BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ ऑग, २०२२

पोलिसांनी ट्रॅक्टर चोराच्या आवळल्या मुसक्या !



माढा : घरासमोर उभा केलेला ट्रॅक्टर चोरट्यांनी चोरून नेला पण पोलिसांनी मोठ्या कौशल्याने माहिती काढत भामट्या चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. जवळपास साडे चार वर्षांनी या चोरीचा तपास लागला आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील रेल्वे लाईन परिसरातील माने यांच्या घरासमोर उभा केलेला सोनालिका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर हेड आणि निळ्या रंगाची डंपिंग ट्रॉली चोरीला गेल्याची फिर्याद मोहोळ तालुक्यातील देगाव वाळूज येथील गोवर्धन जनार्दन अतकरे यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. एकूण सात लाख ७१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता, अतकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, दारात उभा केलेला ट्रॅक्टर देखील चोरी होतो या घटनेने चिंता व्यक्त होत होती आणि चोरांची एक भीतीही मनावर आलेली होती. २४ डिसेंबर २०१७ च्या पहाटेच्या वेळी अज्ञात चोरटयांनी ट्रॅक्टरची चोरी केलेली होती. 

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस आरोपीचा शोध घेऊ लागले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक देखील या शोध मोहिमेवर कार्यरत झाले होते. हे पथक माढा - शेटफळ रस्त्यावरील हॉटेल केसरी समोर असताना त्यांना काही सुगावा लागला. गेल्या काही वर्षांपूर्वी चोरीला गेलेला एक ट्रॅक्टर उपळाई बुद्रुक येथील बजरंग वाकडे यांच्याकडे असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. पोलिसांनी लगेच उपळाई बुद्रुक गाठले तेंव्हा त्यांना त्याच वर्णनाचा ट्रॅक्टर हेड आढळून आला. सदर ट्रॅक्टर हेड पोलिसांनी ताब्यात घेतला आणि वाकडे यांच्याकडे अधिक चौकशी केली. सदर ट्रॅक्टर हा जळगाव येथील परिचयाच्या दिगंबर रणसिंग यांच्याकडून घेतला असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. (Police succeeded in arresting the tractor thief) २०१७ साली चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचे मजबूत धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू लागले होते.  


मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जळगाव गाठले आणि दिगंबर रणसिंग याला ताब्यात घेतले. आपल्या पद्धतीने पोलिसांनी त्याच्याकडून माहिती काढण्यास सुरुवात केली असता सगळी माहिती मिळू लागली. चार वर्षांपूर्वी त्याने आपल्या साथीदारांसह माढा येथून ट्रॅक्टर चोरल्याचे कबूल केले आणि ट्रॉली आपण स्वतः वापरत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली,  एवढी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे काम आता सोपे झाले होते.


पोलिसांनी  ट्रॅक्टर आणि डंपिंग ट्रॉली, चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि काही वर्षे केवळ दाखल असलेल्या गुन्हयाची पूर्ण उकल झाली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जळगाव येथील दिगंबर अरुण रणसिंग याला अटक करण्यात आली असून त्याचा माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील साथीदार प्रदीप बजरंग वाकडे हा मात्र पसार झाला आहे.   


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !