BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ ऑग, २०२२

अभिजित पाटील यांची आयकर चौकशी थांबली !


शोध न्यूज : साखरसम्राट अशी ओळख निर्माण केलेल्या डीव्हीपी समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांच्या विविध ठिकाणावर सुरु असलेली छापेमारी थांबली असून आयकर विभागाच्या हाती काहीच लागले नसल्याचे समजते. 


अभिजित पाटील यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी तसेच कार्यालयावर आयकर विभागाची धाड पडली आणि त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव शुगर कारखाना येथे देखील धाड पडली. या बातम्या समोर येतात तोच नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या कारखान्यावर देखील अशीच धाड पडल्याची माहिती आली. त्यामुळे अभिजित पाटील यांना टार्गेट केले असल्याचे दिसून आले. अभिजित पाटील यांनी गेल्या काही वर्षात वेगाने प्रगती करीत साखर कारखानदारीत आपले नाव केले आहे. वाळू ठेक्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास साखर सम्राटापर्यंत तर पोहोचलाच पण राजकीय पटलावर देखील त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक लढविण्याची देखील त्यांची इच्छा होती. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकहाती जिंकून त्यांनी पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात मोठी आघाडी घेतली आहे. 


पाटील यांच्या विविध ठिकाणावर एकाच वेळी आयकर विभागाच्या धाडी पडल्याने मोठी खळबळ उडाली होती तर त्यांच्यावर कशामुळे धाडी पडल्या असतील याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत होता. राजकारणातील त्यांची घोडदौड ही काही जणांना पचनी पडत नव्हती म्हणून हा सगळा प्रकार असल्याचा आरोप काही समर्थक करीत होते तर या धाडीत काय 'घबाड' सापडणार ? याची उत्सुकता अनेकांना होती. पंढरपूर येथील चौकशी संपल्यानंतर अभिजित पाटील यांना घेवून आयकर अधिकारी उस्मानाबाद येथे गेले आणि तेथे काही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आणि अखेर आयकर अधिकाऱ्यांचा हा 'दौरा' संपला. या धाडीमुळे अभिजित पाटील नरमतील अशी काहींची अपेक्षा मात्र फोल ठरली असल्याचे दिसत आहे. 


आयकर विभागाच्या या मोठ्या धाडसत्रात बरेच काही घबाड हाती लागेल असे अनेकांना वाटत होते पण तसे काही झाल्याचे दिसत नाही. कारवाई संपल्यानंतर अभिजित पाटील यांचीच याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार अभिजित पाटील हे या कारवाईनंतर अधिकच उसळी घेत असल्याचे दिसत आहे. विरोधकांनी आयकर विभागाला चुकीची माहिती पुरवली होती. एका पाठोपाठ एक साखर कारखाने कुठून आले? त्यासाठी एवढा पैसा कुठून आणला गेला ? याची चौकशी झाली पण काही कारखाने हे कर्ज घेवून भाडेतत्वावर घेतले असून त्याला भांडवलाची गरज नाही असे उत्तर आम्ही आयकर विभागाला दिले असल्याचे पाटील यांनी सांगितल्याचे म्हटले आहे.


सगळे व्यवहार कागदावर असून या धाडीत अवैध रक्कम, सोने किंवा अन्य काही मालमत्ता आयकर विभागाला मिळाली नाही, सर्व माहितीची पडताळणी केल्यावर आयकर विभाग समाधानी झाले आहे. आयकर विभागाने मागणी केलेली कागदपत्रे सादर करण्यात आली असून काही कागदपत्र सादर करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिलेला आहे. या मुदतीत उर्वरित कागदपत्र देखील सादर करण्यात येणार आहेत अशी माहिती अभिजित पाटील यांनीच दिली असल्याने पाटील या प्रकरणात अडचणीत येणार नाहीत हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. (Abhijit Patil's income tax investigation stopped) आयकर विभागाच्या या कारवाईत अभिजित पाटील यांच्याकडे काय सापडतेय? अवैध मालमत्ता अथवा अवैध व्यवहार उघडकीस येतात काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता मिळाली असल्याचे दिसत आहे. 


उत्तर दिले जाईल - पाटील 

हा सगळा प्रकार राजकीय विरोधातून करण्यात आला असून त्यांना 'जशास तसे' उत्तर दिले जाईलच, या विरोधकांचे नाव सगळ्यांना माहित आहेच पण आपणही योग्य वेळी ते जाहीर करू, जे घडले आहे ते चांगलेच घडले आहे, यापुढे आपण चौपट शक्तीने काम करू , आयकर कारवाईने आपणास बळ मिळालेले असून विरोधकांचे हे आव्हान देखील आपण पेलले आहे. या कारवाईतून विरोधकांच्या हाती काहीच लागले नाही, आता त्यांनी माझे आव्हान पेलून दाखवावे असे खुले आव्हानच पाटील यांनी दिले आहे. 


मला रोखण्यासाठीच -- !

अलीकडेच आपण पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली आणि त्यात यश आले. हे यश विरोधकांना त्रासदायक ठरले. माझा वारू रोखला पाहिजे यासाठी विरोधकांनी हे कारस्थान केले आहे पण आयकर विभागाच्या धाडीत काहीच सापडले नाही त्यामुळे आपण उजळ माथ्याने फिरू शकतो. 'विठ्ठल कोपला' असे काहीना वाटत होते पण विठ्ठल कोपला नाही तर तो आपल्याला पुन्हा एकदा पावला आहे. आपण आजवर जे काही केले ते प्रामाणिकपणे केले आणि कमविलेले आहे असे अभिजित पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे. 


'त्यांना' माझी भीती वाटते !

विठ्ठल कारखान्याची निवडणूक जिंकल्यापासून "त्यांना" माझी भीती वाटू लागली आहे.  बहुजन मराठा समाजाची मुलं प्रगती करू लागली की त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो. खुल्या मैदानात रोखता येत नसले की मग अशा प्रकाराने रोखण्याचा प्रयत्न केला जातो पण हे चुकीचे आहे. असे देखील अभिजित पाटील यांनी म्हटले आहे.    

   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !