BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ ऑग, २०२२

महावितरणच्या नावाने ग्राहकांची फसवणूक !

 




ऑनलाईन फसवणुकीचा आणखी एक फंडा आला असून महावितरणच्या नावाने असंख्य ग्राहकांची फसवणूक झाली असून महावितरणच्या नावाने एक मेसेज पाठवला जात असून आर्थिक गंडा घातला जात आहे. 


इंटरनेट सुविधा आल्यापासून सगळीच कामे सोपी झाली आहेत आणि नव्या दुनियेला ही मोठी भेट मिळाली आहे. इंटरनेटच्या जमान्यात सगळे काही जागेवर उपलब्ध होऊ लागले असून विविध सेवा या इंटरनेटच्या माध्यमातून मिळत आहेत. नव्या पिढीसाठी तर हे वरदान असून भामटे मंडळींमुळे मात्र हा मोठा शाप देखील ठरू लागला आहे. आज प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन असून विविध महत्वाची कामे इंटरनेटच्या माध्यमातून केली जात आहेत. ही सुविधा जेवढी सोयीची झाली आहे तेवढीच ती नुकसानीची देखील होऊ लागली आहे. थोडासा गाफिलपणा देखील या नुकसानीचे कारण ठरत आहे. 


पैशाची देवाणघेवाण देखील मोबाईलवरून केली जात आहे. घरबसल्या विविध सोई मिळत असताना घरबसल्या भामटे मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे. शेकडो मैल दूर असलेल्या अज्ञात व्यक्तीकडून आपल्या बँकेच्या खात्यावरील रक्कम गायब केली जात आहे. विविध प्रकारच्या फसवणुकीचे फंडे अवलंबले जात असताना आता या भामट्याने वेगळाच फंडा वापरायला सुरुवात केली असून प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरले आहे. आपल्या आजूबाजूला फसलेल्या लोकांची माहिती असते तरी देखील लोक फसतात आणि ऑनलाईन फसवणुकीचा गंडा घालून घेतात. 


महावितरणच्या नावाने गंडा घालण्याचा हा नवा फंडा असून एक मेसेज पाठवून ही लूट केली जात आहे. वीज ही प्रत्येकाची आवश्यक बाब असून काही मिनिटे वीज गेली तरी अनेक अडचणी येत असतात. महावितरणच्या नावाने मोबाईलवर एक मेसेज येऊ लागला आहे आणि तातडीने वीज भरा अन्यथा वीज कनेक्शन कापण्यात येईल अशा अर्थाचा हा मेसेज असतो. अर्थातच ज्यांची वीज बिल भरले आहे त्यांना देखील असा मेसेज येतो. वीज बिल न भरलेले अनेक ग्राहक असतात आणि त्यांना ठराविक वेळेला वीज कापण्यात येणार असल्याचे संदेश येतो आणि ऑनलाईन बिल भरण्याचे सांगून एक लिंक देखील दिलेली असते.


अलीकडे बहुसंख्या वीज ग्राहक ऑनलाईन बिल भरतात. घरबसल्या विजेचे बिल भरण्याची चांगली सुविधा महावितरणने दिली असून त्याचा लाभ  घेतला जातो आणि याचाच गैरफायदा उठवत भामटे गंडा घालू लागले आहेत. रात्री झोपण्याच्या वेळेला हा मेसेज येतो आणि "तुमचं वीज बिल भरलेलं नाही, पुढील तासाभरात तुमचे वीज कनेक्शन कट केले जाणार आहे, हे टाळायचे असेल तर आम्ही पाठवत असलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन बिल तात्काळ भरा" असा मेसेज वाचून अनेकजण घाबरून जातात. रात्रीच्या वेळेस वीज कापली जाणे हे अडचणीचे ठरत असते. रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा बंद होऊन मोठी अडचण होईल या भीतीने ग्राहक तातडीने या लिंकवर जाऊन ऑनलाईन बिल भरतात आणि सायबर गुन्हेगार विनासायास ग्राहकांची लूट करतात.

 
राज्यात सगळीकडे अशा प्रकारचे मेसेज पाठवून फसवणूक केली जात आहे मागील सात महिन्यात ऑनलाईन फसवणुकीच्या १५ हजार ४२६ तक्रारी  फक्त पुणे शहरात सायबर पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत तर ३११ वीज ग्राहकांनी अशा प्रकारे आपली फसवणूक झाल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे केल्या आहेत. 'MSEB' अथवा 'MSEDCL' अशा नावाने हा मेसेज येत असल्याने ग्राहकांचा विश्वास बसतो आणि तेथेच फसवणूक होत असते. (Online fraud of customers in the name of Mahavitaran) त्यामुळे अशा मेसेजपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.  महावितरणने देखील ग्राहकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.    


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !