शोध न्यूज : माझ्यावर धाडी टाकायला लावणाऱ्यांची घरेही काचेचीच असून मी आता दोन्ही हातांनी दगड मारीन असा सज्जड दम साखर सम्राट अभिजित पाटील यांनी भरला आहे. त्यामुळे आता ते 'जशास तसे' च्या पवित्र्यात असल्याचे दिसत आहे.
अभिजित पाटील हे नाव गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आले आणि एका पाठोपाठ एक साखर कारखाने चालवू लागले, संगोल्याचा बारा वर्षे बंद असलेला साखर कारखाना त्यांनी रुळावर आणला आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक त्यांनी एकहाती जिकून घेतली. कारखाना सभासदांनी त्यांच्यावर भरभरून विश्वास टाकला आणि पंढरपूरच्या राजकारणात अभिजित पाटील हे नाव ठळकपणे झळकू लागले. अत्यंत कठीण अवस्थेत असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा नव्या जोमाने उभा करण्याचे मोठे आव्हान त्यांचावर असतानाच त्यांच्यावर एकाएकी आयकर विभागाच्या धाडी पडल्या. पंढरपूर, उस्मानाबाद, नाशिक अशा सगळ्याच ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आणि उलट सुलट चर्चेला विषय मिळाला.
चार दिवसांच्या या धाडसत्रानंतर अभिजित पाटील सहीसलामत बाहेर आले. आयकर अधिकाऱ्यांना अपेक्षित असणारे काहीच घबाड मिळाले नाही. आयकर अधिकारी परत गेले आणि तक्रारी करणारे उघडे पडले असे चित्र सद्या तरी दिसत आहे. धाडसत्रातून 'मोकळे' होताच अभिजित पाटील यांनी विरोधकावर उघडपणे शब्दांचे हल्ले करायला सुरुवात केली आहे. केवळ विरोधावर टीकाच नव्हे तर त्यांनी थेट इशारे दिले आहेत. कुणाचेही नाव ते घेत नसले तरी त्यांचा रोख कुणाकडे आहे हे काही लपून राहिले नाही. विठ्ठलची निवडणूक जिंकली म्हणूनच हे षडयंत्र सुरु झाल्याचे पाटील यांनी ठामपणे सांगितले आहे. आपल्या घरी आणि कार्यालयावर टाकलेल्या धाडीत आयकर विभागाला काहीच गैर मिळाले नाही पण "धाडी टाकायला लावणाऱ्यांची घरेही काचेचीच आहेत, आता मी देखील दोन्ही हातानी दगड मारीन" असा दमदार इशारा देत त्यांनी आपला इरादाच जाहीर केला आहे.
आयकर विभागाने चार दिवस धाडी टाकून तपासणी केली, आम्ही त्यांना सहकार्य केले. त्यांनी चौकशी केली पण त्यात त्यांना गैर असे काही आढळले नाही. सर्व कारखाने आणि अन्य व्यवसायात आयकर विभागाला १ कोटी बारा लाख रुपयांची रक्कम आढळून आली पण ही सर्व रक्कम कागदावर होती. आयकर विभागाने ते तपासून ही रक्कम आम्हाला परत केली आहे. स्त्री धन असलेले पन्नास ते साठ तोळे सोने आढळले पण आयकर विभागाने चौकशी केली आणि हिशोबाची पडताळणी केली तेंव्हा यातही काही गैर आढळले नाही त्यामुळे त्यांनी हे सोने देखील परत केले आहे. व्यवहारात आढळलेल्या त्रुटीची कागदपत्रे सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कारखान्यांचे संचालक, सभासद, कर्मचारी आणि बंधू अमर पाटील यांचीही चौकशी आयकर विभागाने केली. विरोधकांनी या धाडी टाकायला लावल्या पण हा डाव विरोधकावरच उलटला आहे. केवळ विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु होऊ नये ही विरोधकांची इच्छा होती. पंढरपूर तालुक्यात पारंपारिक दोन राजकीय गट आहेत. (Abhijit Patil in an aggressive stance against the opposition) पण ही गटबाजी शेतकऱ्यांच्या जीवावर उठू नये अशी आपली इच्छा आहे. विठ्ठल सुरु होऊ नये अशी इच्छा असलेल्यांनी या धाडी टाकायला लावण्याचे कारस्थान केले आहे पण त्यांची घरेही काचेचीच आहेत. त्यांनी एक दगड मारला, आता आमचे दोन्ही हात मोकळे असतील असा इशारा देत पाटील यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे.
विठ्ठल कारखान्याची निवडणूक जिंकल्यापासून "त्यांना" माझी भीती वाटू लागली आहे. बहुजन मराठा समाजाची मुलं प्रगती करू लागली की त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो. खुल्या मैदानात रोखता येत नसले की मग अशा प्रकाराने रोखण्याचा प्रयत्न केला जातो पण हे चुकीचे आहे. असे देखील अभिजित पाटील यांनी म्हटले आहे.
भाजपात जाणार ?
केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने अनेकजण भारतीय पक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगितले जात आहे. आयकर विभागाच्या धाडी पडल्या आणि आयकर अधिकारी परत फिरले की भाजपचे नेते प्रवीण दरेकर आज अभिजित पाटील यांच्या कार्यालयात येऊन चहापान झाले. एवढेच नव्हे तर, 'अभिजित पाटील भाजपत प्रवेश करतील' असे दरेकर यांनी जाहीरपणे सांगितले. या भेटीचा तालुक्यात वेगळा अर्थ काढला जाऊ लागला असून भाजप प्रवेशासाठीच आयकर विभागाच्या धाडी होत्या काय ? असा सवाल देखील उपस्थित केला जाऊ लागला आहे. आयकर विभागाला काही अनुचित मिळाले नाही पण भाजप प्रवेशाची चर्चा मात्र पुढे आली यामुळे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !