BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ ऑग, २०२२

पंढरपूर पोलिसांच्या हाती लागले मोठे 'घबाड' !

 


पंढरपूर शहर पोलिसांनी मोठी कामगिरी केली असून दोन मोबाईल चोरांसह लाखो रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. 


अलीकडे सगळीकडेच मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मोबाईल चोर लक्ष ठेवून आणि नागरिकांच्या गाफीलपणाचा गैरफायदा उठवत मोबाईल चोरतात आणि मिळेल त्या किमतीला  विकतात. मोबाईल चोरीला जाण्याने मोबाईलमधील साठवून ठेवलेली महत्वाची माहिती देखील जात असते आणि यामुळे मोठी अडचण निर्माण होते. मोबाईल चोरी झाल्यानंतर त्यातील सीमकार्ड फेकून देण्यात येते आणि फोनमध्ये असलेली महत्वाची  माहिती देखील नष्ट केली जाते. कितीही दक्षता घेतली तरी मोबाईल चोर शिताफीने नागरिकांचे मोबाईल चोरत असतात. पंढरपूर शहर पोलिसांनी मात्र अशा दोन मोबाईल चोरांना चांगलाच इंगा दाखवला असून त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचे पन्नास मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. 


सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज पंढरपूर येथे ही मोठी माहिती दिली आहे. पंढरपूरमधील चोरी गेलेल्या एका मोबाईलचा शोध पोलीस घेत होते आणि हा शोध घेताना तब्बल पन्नास मोबाईल फोनचा शोध लागला आणि  दोन सराईत गुन्हेगारांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ३ लाख ८९ हजार रुपये किमतीचे पन्नास मोबाईल शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केले आहेत. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरीला गेल्याचा  एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा शोध पोलीस घेत होते. चोरीला गेलेल्या या मोबाईलचा पुन्हा वापर केला जातोय का ? तसेच तो कोण वापरत आहे ? यांच्या अनुषंगाने पोलिसानी गोपनीय माहितीसह टेक्निकल पाठपुरावाही केला. त्याच्या आधाराने हा मोबाईल सांगोला येथे असून तो एक तरुण वापरत असल्याचे निदर्शनास आले. 


प्राप्त केलेल्या माहितीनुसार सांगोला येथील तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने एक व्यक्तीकडून  आपण हा जुना मोबाईल खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार सदर व्यक्तीला ट्रॅक करण्यात आले आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सदर व्यक्ती हा सराईत चोर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याने आत्तापर्यंत अनेक मोबाईल चोरलेले असून त्याच्याकडून ४९ मोबाईल हस्तगत करण्यात आले. मोबाईल चोरी करून त्याची विक्री करणारे आणखी कुणी त्याच्या माहितीत आहेत का? याची चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी एका व्यक्तीचे नाव पोलिसांना समजले. (Recover fifty stolen mobiles by Pandharapur Police) या दुसऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून देखील एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. 


सदर दोन सराईत चोरांकडून एकूण पन्नास चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ३ लाख ८९ हजार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलपैकी सुमारे २० मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. उर्वरित लोकांनी गुन्हे दाखल केलेले नाहीत. सदर लोकांनी गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले असून पंढरपूर पोलिसांच्या कामगिरीबद्धल त्यांनी कौतुक केले आहे.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !