BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ ऑग, २०२२

दोन अपघातात सोलापूर जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू !


 शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या दोन अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून एक अपघात पंढरपूर - मंगळवेढा मार्गावर तर दुसरा माढा तालुक्यात झाला आहे. 


पंढरपूर - मंगळवेढा हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. पंढरपूर - सांगोला हा तर मृत्यूचा महामार्ग ठरलेला असताना आता मंगळवेढा मार्ग देखील तेवढाच धोक्याचा ठरू लागला आहे. या रस्त्यावर सतत छोटे मोठे अपघात होत असून अनवली ते एकलासपूर दरम्यान अपघाताचे प्रमाण अधिक आहे. या रस्त्यावर काल रात्री सलग दुसरा अपघात झाला आहे. आदल्या दिवशी याच परिसरात एक अपघात झाला आणि त्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी आणखी एक भीषण अपघात झाला आणि यात मंगळवेढा तालुक्यातील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. 


पंढरपूर - मंगळवेढा रस्त्यावर एकलासपूर जवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात मंगळवेढा येथील विजय दादासाहेब सावंजी आणि आण्णासाहेब दत्तात्रय सावंजी हे दुचाकीवरील दोघे जण ठार झाले आहेत. विजयचे वय २३ तर आण्णासाहेब याचे वय २८ वर्षांचे होते. दुचाकीवरून ते मंगळवेढ्याकडे निघालेले असताना एकलासपूर जवळ कार आणि दुचाकी यांची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोराची होती की या अपघातात आण्णासाहेब हा जागीच ठार झाला तर विजय हा गंभीर जखमी झाला. (Four people died in two accidents in Solapur district) विजयला तातडीने पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु  उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे. 


वर्षांपूर्वीच लग्न !

अपघातात ठार झालेल्या आण्णासाहेब सावंजी याचा विवाह एक वर्षांपूर्वीच झाला होता. कुटुंबाचा आधार असलेला आण्णासाहेब खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्याकडे चालक म्हणून काम करीत होता.  विजय सावंजी याचे अजून लग्न देखील झालेले नव्हते. सावंजी कुटुंबातील दोन तरुण ठार झाल्याने या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे तर  मंगळवेढा देखील शोकाकुल झाला आहे.


महामार्गावर अपघात !

सोलापूर - पुणे महामार्गावर देखील एक अपघात होऊन दोन ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. होंडा सिटी कार पलटी होत विरुद्ध दिशेला जाऊन एका  कंटेनरला धडकली. हा अपघात माढा तालुक्यातील भुईंजे पाटीजवळ झाला. या अपघातात सोलापूर येथील माधुरी मल्लिनाथ चितकोटी या ३० वर्षीय महिला जागीच ठार झाल्या तर सावनी पाटील ही ७ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. सावनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण  उपचारावेळी तिचा देखील मृत्यू झाला आहे.   सोलापूर येथील सिद्धेश्वर बँकेचे संचालक एम के पाटील यांची कन्या आणि नात या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. 


कारचा चक्काचूर !

मयूर मल्लिनाथ पाटील, संगीता मयूर पाटील, ३ वर्षे वयाची मीरा मल्ल्लीनाथ चितकोटी, सलीम सय्यद, दिलीप गायकवाड हे या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात होंडा सिटी कारचा चक्काचूर झाला आहे.  होंडा सिटी कार ही सोलापूरकडून पुण्याकडे निघाली होती. ती पलटी तर झालीच पण विरुद्ध दिशेला जावून समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकली. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !