BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ ऑग, २०२२

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार !




औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर एकेक अडचणी येत असतानाच आता एका नागरिकाने शिंदे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील चाळीस आमदारांना फोडून मुख्यमंत्रीपद मिळवले पण अजून ते कायद्याच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. नवे सरकार स्थापन केले असले तरी मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री या दोघांचेच हे सरकार काम करीत आहे. सरकार स्थापन होऊन एक महिना लोटला तरी देखील त्यांना मंत्रीमंडळ स्थापन करता आलेले नाही. या नव्या सरकारचे सर्व भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असून सर्वोच्च न्यायालयातील १ ऑगष्ट रोजी होणारी सुनावणी आता ३ ऑगष्ट रोजी होणार आहे. या सुनावणीत काही प्रतिकूल निर्णय आल्यास हे सरकार कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात नवा घटनात्मक आणि राजकीय पेच निर्माण होण्याची भीती आहे. टांगती तलवार असली तरी मुख्यमंत्री शिंदे हे निर्णय घेत आहेत तसेच राज्यात दौरे देखील करीत आहेत. 


सुप्रीम कोर्टातील निकाल प्रलंबित असल्याने धाकधूक कायम असतानाच एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातूनच एक तक्रार थेट न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील दालनात सत्यनारायणाची पूजा करून कामाला सुरुवात केली होती. हे घटनेच्या विरुद्ध असल्याचा मुद्दा पुढे करीत एका नागरिकाने ठाणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या प्रकाराबाबत राज्यभर चर्चाही झाली आहे आणि अनेकांनी याला घटनेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या पुजेबाबत राज्यात राजकीय टीका देखील झाली होती परंतु आता हे प्रकरण न्यायालयात दाखल आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देतेय याकडे राज्याचे लक्ष लागलेले असतानाच आता औरंगाबाद येथे एका नागरिकाने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस ठाण्यात केली आहे. 


औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात आनंद कस्तुरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात एक तक्रार दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आहे. परंतु हाच आता वादाचा विषय बनला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमनाचे उल्लंघन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असल्याची ही तक्रार आहे. मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमाना उपस्थित राहिले, त्या कार्यक्रमात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले आहे, रात्री दहा वाजून गेल्यानंतरही लाऊडस्पीकरवर कार्यक्रम सुरु होता त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आनंद कस्तुरे यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. 


पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी पोलिसांनी कुठलाच गुन्हा दाखल केलेला नसून चोकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. (Police complaint against Chief Minister Eknath Shinde)थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातच गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे झाली असल्याने चर्चेचा विषय बनला असून पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


अजितदादा म्हणाले --,

नियम सर्वाना सारखे असतात पण इथे मुख्यमंत्रीच नियम मोडायला लागले तर कसे होणार ? पोलीस तरी काय करणार ? ज्यांनी आदेश द्यायचे तेच नियमांचा भंग करू लागलेत. मुख्यमंत्री असो की सामान्य माणूस, नियम सगळ्यांनाच असतात, नियमातील वेळ झाली की प्रत्येकाचा माईक बंद झालाच पाहिजे पण तसे घडताना दिसत नाही  अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. 

   

उद्यानाचे नाव वादात !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने पुण्याचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्वखर्चातून एक उद्यान तयार केले असून त्याला नामदार एकनाथभाई शिंदे उद्यान असे नाव दिले आहे. या उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते आज होणार होते परंतु ते ऐनवेळी रद्द करण्यात आले आहे. परवानगी न घेता हे उद्यान उभारण्यात आले असल्याने ऐनवेळी उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला गेला असून उद्यानाचे नाव देखील काढून टाकले गेले आहे. महानगर पालिकेच्या जागेतील हे उद्यान नियमभंग करणारे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत परंतु उद्यानाचे उद्घाटन करणार नाहीत.


    




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !