BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ ऑग, २०२२

महिला चोरट्यांची टोळी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत !



शोध न्यूज : दागिने चोरीच्या तीन घटनातील ४ लाख ऐंशी हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आले असून चोरट्या चार महिलांची टोळी गजाआड करण्यात आली आहे.  


अलीकडच्या काळात सोलापूर जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढीस लागल्याने नागरिकात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. घराला कुलूप लावून परगावी जाण्याचे धाडस होत नसून अनेकांनी परगावी जाणेच टाळले आहे. बंद घर दिसले की त्या घरात चोरी होऊ लागली आहे. शिवाय रस्त्यावर देखील फसवणूक करून, पोलीस असल्याची बतावणी करून किंवा निर्जन रस्त्यावर अडवून चोरी, लुट करण्याचे प्रकार सुरु आहेत. मंगळवेढा पोलिसांनी मात्र नागरिकांना दिलासा मिळेल असे काम केले असून दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांच्याचोरीच्या तीन घटना उघडकीस आणून चार लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.


एस टी वसाहतीतील चंद्रकला सुग्रीव दराडे या ५२ वर्षांच्या महिला एस टी ने सोलापूरला जात असताना त्यांच्या पिशवीतील ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. नेकलेस, कर्णफुले, नथ, पेडल, मंगळसूत्र अशा दागिन्यांचा यात समावेश होता. या घटनेत दराडे यांच्याशी चार महिलांनी जवळीक साधली होती ही बाब लक्षात आली होती. त्यामुळे पोलिसांनी या दिशेने आपला तपास सुरु केला होता,  पोलीस तपास करीत उस्मानाबाद जिल्ह्यात पोहोचले आणि अंजली राम भुई, गीता बालाजी भोगी, कीर्ती शिनो भोई, ज्याती बालाजी भोगी (मुकुंदवाडी, जि. औरंगाबाद) या चार महिलांना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे ताब्यात घेण्यात आले. या महिलांनी सदर चोरीची कबुली तर दिलीच पण चोरलेले सोने मुकुंदवाडी येथील राहू उर्फ रवी उर्फ मल्लेश गजवार याच्याकडे दिल्याचे सांगितले. सदर दागिने बदलापूर येथील दुकानातून काढून दिले.   


मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथील प्रियांका सुनील शिंदे यांच्या घरी तर पाहुणा म्हणून आलेल्या नातेवाईकाने चोरी केली होती. माढा तालुक्यातील बेंबळे येथील सोमनाथ हनुमंत शिंदे हा नातेवाईक घरी आला आणि  त्याने जेवण झाल्यावर उघड्या कपाटातील मंगळसूत्र, कानातील वेल, झुबे असे एक लाखांचे दागिने चोरून नेले होते. याबाबत प्रियांका शिंदे यांनी फिर्याद दिली होती. तसेच  भाग्यश्री कोष्टी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन विश्वासाने नेली परंतु परत देण्यास नकार दिला होता, भाग्यश्री आणि उमदी येथील मानकेश मनोहर लोणी यांची ओळख आयुर्वेद औषधांच्या देवाणघेवाणीतून झालेली होती. भाग्यश्री यांच्या गळ्यातील चेन छान दिसत आहे त्यामुईल कार्यक्रमासाठी म्हणून लोणी याने चेन मागून घेतली पण कार्यक्रम झाला तरी तो ती परत द्यायला तयार नव्हता. याची फिर्याद दाखल झाल्यावर पोलिसांनी लोणी यालाही ताब्यात घेतले होते.

 

सदर चोरीचा तपास सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे, हवालदार सलीम शेख, दयानंद हेंबाडे, खंडाप्पा हाताळे, श्रीमंत पवार, मनसिध्द कोळी, दत्तात्रय येलपले, महेश पोरे, विठ्ठल विभूते, पुरषोत्तम धापटे, वैभव घायाळ यांनी केला आणि लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. (Gang of female thieves arrested, stolen gold recovered)  या यशामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.   

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !