शोध न्यूज : सेल्फी काढण्याच्या नादात विजेच्या तारेला
स्पर्श झाल्याने १७ वर्षाचा महाविद्यालयीन तरुण भाजून मृत्युमुखी पडल्याची अत्यंत हृदयद्रावक
घटना सोलापूर रेल्वे स्थानकावर घडली आहे.
स्मार्ट फोनचा जमाना सुरु झाल्यापासून सेल्फी काढण्याचे
वाढलेले प्रस्थ कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. सेल्फी काढण्याच्या नादात
अनेकजण गड किल्ल्यावरून, डोंगरावरून, कड्या कपारीवरून दरीत कोसळून ठार
झालेले आहेत. काहीजण समुद्रात वाहून गेले आहेत. सेल्फिच्या नादात जीव गमावण्याच्या घटना सतत घडत आहेत तरी देखील हा मोह जरासा कमी होत नाही. उलट अशा अघोरी आणि
जीवघेण्या धाडसाचे लोण आता सोलापूर पर्यंत पोहोचले असून सोलापुरातील एक तरुण अशा मोहात भाजून जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यूदेखील झाला आहे.
सोलापूर रेल्वे स्थानकात थांबलेल्या मालगाडीवर चढून
सेल्फी घेण्याचाही मोह एका तरुणाला झाला.
सोलापूरच्या सिद्धेश्वर पेठेतील मुकसित मुजाहिद जमादार हा १७ वर्षांचा तरुण बंद असलेल्या
रेल्वेच्या केबिनजवळ तो उभ्या मालगाडीवर चढला आणि सेल्फी घेवू लागला. मुकसित आणि
त्याचे काही मित्र यावेळी उपस्थित होते. मूकसित आणि त्याचे मित्र मालधक्क्याकडे
गेले आणि तेथे गेल्यावर सेल्फी काढण्यासाठी ते मालगाडीवर चढले. वर चढून सेल्फी
घेण्याच्या नादात असताना त्याचा हात वरच्या बाजूला असलेल्या विद्युत तारांना
लागला. विद्युत प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श होताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला
आणि तो तेथून दूर फेकला गेला. विजेचा धक्का एवढा जोरदार होता की त्याचे शरीर पूर्ण
काळेनिळे पडले.
रेल्वे पोलिसांना याची माहिती मिळताच ते धावत घटनास्थळी गेले आणि पाहणी केली असता या तरुणाचे शरीर मोठ्या प्रमाणात भाजले गेले होते. त्याच्या अंगावरील कपडे देखील पूर्णपणे जळाले होते. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अकरावीत शिकत असलेल्या या तरुणास शासकीय रुग्णालयात दाखल केले तेंव्हा त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाइकानी रुग्णालयात गर्दी केली होती. विद्युत धक्क्याने तो ९० टक्के भाजला होता त्यामुळे त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. अखेर उपचार सुरु असतानाच या तरुणाचा मृत्यू झाला. सेल्फिचा मोह जीवावर बेतला आणि पुन्हा एकदा एक तरुण जीवानिशी संपला. (College youth burned to death while taking a selfie) या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !