BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ ऑग, २०२२

पंढरीतील खुनाची जलदगतीने उकल, पोलिसांचे यश !

✪ मोठी बातमी ✪ पंढरपूर खून प्रकरणी दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात .... मित्रांनीच लखनचा काढला काटा, गळा दाबून जीव घेतला आणि नंतर दगड बांधून विहिरीत टाकले ! पंढरपूर पोलिसांचे कौतुकास्पद यश ! ✪➤!



 

पंढरपूर : भंडीशेगाव येथील तरुणाच्या खून प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाल करून दोन संशयिताना ताब्यात घेतले आहे.


वाखरी हद्दीत याकुब शेख यांच्या शेतातील विहिरीत काल भंडीशेगाव येथील २५ वर्षाचा तरुण लखन सुनील गांडुळे याचा मृतदेह आढळून आला होता. विहिरीत पुरेसे पाणी नसल्यामुळे ही बाब वेळीच निदर्शनास आली होती. नायलॉन दोरीने दोन्ही हात बांधलेला आणि कमरेला मोठा दगड बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता, यामुळे हा प्रकार खुनाचा असल्याचे दिसून येत होते. ही बाब पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि सदर मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेहाची त्वरित ओळख पटवली. पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील लखन गांडुळे याचा हा मृतदेह असल्याची खात्री पटताच पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला.  


सदर प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खून केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान घटना उघडकीस आल्यापासूनच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली होती. एकेक धागेदोरे पोलीस प्राप्त करीत होते. मृताची वेळीच ओळख पटल्यामुळे पोलीस लवकर आरोपीपर्यंत पोहोचतील अशी शक्यता व्यक्त होत असतानाच पोलिसांनी काही तासात दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. युवराज सातपुते आणि तुषार मेटकरी या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून मयत लखन याचे हे दोघे मित्र होते. मित्रांनीच मित्राचा काटा काढला असल्याचे या घटनेत दिसून येवू लागले आहे. 


पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून ही घटना घडली असल्याचे समोर येवू लागले आहे. युवराज आणि तुषार या दोन मित्रांशी लखन याचे पूर्वी भांडण झालेले होते. नंतर हा वाद मिटविण्यात आला आणि लखन हा या दोघांच्या सोबत चहा पिण्यासाठी गेला. तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि वादाचे पर्यवसान लखनचा खून करण्यात झाला. (Pandharpur Crime) लखन गांडुळे याचा गळा आवळून खून करण्यात आला आणि नंतर दगड बांधून, दोन्ही हात बांधून त्याला विहिरीत फेकून देण्यात आले अशा प्रकारची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. 


उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी अत्यंत तातडीने आणि जलदगतीने या गुन्ह्याचा तपास सुरु केला आणि संशयित आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले. (Success of police in Pandharpur murder case) लखनच्या दोन मित्रांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्या दोघांनी या घटनेतील घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे. खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी अत्यंत जलद गतीने केल्यामुळे पोलीस विभागाचे कौतुक होत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !