच शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले होते. यामुळे पुन्हा राज्यात चर्चा सुरु झाली असतानाच शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत खैरे यांना टोला लगावला आहेच पण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील आव्हानच दिले आहे. (Shahajibapu Patil criticizes Uddhav Thackeray) शहाजीबापू पाटील म्हणाले," उद्धवसाहेब आणि आदित्य साहेब यांना सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. तुम्हाला माझ्यावर काय लक्ष ठेवायचं असेल तेवढे ठेवा, काय पाडायचे ते पाडा !, संपूर्ण महाराष्ट्रात जास्त वेळा पडायचा विक्रम माझ्याच नावावर आहे !"
शहाजीबापू पाटील यांच्याच "ओक्के" या शब्दाला धरून विरोधकांनी 'पन्नास खोके, एकदम ओक्के" अशा घोषणा सुरु केल्या आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान याच घोषणा गाजत राहिल्या आणि अजूनही त्या महाराष्ट्रात गाजत आहेत. अर्थात ही घोषणा पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत वाजत गाजत राहणार आहेत. शिवसेनेने बंडखोर आमदार पन्नास खोके घेऊन भाजपसोबत गेल्याचा आरोप केला आहे याबाबत बोलताना आ. शहाजीबापू पाटील म्हणाले, "कसले खोके ? आम्हाला डाळिंब भरायची खोकी तेवढी माहित आहेत." शिवसेनेतून फुटून गेलेल्या चाळीस आमदारांना 'गद्दार' असे संबोधले जात आहे. यावर देखील आ. पाटील यांनी भाष्य केले आहे. 'जे आम्हाला गद्दार म्हणतात ते मंत्रालयात जायचे आहे म्हणून अंघोळीला बाथरूममध्ये गेले आणि जेव्हा बाहेर आले तेंव्हा ते बाहेर आले तेंव्हा त्यांचे मंत्रीपद गेल्याचे त्यांना समजले !
शिंदे गटातील दहा ते पंधरा आमदार आमच्या संपर्कात आहेत या चंद्रकांत खैरे यांच्या विधानावर बोलताना शहाजीबापू म्हणाले, " दहा की पंधरा हाच आकडा अजून निश्चित नाही, दहा धरायचा की पंधरा? चंद्रकांत खैरे यांना केवळ ढगात गोळ्या मारून वातावरण भांबावून सोडायचे आहे, दुसरा काही उद्योग नाही, बाकी यांना काही जमत नाही, शेवटच्या गटांगळ्या खाताना माणूस जे करतो तसे यांचे चालू आहे. त्यांना आता सगळं कळून चुकलेलं आहे. "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !