BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ ऑग, २०२२

सावधान ! पावसाचा 'रेड अलर्ट' जारी !



मुंबई : महाराष्ट्र राज्यासाठी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' जारी केलेला आहे. 


काहीशी उघडीप मिळाल्यानंतर राज्यात पुन्हा पावसाचे धुमशान सुरु झाले असून पाच दिवस राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने कालच व्यक्त केली आहे. त्यानुसार राज्याच्या काही भागात जोरदार पाउस सुरु झालेला आहे. नवी मुंबईत सानपाडा येथे अतिमुसळधार पाउस कोसळला आहे आणि आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नाशिक परिसरात देखील पावसाने जोरदार धिंगाणा घातला असून नाशिकला रात्रभर पावसाने झोडपून काढले आहे. गोदावरी नदीत पूर परिस्थिती निर्माण झालेली असून काही वाहने देखील वाहून गेलेली आहेत. राज्यातील अनेक भागांना पावसाने अक्षरश: झोडपलेले आहे आणि आता तर काही भागासाठी रेड तर कुठे यलो अलर्ट जारी केला आहे त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. 


पुढील चार दिवसांसाठी कोकण आणि मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया नागपूर, वर्धा, वाशीम, नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड, नाशिक, परभणी, भंडारा, हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, मुंबईत ८ ते १० ऑगष्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक सर्व भागात पावसाचा राडा होणार असल्याचे दिसत आहे. राज्याच्या काही भागात मात्र असा अलर्ट देण्यात आलेला नाही.  राज्यातील अनेक भागात पावसाने मोठे नुकसान केलेले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागात तसे मध्य महाराष्ट्रात या पावसाने पिकांना मोठा दणका दिला आहे. (Red alert issued for rain in some parts of Maharashtra)  आता पुन्हा मुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.   

 
रेड आणि ऑरेंज अलर्ट 
पुण्यात मुसळधार पाऊस होईल असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे, आजसाठी पुण्यात ऑरेंज तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी केला गेला आहे. पुढच्या तीन दिवसंसाठीही ऑरेंज अलर्ट आहे., कोल्हापूरसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आगामी तीन दिवसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यासाठी मात्र आज आणि उद्यासाठीही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून पुढच्या तीन दिवसासाठी देखील अलर्ट देण्यात आलेला आहे. 


सोलापूरसाठी ग्रीन अलर्ट  !
राज्यात कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट दिला गेला असला तरी सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट दिला गेला आहे. या जिल्ह्यात फारशा पावसाची शक्यता नाही. जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता कमी असून त्यापुढील तीन दिवसासाठी मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत ९ किंवा १० ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. 
 

  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !