BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑग, २०२२

गोळीबार करून साडे तीन कोटी लुटलेले दरोडेखोर सापडले !



शोध न्यूज : सोलापूर - पुणे महामार्गावर पाठलाग आणि गोळीबार करून साडे तीन कोटींची लुट करणारी टोळी अखेर इंदापूर पोलिसांनी ७२ तासात जेरबंद केली असून या टोळीत सोलापूर जिल्ह्यातील दरोडेखोरांचा सहभाग आहे. 


सोलापूर- पुणे महामार्गावर वरकुटे पाटीजवळ  (इंदापूर) अत्यंत थरारक आणि सिनेस्टाईल घटना घडली होती.  या थरारक घटनेने पोलीस दल देखील हादरून गेले आहे. भावेशकुमार अमृत पटेल हे गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील असून सद्या ते मुंबईत राहत आहेत. त्यांना सोलापूर पुणे महामार्गावर साडे तीन कोटींना लुटले आणि त्यांच्या गाडीचा पाठलाग करीत गोळीबार देखील करण्यात आला होता.या मार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती आणि यामुळे अर्ध्या महाराष्ट्रात खळबळ उडालेली होती. भावेशकुमार आपल्या चार चाकी स्कर्पिओ गाडीतून (टीएस ०९ ईएम ५४१७)  ते निघाले असता वरकुटे पाटी येथे गतीरोधकावर त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला आणि एका वेगळ्याच घटनेला त्यांना सामोरे जावे लागले. 


गतीरोधकामुळे त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला असतानाच चार अज्ञात लोक पुढे आले. हातातील लोखंडी टॉमी दाखवत गाडी थांबविण्याचा प्रयत्न करू लागले.  प्रसंग ओळखून पटेल यांनी गाडीचा वेग वाढवला आणि पुण्याच्या दिशेने वेगात गाडी पुढे नेली. त्यानंतर या लुटारूनी स्विफ्ट आणि टाटा कंपनीच्या गाडीतून पाठलाग करण्यास सुरुवात केली. (Solapur - Pune Highway) लुटारू पाठलाग करीत आहेत हे पाहून पटेल यांनी आपल्या गाडीचा वेग आणखी वाढवला. पटेल यांची गाडी वेगाने निघालेली पाहून लुटारू देखील वेगाने पाठलाग करू लागले. हिंदी नव्हे तर इंग्रजी चित्रपटात शोभेल असे पाठलागाचे थरारनाट्य सोलापूर - पुणे महामार्गावर सुरु झाला होता. 


पटेल यांची गाडी हातची निसटून जातेय असे वाटताच लुटारूनी पटेल यांच्या गाडीवर गोळीबार सुरु केला. पटेल बंधू जीवाच्या आकांताने गाडी पळवत राहिले पण काही अंतरावर गेल्यावर त्यांची गाडी थांबविण्यात लुटारू यशस्वी झाले. भावेशकुमार पटेल आणि विजयकुमार यांना या चौघांनी मारहाण सुरु केली. याचवेळी त्यांनी गाडीत असलेली ३ कोटी ६० लाख रुपयांची रोकड आणि १४ हजार रुपये किमतीचे दोन आणि १२ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा ऐवज लुटून नेला. अत्यंत थरकाप उडविणारी ही घटना काही वेळेत घडून गेली होती. 


या थरारक घटनेबाबत भावेशकुमार पटेल यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आणि त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चार लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेने पोलीस दल देखील हादरून गेले होते आणि इंदापूर पोलिसांपुढे या तपासाचे एक मोठे आव्हान उभे राहिले होते. इंदापूर पोलिसांनी या तपासासाठी तीन पथके नेमली आणि त्यांना तपासावर पाठवले. पुणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्तबगार पोलिसांनी अत्यंत जलदगतीने तपास लावत या टोळीचा छडा लावला आणि त्यातील सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटीतील १ कोटी ४३ लाख २० हजार रुपये देखील जप्त करण्यात यश मिळवले आहे. 


पोलिसांच्या तपासात सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील सागर शिवाजी होनमाने याने आपल्या अन्य साथीदारांसह हा मोठा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरु झाला आणि पोलिसांनी होनमाने याच्यासह कुर्डूवाडी येथील बाळू उर्फ ज्योतिराम चंद्रकांत कदम (३२), इंदापूर तालुक्यातील न्हावी येथील  रजत अबू मुलांनी (वय २४) यांना ताब्यात घेतले आणि आपल्या पद्धतीने तपास सुरु केला. त्यानंतर त्यांनी आपण हा गुन्हा केला असल्याची कबुली पोलिसांना दिली.  पोलिसांनी सागर होनमाने याच्याकडून ७२  लाख आणि रजत मुलांनी याच्याकडून ७१ लाख २० हजार रुपये असे १ कोटी ४३ लाख २० हजार एवढी लुटीतील रक्कम हस्तगत केली. 


इकडे यांच्या मुसक्या आवळल्या जात असतानाच स्थानिक गुन्हे शाखा आणि इंदापूर पोलीस यांची एकेक पथके राजस्थान येथे पाठविण्यात आली होती. या पथकाने माढा तालुक्यातील वेणे येथील ३३ वर्षीय गौतम अजित भोसले, इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील किरण सुभाष घाडगे, भूषण लक्ष्मीकांत तोंडे, यांना राजस्थानमधील उदयपुर येथून ताब्यात घेतले. अत्यंत थरारक घटनेतील गुन्ह्यात प्रचंड  मोठी लुट करण्यात आली होती आणि चित्रपटात पाहावा असा प्रकार सोलापूर - पुणे महामार्गावर घडला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी मात्र अत्यंत जलदगतीने तपास लावला आणि दरोडेखोरांना गजाआड केले. सहा जणांना अटक केली असली तरी या टोळीत आणखी काही जण असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत असून त्या दिशेने देखील तपास सुरु आहे.  


भावेशकुमार पटेल यांच्या गाडीत एवढी मोठी रक्कम कशी ? हा देखील एक असून एवढी मोठी रक्कम घेवून हे नेमके कुठे आणि कशासाठी निघाले होते याची चौकशी पोलीस तपासात होईलच पण सोलापूर - पुणे महामार्गावर असा  थरार पहिल्यांदाच  घडला आहे. (Robbery on Solapur Pune Highway, Six robbers arrestedएवढा मोठा प्रकार करणारी टोळी ही परराज्यातील असावी असे वाटत असले तरी ही टोळी सोलापूरच्या माढा तालुक्यातील आणि पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !