BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ ऑग, २०२२

रुपेरी पडद्यावरील 'दादा' माणूस !

 


      - अशोक गोडगे 


  • मराठी प्रेक्षकांना निखळ आनंद देणाऱ्या दादा कोंडके यांचा आज जन्मदिन ! त्यानिमित्त या महान कलावंताच्या आठवणींना हा उजाळा ! 


दादा कोंडके ! केवळ नाव आठवलं तरी कोणाच्याही चेहऱ्यावर स्मितरेषा उमटल्याशिवाय राहत नाहीत. ग्रामीण प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर तर हास्याचा धबधबा फुलून येतो. मराठीच्या या चार्ली चॅप्लिनने  मराठी चित्रपटात एक इतिहास घडवला आहे.  विक्रमांच्या अनेक नोंदी केल्या आहेत.  मराठी चित्रपटातला 'दादा' नावाचा हा कलावंत म्हणजे एक चमत्कारच ठरला आहे.  दादा कोंडके आज आपल्यात नाहीत पण  कोण विसरला आहे त्यांच्या भावमुद्रेला आणि हास्याची कारंजी फुलवणाऱ्या त्यांच्या डबल मिनिंग शब्दांना ! या दादांना कधी कोण विसरू शकेल?  


मराठी चित्रसृष्टी गाजवत हिंदीच्या झगमगाटातही दादांनी आपला भोळाभाबडा नायक साकार केला. या दुनियेत ही जागांनी आपली वेगळी ओळख करून दिली. दादांना कधीच कोणी विसरू शकणार नाही! ८ ऑगस्ट १९३२ हा त्यांचा जन्म दिवस, आज तर त्यांची प्रकर्षाने आठवण येणारच ! ही आठवण मात्र अस्वस्थ करून जाते, दोन तपाहून अधिक काल दादांनी यशाचा प्रवास केला आपल्या मराठी माणसांच्या जीवनात आनंद भरभरून दिला ..... थकल्या भागल्या मराठी माणसांच्या जीवनात आनंद ओतण्याचे काम करणारे दादा एक दिवस सर्वांनाच दुःखाच्या सागरात सोडून गेले.


मूकपटांच्या जमान्यात चार्ली चॅप्लिनने आपली कमाल दाखविली आणि हा चार्ली  कायमसाठी आपला ठसा उमटवून गेला.  अगदी तसंच दादांच्या बाबतीत झालं आहे.  बोलपटाच्या जमान्यातील दादा हे चार्ली चॅप्लिन ठरले आहेत.   चार्ली चॅप्लिनपेक्षाही दादांचा अभिनय महान आहे, भाबडा  नायक मराठी प्रेक्षकांना,  सर्वसामान्य गावकरी, कष्टकऱ्यांना चांगलाच भावाला आहे.  हिंदी प्रेक्षकांवरही  मोहिनी घातलेले दादा कोंडके बँडवाले होते हे बहुतेकांना माहीत नाही.  आरंभीच्या काळात दादा कोंडके हे केवळ एक बॅंडवाले होते.  'श्रीकृष्ण बँड मुंबई' हे चांगले प्रसिद्ध झालेले होते आणि या बँडमध्ये दादा  तरंग वाजवत असायचे. या बँडने 'घर आया मेरे परदेशी' हे गाणं वाजवायला सुरुवात केली लोक चक्क पैसे उधळायचे! म्हणजे दादांनी तिथंही यशच पाहिलं होतं.  मुंबईतल्या नायगाव भोईवाडा येथे दादा लहानाचे मोठे झाले. धार्मिक, सनातनी  आणि कडक शिस्त असे  त्यांच्या घरचं वातावरण होते. दादा राहत होते तो परिसर भलताच खतरनाक.....  कधी कोण  चाकू काढेल आणि कोणाच्या पोटात खूपसेल याचा काही नेम नसायचा.  मारामाऱ्या चाकू, सुरे यांच्याशी सगळ्यांचा खेळ चालू असायचा ! बँडमध्ये तरंग वाजविणारे दादा राष्ट्रसेवादलाच्या कलापथकातही वावरायचे ! दादा म्हणायचे,  राष्ट्रसेवादल म्हणजे 'समाजवाद्यांच्या' कळपात मी वावरत असतानाही विनोदी नट झालो हाच मोठा विनोद आहे


सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव, राम राम गंगाराम, बोट लावीन  तिथं गुदगुल्या, आली अंगावर,  ह्योच नवरा पाहिजे, मुका घ्या मुका, पळवा पळवी यासारखे अनेक  मराठी चित्रपट तर तेरे मेरे बीच मे, अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे,  आगे की सोच, खोल दे मेरी जुबान असे  काही हिंदी चित्रपट देणारे  दादा महाराष्ट्रभर गाजले ते 'विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यामुळेच !  या लोकनाट्याने एक नवा विक्रम केला आणि हा विक्रम आजवर कोणी मोडू शकला नाही.  त्यांना आयुष्यभर कसलं व्यसन नसलं  तरी विक्रमांचं  मात्र त्यांना मोठं व्यसन होतं असंच म्हणावं लागेल.  त्यांचे चित्रपट धडाधड रौप्यमहोत्सव  साजरे करीत होते आणि नवनवे विक्रम दादांच्या नावावर पडत होते.  दादांचे 'असले' चित्रपट कोण पाहणार ? असा प्रश्न त्या काळी  बुद्धिवाद्यांना पडला होता. त्यांना खणखणीत  उत्तर दादांनी आपल्या कर्तृत्वाने दिले होते,  दादा कोंडके यांना खरं नाव 'विच्छा माझी पुरी करा' या लोकनाट्यानेच  दिलं.  दादांची खासियत  तेंव्हापासूनच  वेगळी होती. 


 'विच्छा' चा रोजचा प्रयोग नवा वाटायचा,  त्याचं कारण म्हणजे, ज्या गावात प्रयोग असेल तेथे गेल्यावर दादा एखादी पानटपरी किंवा सार्वजनिक ठिकाण गाठायचे ! तेथे दबा धरून बसायचे आणि लोकांची चाललेली चर्चा ऐकायचे.  रात्री प्रयोगात सगळे स्थानिक विषय आपल्या खुसखुशीत शैलीत मांडायचे आणि  धमाल उडवून द्यायचे!   दादांना एवढी स्थानिक माहिती कोठून मिळते हा प्रश्न प्रेक्षकांना पडायचा.  दादांच्या या सवयीमुळे  अनेकदा त्यांच्यावर संकटे आली पण त्यांनी काही केल्या आपली ही पद्धत  सोडली नाही याच लोकनाट्याने त्यांना नाव आणि पैसे मिळवून दिला.  दादा कोंडके महाराष्ट्राचे लाडके  झाले आणि त्यानंतर दादांनी मागे वळून पाहिलेच नाही.  जवळ आलेल्या पैशातून एखादे लॉज काढायचे आणि आयुष्याची भाकरी मिळवायची असा विचार दादांचा होता,  भालजी पेंढारकर यांना मात्र ते मान्य नव्हतं, त्यांनी  दादांना चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरवलं. भालजींना दादा आपले दैवत मानत होते.  'तांबडी माती' या चित्रपटात दादांनी नायकाच्या विलक्षण मित्राची हे भूमिकाही केली होती परंतु ती विशेष प्रभावी न ठरल्यामुळे भालजी कोड्यात पडले होते. 


जवळची सगळी पुंजी खर्च करून दादांनी "सोंगाड्या" निर्माण केला आणि त्यानंतर त्यांच्या पुढे मोठं संकट उभा राहीलं.चित्रपट पूर्ण केला पण त्यासाठी चित्रपटगृह मिळत नाही हे पाहून दादांना जबर धक्का बसला. अनेकांना हात जोडून दादा ठाकले पण त्यांच्या "सोंगाड्या"ला कोणी जवळ केले नाही.  अशीच परिस्थिती राहिली तर दादा आयुष्यातून उठणार हे दिसून येत होतं.  मराठी माणसांना न्याय देणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे त्यांनी धाव घेतली.  ठाकरे हे नाव ऐकलं तरी नकार देण्याची कुणाची हिंमत नव्हती.  दादांचा चित्रपट लावण्यास नकार देणाऱ्या चित्रपटगृहाच्या मालकास शिवसेनाप्रमुखांनी आपल्या पद्धतीने 'समजावले'. "दोन दिवसांसाठी 'सोंगाड्या' ला थिएटर द्या, चित्रपट  नाही चालला तर पुन्हा काढून टाका" असे सांगितले. दादांचा "सोंगाड्या" थिएटरमध्ये झळकला आणि पाहता पाहता हा चित्रपट तुफान गर्दी खेचू लागला. या चित्रपटाकणे रोप्यमहोत्सव  साजरा केला. दादांनी अखेरपर्यंत शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची जाणीव ठेवली आणि शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन 'जय महाराष्ट्र' चा नारा देत राहिले.   


दादांनी पडद्यावर साकारलेला भोळाभाबडा आणि बावळट नायक नवा होता.  मराठी प्रेक्षकांनी मोकळ्या मानाने तो स्वीकारला.  मराठी माणसांना तो आपलाच वाटत राहिला.  प्रेक्षकांनी पुन्हा दादांना या छबीपासून दूर जाऊ दिलेच नाही.  प्रारंभी  भालजींनी दिलेली लांबलचक नाडीची खाकी अर्धी चड्डी आणि कोपरी  दादांना आयुष्यभर पुरली.  ही वेषभूशा दादांची कायमची खूण आणि ओळख बनून गेली. दादांची ही प्रतिमा उचलून असे काही आपल्यालाही करता येईल काय ? हे अनेकांनी आजमावण्याचा प्रत्यन केला पण दादांच्या जवळही कुणाला पोहोचता आले नाही. त्यांच्या यशापर्यंत जाणं हे तर शेकडो मैल दूर राहिलं. त्यांचा प्रत्येक चित्रपट रोप्यमहोत्सव साजरा करीत राहिला. मराठी चित्रपटसृष्टी ताजीतवानी झाली, उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची जोडी पडद्यावर अजरामर झाली. त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न अनेकांनी सुरु केला आणि आजही अनके कलावंतांना त्यांची मिमिक्री करण्याचा  मोह अनावर हा होतच आहे. साधी भाषा पण दोन अर्थांचे संवाद खेडोपाडी गाजत राहिले. थकल्या भागल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे यातच त्यांचे सुख होते. 


त्यांचे दोन अर्थाचे संवाद महाराष्ट्रात गाजत असले तरी सेन्सॉर बोर्डासाठी ही एक डोकेदुखी असायची. मराठी भाषेची कसरत दादांना चांगलीच  जमली होती. स्वतःला उच्चभ्रू समजणारी माणसं दादांच्या या संवादावर नाक मुरडायची, बरेच काही बोलायची पण दादांना त्याचे सोयरसुतक नव्हते. या लोकांचं कोकलण्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही, अशा लोकांसाठी आपले चित्रपट  नाहीतच आणि त्यांनी ते पाहू नयेत असे देखील दादा सांगत असायचे. राबणारे लोक, सर्वसामान्य कष्टकरी माणूस चिंतेत जगत असताना त्यांच्या जीवनात थोडासा आनंद देणे एवढाच त्यांचा हेतू असायचा. दादा त्यात यशस्वी झाले देखील ! त्यांच्या चित्रपटाच्या नावापासूनच डबल मिनिंग सुरु व्हायचे आणि तथाकथित उच्चभ्रू लोक त्यांच्या नावाने खडे फोडत राहायचे. विशेष म्हणजे डबल मिनिंग चे संवाद आणि चित्रपटाचे शीर्षक यावर आक्षेप घेणारे चोरून का होईना पण त्यांचा चित्रपट आवर्जून पाहायचे !


दादा तसे चार्ली चॅप्लिनला प्रेरणास्थान म्हणत होते.  राज कपूर याना आदर्श मानत होते.  त्यांनाच  केंद्रस्थानी ठेवून चित्रपटांची निर्मिती करीत होते.  संवादातून दोन अर्थ निघतात आणि तेच प्रेक्षकांच्या हास्यातुन ओथंबतात. त्यांचे  'डबल मीनिंग' म्हणजे चित्रपटांचा प्राण म्हणायला हरकत नाही. पण नेमके अशा संवादावरच आक्षेप घेतला जायचा. हिंदी चित्रपटातून सगळे उघडे नागडे दाखवून समाजाची पुरती वाट लावली जात असताना दादांच्या दोन अर्थाच्या संवादावर मोठी ओरड होत होती. खून, मारामाऱ्या असे हिंसक प्रकार दाखवून गल्ला गोळा केला जात होता, जे झाकायचं तेच सारं उघडं करून दाखवलं जात असताना आक्षेप मात्र दादांच्या संवादावर घेतले जात होते. दादांच्या चित्रपटात कायम नायिकेच्या अंगावर अंगभरून साडी असायची पण त्यांच्या संवादाकडे बोट दाखवले जायचे. दादा म्हणायचे, "त्यांनी काहीही केलं तरी चालतं हो, पण मी साधं सरळ बोललो तरी याना वंगाळ लागतं ... आमचं नावाचं कानफाट्या पडलं ना ! काय करणार बाबा .........! 


 'पळवा पळवी' या चित्रपटातील एका गाण्यावरही तसाच आक्षेप आला होता.  दादांची गाणी आणि संवाद हे आक्षेपाशिवाय शिवाय पुढे जातच नव्हते.  पण त्यातला एक किस्सा मला आठवतो,  'माझ्या बापाचा सारा हा गाव' असे एक गाणे आहे.  पडद्यावर नाईका हौसा  हे गीत साकारते. हौसाच्या तोंडी असलेल्या या गाण्यात 'शरदराव, दिल्लीत झालाय ठराव" असे शब्द होते. या ओळीवर सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतली. शरदराव हे कुणाचेही नाव असून शकते पण बोर्डाने अडवलेच ! दादा आणि सेन्सर बोर्ड यांच्यातील वाद काही नवीन नव्हता पण दादा कधीच त्यांना मेचत नव्हते उलट बोर्डालाच अडचणीत आणत होते. शरदराव या शब्दाला हरकत घेतल्यावर दादांनी उलट डाव टाकला. शरदराव हा शब्द कडून 'विश्वनाथराव, दिल्लीत झालाय ठराव ' असे करा म्हणून दादांनी सांगितले आणि बोर्डाची पंचाईत झाली. विश्वनाथ प्रतापसिंग हे देशाच्या राजकारणातील मोठे नाव होते. काही काळ ते पंतप्रधान देखील होते. झाली ना बोर्डाची बोलती बंद !   


बोट लावीन तिथं गुदगुल्या चित्रपटातील 'ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं'  या गाण्याचं प्रत्येक  कडव्याला आक्षेप घेण्यात आला होता.  'सशाला बिळ कुणी  दावा" ही ओळ सेन्सॉर बोर्डाला  मान्य नव्हती. दादा त्यांना म्हणाले, अहो, ससा बिळात नाही तर आणखी कुठे राहणार? 'पांडू हवालदार' या चितपटातील 'केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का ..' यालाही आक्षेप घेतला गेला. केळेवाली बाई हेच सेन्सॉर बोर्डाला मान्य नव्हते. दादांनी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी बोर्ड मानायला तयार नव्हते. अखेर वैतागून दादा म्हणाले, अहो, हे गाणं बाईच्या तोंडी आहे, पुरुषाच्या तोंडी असतं तर मी समजू शकलो असतो. पुरुषाने 'मी केळेवाला' असं म्हटलं असतं तर वेगळं वाटलं असतं !' मोठी घासाघीस झाली आणि नंतर काहीही न कापता दादांची केळेवाली बाई पडद्यावर साकार झाली. 


सेन्सॉर बोर्ड आणि दादा यांच्यात खटके उडाले नाहीत असा त्यांचा एकही चित्रपट झाला नाही.  दादा  काहीतरी करामती करणार आणि बोर्ड आक्षेप घेणार हे ठरलेलंच ! पण बाहेर पडण्याचे मार्ग चांगलेच माहित असल्याने नेहमीच दादा जिंकत होते. कुणाला  कसं कोंडीत पकडायचं हे दादांना  माहित होतं एकदा तर जेष्ठ कवयित्री शांता शेळके या बोर्डावर असताना त्यांनी केलेली धमाल शांता शेळके यांच्या कायम लक्षात राहिली. शांताबाईंना दादा गंभीरपणे म्हणाले,  'जे आमच्या मनात नसतं ते तुमच्या ध्यानात कसं येतं? सी  रामचंद्र चित्रपटात तुम्ही एक गाणं लिहिलं आहे,  'बांबूचं घर रहायला हवे.....  हाऊस ऑफ बांबू',... गाणं  चांगलं झालं हो, पण एका कडव्यात तुम्हीच म्हटलेय,  'बांबूवर बसायला हवे'!  आता मला सांगा, हा बांबू कुठला?  दादांच्या प्रश्नावर शांताबाई काय बोलणार? बोलती बंद करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता


दादांचा 'पांडू हवालदार' हा चित्रपट देखील सेन्सॉरच्या कचाट्यात अडकला होता. विविध अंगाने त्याची तपासणी झाली. पोलीस प्रमुखांनी देखील तो पहिला आणि खास तपासणी झाल्यावर त्याला हिरवा कंदील दाखविण्यात आला. १९७५ साली या चित्रपटाला महाराष्ट्र चित्रपट महोत्सवात पारितोषिक देखील मिळालं!  डबल मिनिंगबाबत दादांचे समर्थन दमदार असायचे आणि ते पटायचे देखील ! दादा म्हणायचे, ' हिंदीतला कादर खान मद्रासी सिनेमात कसा धुडगूस घालतोय बघा ... त्याचे संवाद दोन अर्थांचे नव्हे तर थेट चावट असतात, कामुक हालचाली तर विचारू नका ! कादर खान आणि शक्ती कपूर काय बोलतील आणि काय हालचाली करतील त्याचा नेम नाही राव ! कन्नड, तामिळ, मल्याळम असे अनेक चित्रपट मी पाहिले आहेत. प्रेक्षक बेशुद्ध पडतील असे उघडे नागडे दाखवतात. तरी त्यांचे चित्रपट सगळ्यासाठी खुले असतात." 


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


"सिल्क स्मितापासून नॉयलॉन मालिनीपर्यंत सगळ्या भरलेल्या अंगाच्या आणि झुळझुळीत वस्त्रांच्या बायका ! राजकपूर  यांनी  मैल्या गंगेला किती नंगी केली आहे, काय दाखवायचे बाकी ठेवले आहे का त्यांनी ? असलं पाप  मी कधी केलं नाही, 'बोट लावीन तिथं गुदगुल्या ' या चित्रपटात पद्मजा चव्हाणसारखा मादक सौंदर्याचा ऍटमबॉम्ब कराटे स्पेशालिस्ट म्हणून वापरला पण कपड्यात काटकसर नाही केली. उलट अंगभरून कपड्यात तिला सादर केली. असं असतानाही आमच्याच नावानं बोंब ...  आम्हीच कानफाट्या न्हाय का !... बोंबला तिच्या मायला....................!!





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !