BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ ऑग, २०२२

उजनी धरण शंभर टक्के ! सोळा दरवाजे उघडले, भीमा नदीत विसर्ग !




पंढरपूर : उजनी धरणाचे शंभर टक्क्याच्या पुढे वाटचाल केली असून धरणाचे १६ दरवाजे उघडून भीमा नदीच्या पात्रात विसर्ग सोडण्यात आला असून पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.
 

यावर्षी पावसाळा लांबल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरते की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. उजनी धरणावर सोलापूरसह विविध जिल्हे अवलंबून असतात त्यामुळे सर्वांचेच लक्ष धरणाच्या पाणीपातळीकडे लागलेले असते. शेतीची तहान भागाविण्याबरोबरच औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याचीही गरज हे धरण भागवीत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेसाठी उजनी धरणाचे मोठे योगदान आहे. उजनी धरणात पुरेसा पाणी साठा झाला नाही तर अनेक जिल्ह्याच्या घशाला कोरड पडते आणि पिके धोक्यात येतात. त्यामुळे लाभक्षेत्रात पुरेसा पाउस नाही झाला तरी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास चिंता कमी होते. (Ujani dam hundred percent, Discharge into Bhima River)अखेर ऑगष्ट महिन्यातच उजनी धरणाचे शंभरी पार केल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा लाभला आहे. 


पुणे आणि मावळ परिसरात सतत पाउस होत असल्याने पुणे भागातील धरणांची पाणी पातळी वाढली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत असल्याने पुण्यात पूर परिस्थिती निमाण झाली. हे सर्व पाणी थेट उजनीच्या जलाशयात येत असल्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत गेली आणि उजनी धरण अखेर शंभर टक्क्यांच्याही पुढे गेले आहे. धरण शंभर टक्के भरले असल्यामुळे आणि जलाशयात अजूनही विसर्ग येत असल्यामुळे धरणातून पाणी सोडणे सुरु करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार हा विसर्ग वाढविण्यात देखील येत आहे. 


उजनी धरणात १०१.४५ टक्के पाणी साठा झाला आहे तर एकूण पाणीसाठा ११८.०१ टीएमसी एवढा झाला आहे . त्यामुळे उजनी धरणाच्या १६ दरवाजातून ३० हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सोडला जाऊ लागला आहे. धरणातून विसर्ग सोडण्यात आल्याने तसेच वीर धरणाचाही विसर्ग येत असल्याने भीमा नदी काठावरील गावांना सतर्कता बाळगण्याबाबत इशारा देण्यात आला आहे. दौंड येथे ६० हजार ३४१ क्युसेक्स विसर्ग येत असल्यामुळे आवश्यकता निर्माण होईल त्याप्रमाणे उजनी धरणातील विसर्ग वाढविला जाऊ शकतो. मुख्य कालव्यातून २ हजार क्युसेक्स, 'सीना माढा' साठी २५९ क्युसेक्स, दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी ४३ क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी १६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.


पूल पाण्याखाली !

भीमा नदीची पाणी पातळी वाढल्याने आज दुपारी पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. उद्यापर्यंत ही पातळी आणखी वाढणार असून चंद्रभागेच्या काठावर देखील दक्षता घेण्यात येत आहे. पूरपरिस्थिती निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नदीच्या काठावर असलेली औजारे, विद्युत पंप तसेच अन्य साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन केले आहे.  


स्थलांतराची व्यवस्था !

भीमा नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे नदी काठावरील कुटुंबाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावे, त्यांना गावातील शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, धर्मशाळा अशा ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश देखील प्रशासनाने दिले आहेत. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये तसेच पसरवू नयेत, तसे केल्यास आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

 

  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !