शोध न्यूज : शिंदे गटातील आमदारांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात असतानाच त्यातील काही आमदार "साहेब, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा" असे म्हणत असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिवसनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
शिवसेनेतून फुटून चाळीस आमदार बाहेर पडले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या साथीने सत्तेत आले आहेत परंतु तरीही शिंदे गटात सर्व काही आलबेल नाही हेच पुन्हा पुन्हा दिसून येत आहे. मंत्रीमंडळाचा रखडलेला विस्तार, त्यानंतर पालकमंत्र्यांची नेमणूक या बाबी महत्वाच्या ठरत आहेतच पण मंत्रीपद न मिळाल्याने अनेकजण नाराज आहेत अशा बातम्याही येत आहेत. काहींनी याबाबत वक्तव्य देखील केले आहे. सरकार स्थापन केले असले तरी सरकारचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात लटकलेले आहे. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा विषय देखील न्यायालयात महत्वाचा ठरणार आहे. त्यातच शिंदे गटातील काही आमदार शिवसेनेच्या पुन्हा संपर्कात असल्याच्या बातम्या खळबळ उडवून देत आहेत. अशा पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेनेतून फुटून शिंदे गटासोबत गेलेले आणि मंत्रीपद मिळवलेले पैठणचे मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेनेतील दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान केले आणि त्यानंतर खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. शिंदे गटातील १० ते पंधरा आमदार आमच्या संपर्कात असून ते फोन करीत आहेत, हे आमदार अस्वस्थ असून माफी मागू लागले आहेत. साहेब, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा' असे ते म्हणत असल्याचे खैरे यांनी सांगितले आहे. भाजपचे ११६ आमदार असून हे फक्त पन्नास आहेत, भाजप कोणत्याही पक्षाचे आमदार फोडतील, आपला कोटा पूर्ण करून घेतील आणि आपल्याला 'आउट' करतील हे त्यांना माहित आहे त्यामुळे ते शिवसेनेच्या संपर्कात आले आहेत असे चंद्रकात खैरे यांनी सांगितले असून यामुळे पुन्हा राजकीय खळबळ उडाली आहे. (Shiv Sena's Chandrakant Khaire's big secret blast)
हा तर 'गावठी' मंत्री !
मंत्री संदीपन भुमरे यांच्याबध्दल खैरे यांनी अत्यंत सडकून टीका करताना 'हा तर गावठी मंत्री, तो काहीही बोलत असतो, त्याला काही कळतही नाही आणि मंत्रीपद कसे चालवायचे असते हे देखील माहिती नाही. केवळ नशिबाने ते आमदार झाले आहेत" अशा शब्दात बुमरे यांची खिल्ली त्यांनी उडवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !