BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० ऑग, २०२२

आ. शहाजीबापू पाटील म्हणाले, मी "नॉट रिचेबल" नव्हतोच !

 



पंढरपूर : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली पण आज बापूनी यावर खुलासा केला असून नाराज वगैरे काही नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 
शिंदे- फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला पण विस्ताराच्या आदल्या दिवसांपासूनच शिंदे गटात नाराजीच्या फटाकड्या उडायला सुरवात झाली होती. पहिली नाराजी आमदार संजय शिरसाट यांनी असल्याचे समोर आले होते. गेल्या काही दिवसांपासून शिरसाट हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर दिवस रात्र टीका करीत होते. काहीही झाले तरी ते थकताना दिसत नव्हते, शिरसाट यांना पहिल्याच विस्तारात मंत्रीपदाचे गिफ्ट मिळेल हे निश्चित मानले जात होते पण त्यांचेचे नाव वगळले गेले. पडद्याआड जे काही व्हायचे ते झाले पण नंतर शिरसाट यांनी 'आपण नाराज आहोत पण याचा अर्थ पक्ष सोडून जाणार असा नाही' अशा प्रकरचा खुलासा केला. 


'प्रहार' चे बच्चू कडू मंत्रीपद सोडून शिंदे गटात सामील झाले पण त्यांचाही पत्ता कापला गेला. शब्द देवून मंत्रीपद न दिल्याने कडू हे नाराज झाले आणि त्यांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केलीच पण गर्भित इशाराही दिला. आणखी काही आमदार हळूच का होईना पण नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यातच 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील" फेम आमदार शहाजीबापू पाटील हे अचानक 'नॉट रिचेबल' झाले आणि वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. शपथविधी पार पडला आणि त्यानंतर बापूंचा फोन प्रतिसाद द्यायचा बंद झाला. सुरतपासून गुवाहाटीपर्यंत झालेल्या नाट्यात "नॉट रिचेबल" या शब्दाचा वारंवार उल्लेख होत राहिला होता. आणि आता शपथविधी सोहळा संपन्न होताच शहाजीबापू 'नॉट रिचेबल' झाले. त्यांच्या या 'नॉट रिचेबल' चा जो तो आपल्या पद्धतीने अर्थ काढू लागला आणि आपल्या कल्पनेप्रमाणे अंदाज बांधू लागला. 


शहाजीबापू हे एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेले पहिले आमदार असून त्यांनीही शिंदे यांचे मोठे समर्थन केले होते.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर बापूनी अनेकदा तोंडसुख घेवून शिवसेनेचा वाईटपणा घेतलेला आहे. त्यांना पहिल्या विस्तारात मंत्री केले जाईल असा अनेकांचा कयास होता पण तसे घडले नाही आणि शपथविधी होताच बापू नॉट रिचेबल झाले त्यामुळे ते नाराज आहेत अशा वावड्या उडायला सुरुवात झाली. (MLA Shahajibapu Patil is not upset) आज मात्र शहाजीबापू यांनी स्वत:च याचा खुलासा केला आहे. "आपला फोन "नॉट रिचेबल" नव्हता. तो लागला नसेल" असे सांगून त्यांनी हा विषय संपवला. "मुख्यमंत्री यांच्यासोबतची बैठक झाली आणि त्यानंतर शपथविधी सोहळ्याला गेलो तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण फोन बंद केला आणि गावाकडे निघून आलो. आपण नाराज नाही आणि नाराज असण्याचे काही कारणही नाही" असे त्यांनी सांगितले. 


यावेळी बोलताना त्यांनी संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना दिलेल्या मंत्रीपदाचे समर्थन केले. चौकशीनंतर संजय राठोड यांना पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे तर अब्दुल सत्तार यांची चौकशी होईल. त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले 



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !