BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ ऑग, २०२२

साखर कारखान्यात शेतकऱ्याचे खळखटयाक !

 


शोध न्यूज : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या इंद्रेश्वर साखर कारखान्यात आज शेतकऱ्याने खळखटयाक केले असून एफआरपी न मिळाल्याने आपला रोष व्यक्त केला आहे.

 
साखर कारखाने गाळपासाठी शेतकऱ्यांचा ऊस नेतात पण ऊसाची बिले वेळेवर देत नाहीत असे प्रकार अनेक साखर कारखान्याच्या बाबतीत घडत आहेत. कर्ज काढून शेतकरी ऊस पिकवतो, त्यासाठी त्याने खते, औषधे आदींची उधारी केलेली असते परंतु बिले न मिळाल्याने त्याला ही उधारी देखील चुकवता येत नाही. शिवाय ऊसाच्या बिलाच्या वायद्यावर त्याने अनेक व्यवहार केलेले असतात पण ऊसाची बिले न मिळाल्याने त्याचे अर्थचक्र रुतून बसलेले असते. वारंवार शेतकरी बिलांची मागणी करतो पण त्याला ते मिळत नाही. शेतकरी एफआरपी रक्कम मिळण्यासाठी आंदोलनेही करतो पण याचा काहीच परिणाम कारखान्यावर होत नाही परिणामी शेतकऱ्याचा संयम सुटू लागतो. असाच प्रकार आज बार्शी येथे घडला आहे. 


भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या इंद्रेश्वर साखर कारखान्याने बिले दिली नसल्याने शेतकरी आता संतप्त झाले आहेत. माढा, परंडा, उस्मानाबाद, भूम अशा तालुक्यातील शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम थकीत असून शेतकरी या रकमेची मागणी करीत आहेत. यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त असलेल्या शेतकऱ्याने थेट कारखाना कार्यालयाची तोड फोड करून खळखटयाक केले. कारखाना एफआरपी ची रक्कम देत नाही आणि आंदोलनाचीही दखल घेत नाही. (
Vandalism in sugar factory by farmers)  उपळाई ठोंगे परिसरातील या कारखान्याच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरु असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने हे कृत्य केले. 


शांतपणे साखर कारखान्याच्या कार्यालयात जाऊन तेथील काचा फोडण्यात आल्या. कार्यालयातील शांत वातावरणात फुटलेल्या काचांचा आवाज येत राहिला आणि काचांचे तुकडे खाली पडत राहिले. ही तोडफोड केल्यानंतर हे पदाधिकारी शांतपणे बाहेर आले.  या 'खळखटयाक' चा व्हिडीओ देखील तयार करण्यात आला असून तो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. शेतकरी आता टोकाचे पाऊल उचलू लागल्यावर तरी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना मिळतेय काय ? याकडेच आता लक्ष लागलेले आहे. 



   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !