शोध न्यूज : एका अल्पवयीन मुलीची विक्री करून तिचे लग्न लावल्याचा एका अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सोलापूर जिल्ह्यातील चार आणि धडगाव तालुक्यातील दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात अत्याचार, बलात्कार असे गुन्हे वाढलेले असून अल्पवयीन मुलींच्या बाबतीत होणारे गुन्हे देखील सतत वाढताना दिसत आहेत. कडक कायदे असूनही असे गुन्हे वाढत असल्याने राज्यात चिंतेचा विषय बनत चाललेला असताना एका अल्पवयीन मुलीची चक्क विक्री करण्याची आणि तिचे लग्नही लावून देण्याची मोठी घटना घडली पण ती उघडकीस आली आहे. आजच्या युगात देखील मुलींची विक्री होत असल्याची बाब ही प्रत्येकाला धक्का देणारी ठरली आहे. सदर अल्पवयीन मुलगी ही नंदुरबार जिल्ह्यातील असली तरी या प्रकरणाचे सोलापूर कनेक्शन समोर आले आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील चार जणांचा यातील समावेश उघड झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीची विक्री साते तीन लाखात करण्यात आली. विक्री केल्यानंतर तिचे लग्नही लावण्यात आले. शिवाय या अल्पवयीन मुलीशी तिच्या इछेच्या विरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यात आले असा आरोप या मुलीच्या वडिलांनीच केला असून तशा प्रकारची तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यात सोलापूर जिल्ह्यातील चार आणि धडगाव तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.
सदर अल्पवयीन मुलीला संदीप पावरा आणि संगीता संदीप पावरा या दोघांनी पाहुणी म्हणून घरी घेवून जातो असे सांगून या मुलीला सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे नेले. (Sale of minor girl in Solapur district) टेंभुर्णीत गेल्यावर गोविंद नावाच्या एका व्यक्तीला सुप्रिया महाडिक हिच्या मध्यस्थीने या मुलीचे विक्री केली. गोविंद नामक इसमाने या मुलीला ३ लाख ६० हजार रुपयाला विकत घेतले आणि तिच्याशी लग्न देखील लावले.
सदर अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरोधात तिच्याशी लग्न तर लावलेच पण तिच्याशी तीन चार महिने शारिरीक संबंध या गोविंद नामक व्यक्तीने ठेवले. हा सर्व प्रकार घडत असताना मुलीच्या वडिलांना याची काहीच माहिती नव्हती. जेंव्हा त्यांना समजले तेंव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणात मध्यस्थी असलेली माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील सुप्रिया महाडिक, माढा तालुक्यातील आलेगाव येथील गोविंद नामक इसम, त्याचे आई, वडील आणि धडगाव तालुक्यातील राडीकलम येथील संदीप सुकलाल पवार आणि संगीता संदीप पावरा यांच्या विरोधात बलात्कारासह अन्य कलामांच्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कलम ३७६ (२) (एन) ३६६ (अ) ३७२, ३७३, लांगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण २०१२ चे क ५ (एल) ६ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !