मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या भवितव्याचा आज सर्वोच्च न्यायालयात फैसला होत असून संपूर्ण देशाचे लक्ष न्यायालयाकडे लागलेले आहे.
शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार बाहेर पडले तेंव्हापासून राज्यात घटनात्मक परिस्थिती निर्माण झाली असून सर्वोच्च न्यायालयात हा विषय आज सुनावणीला येणार आहे. शिंदे गटातील १६ आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार असून या प्रकरणाच्या निर्णयावर फार मोठे राजकीय गणित अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही. रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे अत्यंत महत्वाची प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे.
वास्तविक ही सुनावणी १ ऑगष्ट रोजीच होणार होती परंतु ती पुढे ढकलण्यात आली आणि आजची तारीख निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच घटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असल्याने तीन सदस्यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी आज होत आहे. (Shivsena Shinde group dispute, hearing today) न्यायालयाच्या आदेशाचा राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे राज्यासह देशाच्या नजरा आजच्या सुनावणीकडे लागलेल्या आहेत.
शिवसेना आणि शिंदे गट यांच्याकडून जवळपास ९ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून त्यांची एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेना फुटल्यापासून विविध कायदेशीर पेच निर्माण झालेले असून पक्षांतर बंदी, शिंदे गटात दाखल झालेल्या आमदारांची पात्र- अपात्रता, विधिमंडळातील गट नेता, पक्ष प्रतोद यासह शिवसेनेचे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे याबाबतची सुनावणी घेण्यास मनाई करण्याबाबतची याचिका अशा अनेक याचिकांचा यात समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने याआधी देखील काही आदेश दिले आहेत. शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्यापैकी १६ आमदार अपात्र ठरविण्याचा अत्यंत महत्वाचा विषय न्यायालयात आहे. या आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
शिवसेना कुणाची आणि निवडणूक धनुष्यबाण कुणाचा ? याबाबत देखील निवडणूक आयोगात दाद मागण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेना याना प्रतिज्ञापत्र सादर करून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत परंतु याला देखील न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देणारी याचिका फेटाळून लावण्याची आणि खरी शिवसेना कुणाची हे ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच द्यावा अशी मागणी एका प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे.
शिंदे- फडणवीस असे केवळ दोघांचेच सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला आहे पण अजून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नसल्याचे सतत टीका होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची लटकती तलवार असल्याने ही प्रक्रिया रखडली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जुलै महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन अदयाप घेण्यात आले नाही. शिंदे गट बंडखोरी करून बाहेर पडला आणि पक्षप्रमुखांच्या विरोधात या आमदारांनी भूमिका घेतली आहे. शिंदे गट अजूनही आपण शिवसेनेत असल्याचे सांगत आहे, हा गट कुठल्याही पक्षात विलीन झाला नाही. घटनात्मकदृष्ट्या या गटाला कुठल्यातरी पक्षात विलीन होणे आवश्यक असल्याचे घटनेचे अभ्यासक सांगत आहेत. तसे न केल्यामुळे सर्वच्या सर्व आमदार अपात्र होऊ शकतात असे अभ्यासकांचे मत आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रमाणे निर्णय दिला तर महिन्यापूर्वी स्थापन झालेले सरकार कोसळू शकते.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती त्यात प्रारंभी १६ आमदार आणि नंतर व्हीप चे उल्लंघन केल्यामुळे ३९ आमदारांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेनेचे गट नेते अजय चौधरी यांनी विधानसभेच्या नूतन अध्यक्षांकडे केली आहे. या संदर्भात देखील शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. बंडखोर आमदार यांच्या गटाकडून देखील याचिका दाखल केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ याची सुनावणी करणार आहे. न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली यांचा या खंडपीठात समावेश आहे.
शिवसेना आणि शिंदे गट यांच्याकडून वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या असून महाराष्ट्र सरकारचे भवितव्य केवळ आणि केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. दोन्ही बाजूनी जोरदार युक्तिवाद केला जाणार असून निकाल विरोधात गेला तर सरकारला पायउतार होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे आजच्या सुनावणीला राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्व प्राप्त झालेले आहे. न्यायालय आज पूर्ण निकाल देतेय की अंतरिम आदेश देतेय याचे उत्तर देखील आज मिळणार आहे. अपात्रतेची कारवाई झाल्यास अपात्र ठरणाऱ्या आमदारांची आमदारकी देखील धोक्यात येऊ शकते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !