BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ ऑग, २०२२

पंढरीच्या तरुणाची गळफास लावून आत्महत्या !



पंढरपूर  : पंढरपूर शहरातील एका तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली असून या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. 


अपघात आणि आत्महत्या या घटना अलीकडे नित्याच्या होऊ लागल्या असून तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले असल्याने हा एक चिंतेचा विषय बनला आहे. प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार असतातच पण अलीकडे तरुण कुठल्याही कारणाने निराश झाला की त्याला आत्महत्या हा एकच पर्याय दिसत आहे. अशावेळी ते आपल्या वृद्ध माता पित्याचा देखील विचार करीत नाहीत आणि थेट आपल्या आयुष्य एका क्षणात संपवतात. पंढरपूर शहरातील एका उमद्या तरुणाने कोल्हापूर येथे दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील रायगड कॉलनीत (पाचगाव) पंढरीतली तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. राज सुनील मुळे असे आत्महत्या केलेल्या २६ वर्षे वयाच्या तरुणाचे नाव आहे. 


पंढरपूर येथे राज सुनील मुळे याचा वडिलोपार्जित कुंकू विक्रीचा व्यवसाय असून तो नोकरी, व्यवसायाच्या शोधात होता. त्यासाठी साधारण एक महिन्यांपूर्वी पत्नी आणि आपल्या पाच वर्षांच्या मुलासह तो कोल्हापूर येथे गेला होता. त्याच्या पत्नीकडे नातेवाईक हे कोल्हापूर येथे स्थायिक आहेत त्यामुळे त्यांची मदत घेऊन तेथेच काही नोकरी करावी अथवा काही व्यवसाय करावा असा निश्चय करून तो पंढरपूर येथून कोल्हापूर येथे गेला होता. कोल्हापुरात गेल्यावर त्याने रायगड कॉलनी येथे एक घर भाड्याने घेतले आणि याच घरात तो आपल्या पत्नी आणि मुलासह रहात होता. नोकरी, व्यवसाय करण्याच्या हेतूने त्याने पंढरपूर सोडले होते परंतु अचानक त्याने हे जग सोडले आणि कुटुंबाला मोठा धक्का दिला. 


राज याची पत्नी आणि मुलगा हे कोल्हापूर येथून पंढरपूरला आले आणि दुसऱ्याच दिवशी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पंढरपूर येथे आलेल्या पत्नीने त्याला फोन केला पण त्याचा फोन उचलला जात नव्हता. पत्नीने कोल्हापूर येथे असलेल्या आपल्या भावाला याची माहिती दिली. भाऊ तातडीने रायगड कॉलनी येथे पोहोचला असता घराला आतून कडी लावली असल्याचे दिसून आले. दरवाजा आतून बंद होता आणि हाक मारून, दरवाजा वाजवून देखील आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर दरवाजाचा कडी कोयंडा तोडण्यात आला आणि आत प्रवेश केला गेला. यावेळी राज याचा मृतदेह एका दोरीला लटकताना दिसून आला. छताच्या हुकाला दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला तेथून खाली उतरविण्यात आले आणि तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 


राज मुळे या उमद्या तरुणाने कशासाठी आत्महत्या केली याचे नेमके कारण समोर आले नाही परंतु कुटुंबावर मात्र हा फार मोठा आघात झाला आहे. पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ असा त्याचा परिवार असून तरुण असलेल्या या राजने टोकाचे पाऊल उचलल्याने मोठा धक्का बसला आहे. (Pandharpur youth commits suicide in Kolhapur by hanging himself) पंढरपूर येथे त्याचा मित्रपरिवार देखील मोठा होता, या सर्वानाच या घटनेने मोठा हादरा बसला आहे.    

  

 

अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !