BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ ऑग, २०२२

शिक्षक पात्रता घोटाळ्यात माजी मंत्र्यांच्या मुली !

 



राज्यभर गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळ्यात आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आल्याने प्रचंड खळबळ उडाली असून सत्तार यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. 


राज्यात राजकीय भूकंप होताना सिल्लोड येथील शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या केवळ सोबत नव्हते तर ते आघाडीवर होते.  'गुवाहाटी'ला बिर्याणी खायला चाललोय' असे विधान देखील पत्रकारांशी बोलताना केले होते. शिवसेनेच्या टार्गेटवर असलेल्या काही आमदारांच्या यादीत  ते अग्रभागी असतानाच आता त्यांच्याच दोन मुलींची नावे या घोटाळ्यात आली आहेत.  यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघणे अपेक्षित होते आणि त्याप्रमाणे राज्यात सुरु झाले असून बंडखोर (शिवसेनेच्या शब्दात 'गद्दार') आमदार अब्दुल सत्तार यांना घेरण्यात येऊ लागले आहे.  अलीकडच्या काळातील शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा हा मोठा घोटाळा आहे, या घोटाळ्यात अनेक अधिकारी देखील अडचणीत आले असून या गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत ७ हजार ८७४ उमेदवार असून त्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत शिवाय त्यांना टीईटी परीक्षेस बसण्यास कायमची मनाई करण्यात आली आहे.   


या महाघोटाळ्याचे कनेक्शन थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले असल्याचे समोर आले असून आमदार आणि माजी महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचा समावेश समोर आला आहे. हीना कौसल अब्दुल सत्तार आणि उझमा नाहिद अब्दुल सत्तार यांची नावे यादीत आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यादीत १०२ आणि १०४ क्रमांकावर ही नावे असून ही यादी समाज माध्यमांवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे. हिना आणि उझमा या दोघी सन २०२० मध्ये अपात्र असून सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी प्रसिद्ध केलेल्या या यादीत ही नावे आहेत. 


शिक्षक पात्रता परीक्षेतील या घोटाळ्यात प्रचंड रकमा घेण्यात आल्या होत्या आणि यात मोठे धागेदोरे हाती लागलेले होते. (TET Exam Scam Abdul Sattar in trouble खूप बारकाईने या घोटाळ्याची चौकशी सुरु होती त्यामुळे अधिकारी देखील यात अडकले आहेत पण आता हे लोण माजी मंत्र्यांपर्यंत पोहोचले आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी मात्र हे आरोप नाकारले आहेत. 


बदनामीचा कट !

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचीच ही यादी आहे तथापि अब्दुल सत्तार यांनी हा प्रकार म्हणजे आपल्या बदनामीचा कट असल्याचे म्हटले आहे.  मुलींची चूक असेल तर कारवाई करा आणि बदनामी करणाऱ्यांना फासावर लटकवा असे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. ही नावे यादीत कशी आली हे समजत नाही, आपली बदनामी झाली असून याची चौकशी झालीच पाहिजे असे सत्तार यांनी म्हटले आहे.


बडबड बंद करा अन्यथा ---
अब्दुल सत्तार यांनी अधिक बडबड करू नये अन्यथा त्यांची फाईल उघडू असे शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. मंत्रीपद पाहिजे असेल तर आता गप्प रहा, या घोटाळ्याची चौकशी अधिकाऱ्यांनीच केली आहे ना? आता या प्रकरणाची अधिक बारकाईने चौकशी करण्याची मागणी देखील खैरे यांनी केली आहे आणि सत्तार यांच्यावर निश्चित कारवाई होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


मुख्यमंत्र्यांचे मौन !
सत्तार यांच्या दोन मुलींची नावे घोटाळ्याच्या या यादीत आल्याने राज्यात खळबळ उडालेली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना पत्रकारांनी याबाबत विचारले असता त्यांनी या प्रकरणात न बोलणेच पसंत केले आहे. त्यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

 
शिक्षणमंत्री करतील !
शिंदे- फडणवीस सरकारमध्ये अब्दुल सत्तार याना आता शिक्षणमंत्रीच करतील असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. आगामी विधानसभेत या प्रकरणावर आवाज उठवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. 

 

अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !