BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ ऑग, २०२२

शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार राडा !

 





डोंबिवली : शिवसेनेच्या शाखेत जबरदस्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्याचा प्रयत्न शिंदे समर्थकांनी केल्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला आहे.

 

शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील अंतर आता अधिकाधिक वाढू लागले आहे. कालपर्यंत एकत्रित 'शिवसेना झिंदाबाद' चा नारा देणारे एकमेकाबद्धल अपशब्द वापरू लागले आहेत तर आता हे प्रकरण हातघाईवर आले आहे. कालच हिंगोली येथे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी गद्दार आमदारांच्या गाड्या फोडण्याचे आवाहन केले तर बंडखोर गटाकडून प्रतिआव्हान दिले गेले. बंडखोर आमदार गुवाहाटी येथे रमलेले असताना शिवसैनिकांनी त्यांची कार्यालये फोडली. एकनिष्ठ शिवसैनिक या बंडखोरीमुळे प्रचंड संतप्त आहेत परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शांततेचे आवाहन केल्याने शिवसेना शांत आहे. वरून शांतता दिसत असली आतून असलेली खदखद मोठी असल्याचे सतत जाणवत आहेच आणि आता थेट या दोन्ही गटात तुफानी राडा होण्याचा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. 

 

शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक चाळीस आमदार अजूनही आपण शिवसेनेतच आहोत असे सांगत आहेत आणि शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर देखील दावा करू लागले आहेत. खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना अशी विभागणी होऊ लागली असून एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसनेच्या पदाधिकाऱ्यांच्या देखील नेमणुका करणे सुरु केले आहे, अर्थात हा वाद न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे त्यामुळे त्यांच्या निर्णयावर अधिकृत शिवसेना कुणाची हे ठरणार आहे. परंतु त्या आधीच शिवसेनेवर दावा सांगितला जात आहे आणि यातूनच आज मोठा हंगामा ( Clashes between Shiv Sena and Shinde supporters) झाला आहे.


शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत एकनाथ शिंदे गटाचे समर्थक अचानकपणे आले आणि त्यांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो जबरदस्तीने लावल्यामुळे शिवसेना आणि शिंदे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. पूर्वी डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेत एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावलेले होते परंतु  शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर या शाखेतून हे फोटो काढून टाकण्यात आले होते. हे फोटो काढणे शिंदे समर्थकांना पटलेले नव्हते. आज शिंदे गटातील सुमारे पाचशे समर्थक आले आणि ते बळजबरीने शिवसेना शाखेत (Shivasena Shakha) घुसले. शिवसेनेची ही मध्यवर्ती शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे येथे एकच गोंधळ उडाला.


शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्यात यावेळी जोरदार राडा सुरु झाला. दोन्ही गट परस्परांना भिडले आणि धुमश्चक्री सुरु झाली. यात महिला शिवसैनिकांचा देखील सहभाग होता. सगळ्याच वयोगटातील शिवसैनिक आणि शिंदे समर्थक एकमेकावर धावले, परस्परांशी भिडले गेले. जोरदार धक्काबुक्की आणि शिवीगाळ सुरु झाली. यावेळी येथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना देखील या धक्काबुक्कीचा प्रसाद मिळाला. डोंबिवली पोलीस तातडीने धावले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.  


शिंदे गटाचे समर्थक मोठ्या तयारीनेच शिवसेना शाखेत आले होते. ते थेट शाखेत घुसले आणि सोबत आणलेल्या ड्रील मशीनने भिंतीला छिद्र पाडले. तेथे एकनाथ शिंदे (Ekanath Shinde)  आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो लावले आहेत तेथेच शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले गेले. यातून हा राडा झाला असून दोन्ही बाजूंचा कार्यकर्त्यांना जोरदार मार लागला असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. 


उद्या सुनावणी !

शिंदे- फडणवीस सरकारच्या भवितव्याची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालयात उद्या काही निकाल आला तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे १६ आमदार जर सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले तर महिन्यापूर्वी स्थापन झालेले दोन मंत्र्यांचे सरकार देखील कोसळू शकते.


संघर्ष वाढण्याचे संकेत !

शिवसेनेत फुट पडली असून दोन गटात शिवसेना विभागली आहे. त्यामुळे यापुढे शिवसेना आणि शिंदे समर्थक यांच्यात संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. ठाणे शहरात शिवसेना सशक्त आणि एकसंध होती पण आता दोन गटात विभागणी झाली आहे आणि संघर्ष आता वेगळे वळण घेवू लागला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर निवडणुकीच्या कालावधीत या संघर्षाचा भडका होण्याची देखील भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !