BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ फेब्रु, २०२३

फोटोसाठी सगळं काही ...! अगदी काहीही......!! रविवार मनोरंजन

 




छायाचित्र ! जुन्या आठवणींचे ' साक्षीदार, कित्येक वर्षांपूर्वीचा प्रसंग स्थिर रूपात पुन्हा पुन्हा पाहण्याचं भाग्य फोटोमुळेच लाभतं. आपल्या स्मृतींना उजाळा देण्याचं कामही छायाचित्र करत असतं.  छायाचित्रं नसती तर आपल्या स्मृती, काळाबरोबरच विरून गेल्या असत्या. नामशेष झालेल्या बाबींचे स्वरूपही आपल्याला छायाचित्राद्वारे पहायला मिळते. आपल्या आठवणींचा जिवंत ठेवा केवळ छायाचित्रंच जपून ठेवतात. हल्ली तर छायाचित्रांचे तंत्र प्रगतीपथावरच आहे. रोज नवं तंत्र अवलंबलं जात आहे. अलिकडच्या बदलत्या युगात छायाचित्रांना खूपच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जाहिरातीमध्येही कल्पकतेने  वापर केला जात आहे. घराघरात फोटोचा  संग्रह पहायला मिळतो. कार्यक्रमाचं स्वरूप  लहान असो अथवा मोठे, महत्त्वाची व्यक्ती विसरली जाईल, पण फोटोग्राफरला बोलवायला, विसरत नाहीत. फोटोग्राफरही सहजासहजी येत नाही. त्याचेसाठी चार दोन हेलपाटे घालावेच लागतात. फोटोग्राफरने कितीही त्रास दिला तरी त्याचा पिच्छा काही केल्या सोडत नाहीत. एवढे महत्व फोटोला प्राप्त झालेले आहे.


कधीकाळी एक फोटो काढायचा म्हटलं तर कित्येकांना शक्य नव्हते. फोटो काढणं हा देखील एक वेगळ्या आनंदाचा भाग होता. चौकाचौकात फोटो स्टुडीओ थाटलेले असायचे आणि काळे पांढरे फोटो कौतुकाने पहिले जायचे. त्यावेळी फोटोत रंग नव्हता की आत्तासारखे झटापट फोटो काढून हातात मिळतही नव्हते. आठ आठ दिवस फोटोची वाट पाहिली जायची आणि फोटोला फेम करून भिंतीवर लटकावले जायचे. काळ बदलला, अधुनिक तंत्र विकसित झाली आणि प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला. आता कुणीही कधीही आणि कशाचेही फोटो काढतो. पूर्वीसारखे त्याचे अप्रूप राहिले नाही पण कधीकाळी या फोटोचे महत्व काही वेगळेच होते. त्याकाळी व्हिडीओत दिसणं म्हणजे अलौकिक वाटत होतं. आता सगळंच बदललं आणि ज्याच्या त्याच्या हातात तंत्र आलं त्यामुळे फोटोचे महत्वही तसे कमीच झाले. घराघरात आता फोटोच्या अल्बमचे ढीग लागू लागले आहेत आणि मोबाईल फोटोनी भरून गेला आहे पण काही वर्षांपूर्वी हे सगळंच वेगळं होतं, त्याच्या गमतीजमतीही आगळ्या वेगळ्या होत्या.


फोटोसाठी सगळ्यांची धावपळ चाललेली असते. यात कित्येकदा अगदी मजेशीर गोष्टी पहायला मिळतात. आपला फोटो निघावा यासाठी माणसं काहीही करतात.  आणि यावेळी आपण काय करतोय याचे भान त्यांना असत नाही. शहाणी माणसंही  अशाप्रसंगी वेड्यासारखं वागू लागतात आणि त्यातच गंमत घडते. एका प्राध्यापकाचा असाच एक गमतीदार किस्सा मला आठवतो, नव्हे तो चांगलाच स्मरणात आहे. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनासाठी महाविद्यालय़ीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बसवलेल्या नाटकाच्या प्रयोगप्रसंगी या प्राध्यापक महाशयांनी प्रेक्षकांची चांगलीच करमणुक केली. नायिका तिच्या लहान बालकास घेऊन रंगमचावर प्रवेश करते, असा नाटकातील प्रसंग. महाविद्यालयाची 'कुमारी' विद्यार्थिनी बालक कुठून आणणार? त्यासाठी एका प्राध्यापकांचं लहान मूल  नायिकेच्या हातात दिलं. नायिकेने रंगमंचावर प्रवेश केला आणि आपले संवाद बोलू लागली. पण नायिकेचा आवाज प्रेक्षकापर्यंत पोहचतच नव्हता. दुसराच आवाज येत होता. ते बालक रडत वगैरे काही नव्हते. तसे ते बापापेक्षा वेगळे म्हणजे 'शहाणे' होते. 


विंगेतूनच कुणाचा तरी आवाज येत होता. 'दिलीप फ्लॅश, दिलीप फ्लॅश....'  तरीही फोटोग्राफरचा फ्लॅश पडत नव्हता. हे पाहून आवाज वाढतच होता. हा आवाज एका प्राध्यापकाचा, म्हणजेच नायिकेच्या हातात असलेल्या बालकाच्या पित्याचा होता. हे प्राध्यापक महाशय रंगमंचाच्या प्रवेश द्वारातून वाकून प्रेक्षकात उभ्या  असलेल्या फोटोग्राफरला हात लांबवून खुणा करत होते. लोक हसत होते. रंगमंचाच्या डाव्या बाजूच्या प्रेक्षकांना तर हे नाटक 'जादुई' वाटायला लागलं कारण रंगमंचावरील कोपऱ्यात बिन माणसांचा एक हात वर खाली होताना दिसू लागला. रंगमंचावर हे भलतंच विचित्र दिसत होतं, नाटक सोडून प्रेक्षकाचं लक्ष या हाताकडेच जात होते. परंतु फोटोग्राफर अजूनही आपल्या मुलाचा रंगमंचावर नाटक चालू असताना फोटो काढत नाही हे पाहून प्राध्यापक महाशय सरळ रंगमंचावर आले आणि ओरडू लागले. 'दिलीप फोटो काढा, फोटो काढा...'',  सगळ्या प्रेक्षकात एकच हशा पिकला. पात्रांनी डायलॉग बोलणे बंद केले. पण  फोटोचा फ्लॅश चमकल्याशिवाय हे महाशय रंगमंचावरून हलले नाहीत. प्रत्यक्षात हा प्रकार किती मनोरंजक झाला असेल याची कल्पना करा. 


नाटकाबाबतीतला आणखी एक प्रसंग सांगतो. नवोदित कलावंतांना नाटक चालू असताना नाट्यप्रसंगाचे फोटो घेण्याची फार होस असते.  त्यात नायिकेबरोबर प्रसंग 'असेल तर त्या प्रसंगाचे फोटो काढण्याची सूचना राहून राहून फोटोग्राफरला दिलेली असते. अशा एका हौशी कलांवंताने रंगमंचावर केलेली धमाल पाहण्याचा योग आला. संपूर्ण नाटकात या कलावंताला एकच प्रेमप्रसंग सादर करायला मिळणार होता. नायिकेच्या खांद्यावर हात ठेवत काही संवाद बोलायचे होते. आता असा फोटो त्याला हवाच होता. त्यामुळे या कलाकाराने तशा सूचना पुन्हा पुन्हा फोटोग्राफरला आधीच दिलेल्या होत्या. त्यामुळे फोटोग्राफर कॅमेरा घेऊन सज्ज झालेला होताच ! तो प्रसंग जवळ येत होता तसे त्याचे लक्ष फोटोग्राफरकडे लागले होते. फोटोग्राफर देखील नजरेने त्याला सज्ज असल्याचे सांगत होता. अखेर 'तो' प्रसंग आला, त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला पण ऐनवेळी कॅमेऱ्याची काहीतरी भानगड झाली. फोटोग्राफर प्रयत्न करीत होता. उच्चारायचं वाक्य कलाकाराने उच्चारलं, तिच्या खांद्यावरचा हात खाली घ्यायची वेळ झाली तरी काही केल्या तो खाली घेईना. फोटोसाठी पोझ घेऊन तो कॅमेऱ्याकडे पहात उभा होता. नाटक जाग्यावर थांबलं होतं. प्रेक्षकांचा गोंधळ सुरू होता. हा कलावंत एवढा चिवट होता की, जेव्हा फ्लॅश पडला तेव्हाच त्यानं पुढचे डॉयलॉग सुरू केले. फोटोसाठी माणूस काय करतो पहा !. 


फोटो स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढणाऱ्यांचीही गंमत असते. फोटोग्राफर कॅमेऱ्याजवळ उभा असतो. फोटो काढणारा एवढा ताठ बसलेला असतो की, मान इकडं तिकडं हलवणार नाही. एवढंच नव्हे तर कॅमेऱ्यावरची नजरसुध्दा हालवत नाही. अगदी निर्जीव पुतळ्यासारखी त्याची अवस्था होते. अशातच फोटोग्राफर स्माईल 'प्लीज' म्हणत थोडं हसण्याची सूचना देतो. त्यावेळी तो लांबलचक जबडा पसरून हसायला लागतो. याच्या हसण्याने फोटोप्राफरची हसून पुरेवाट होते. गालातल्या गालात हसायला सांगितले तरी वितभर ओठ लांबवून तोंड वेडेवाकडे करतात. बऱ्याच गमती-जमती होतात. शेवटी फोटोग्राफर जमेल तसा फोटो काढून टाकतो. 


एखादा मंत्री किंवा सिनेकलावंत एखाद्या कार्यक्रमास आला असला म्हणजे त्यांच्यासमवेत फोटो काढून घेण्याची अनेकांची इच्छा म्हणजे हौस असते. मुद्दामपणे व्यासपीठावर गर्दी केली जाते. संयोजकांचीही त्यासाठीच धावपळ चालते. पण गदींमुळे त्याचीही हौस भागणे अवघड होऊन बसते. फोटोग्राफरला सांगून ठेवलेलं असतं, आम्ही जाऊन त्यांचेशी काहीतरी बोलतो तेवढ्यात तुम्ही फोटो काढा. किंवा आम्ही त्यांचे  शेजारून चालत जातो तेवढ्यात फोटो काढा, वगैरे वगैरे प्रकाराने फोटो काढण्यासाठी कसरत चाललेली दिसते. कुणी खास फोटोसाठी हस्तांदोलन करायला पुढे जाते. प्रत्येकाचे प्रकार वेगळे असतात पण एकूण धावपळ फोटोसाठीच असते गर्दीतून का होईना आपला चेहरा दिसावा यासाठी कुणी मध्येच तोंड खुपसते, त्यांचाही अर्ध्या डोक्याचा का होईना फोटो निघतो. ' डोकावलेल्या अर्धवट चेहऱ्यामुळे त्या छायाचित्राचा मूळ तोलंच बिघडून जातो लग्नाच्या धांदलीतही फोटोग्राफरला खूप महत्त्व आहे. लग्नातल्या आठवणी चित्ररूपात साठवण्याचं काम तोच करीत असे.


 लग्न जीवनातील एका वळणावरची अत्यंत महत्वाची घटना. याप्रसंगाची छायाचित्रे जीवनभर पुन: प्रत्ययाचा आनंद देत असतात. परंतु नवरा-नवरीपेक्षा वऱ्हाडी मंडळीच आपल्या फोटोसाठी धडपडत, असतात. पोलिसांनी एखाद्या गुन्हेगारावर नजर ठेवावी तशी ही मंडळी सतत फोटोग्राफरवर लक्ष ठेवून असतात. तो फोटो घेण्याच्या तयारीत दिसला की गर्दीतून वाट काढत त्याच्यासमोर जाऊन उभे राहतात. एवढंच कशाला? फोटोग्राफर जर कुठे बाहेर गेला असला तर तो येईपर्यंत लग्नातील काही विधी थांबवले जातात. नवरा-नवरी परस्परांच्या गळ्यात पुष्पहार घालत असतानाच्या फोटोला लग्नाच्या फोटोत खूप महत्त्व दिले गेले आहे. पण या प्रसंगाचे नेमके फोटो घेण्यात फोटोग्राफरचे कोशल्य लागते. कारण या प्रसंगी नवरा-नवरीभोवती वऱ्हाडी मंडळींनी 'घेराव' घातलेला असतो. असे फोटो घ्यायला नाही जमले म्हणजे फोटोग्राफर पुन्हा हार घालण्याची 'ॲक्शन' करायला लावून फोटो घेतो. अशावेळी नवरा-नवरी कॅमेऱ्याकडे पहात अगदी पुतळ्यासारखे उभे असतात. सभा, समारंभातही हीच अवस्था होते. 


सत्कारप्रसंगी तर या फोटोमुळे कार्यक्रमाचं विडंबन होते. सत्कार स्वीकारणारा कॅमेऱ्याकडे पहातच अंदाजाने हात पुढे करून श्रीफळ वर्गैरे स्वीकारतो. जणू काय केवळ फोटोसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. फोटोचा लाईट चमकल्याशिवाय सत्कार झाल्यासारखे त्याला वाटत नाही. या नादात सत्कारमूर्ती अप्रत्यक्ष सत्कार करणाऱ्या पाहुण्याचाही अनादर करीत असतो. खरी गंमत उडते ती ऐनवेळी फोटो न निघाल्यावर, सत्कारमूर्ती फोटोग्राफरकडे रागाने पहात असतो आणि 'नंतर घेऊ' अशी खूण फोटोग्राफर करीत असतो. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा फोटोसाठी सत्कार घडवून आणला जातो. पुतळ्यासारखे उभा राहून एकटक कॅमेऱ्याकडे पहात दोघेही उभे असतात. अशी चित्रे मात्र निर्जिव वाटतात. जशीच्या तशी म्हणजे नैसर्गिक चित्रे घेतली तर त्यात जिवंतपणा वाटतो. जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय? कुणी 'कसे' फोटो घ्यावेत हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (Everything for the photo! Article by Ashok Godage) परंतु हे मात्र खरे की, कार्यक्रम कुठलाही असो. .फोटोंच्या नाना गंमती होतातच आणि सगळी कसरत फोटोसाठी असते. ही कसरत पहात राहण्यानेही खूप मनोरंजन होते. कधीतरी आपणही अशी कसरत कुठंतरी केलेलो असेलच. होय ना ......!?

                                              - अशोक गोडगे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !