BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ ऑग, २०२२

सरकार बदलले, आ. बबनदादा शिंदे यांची नियुक्ती रद्द !

 


सोलापूर : राज्यातील सरकार बदलल्याचा दृश्य परिणाम दिसू लागला असून माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांची ऊस नियंत्रण मंडळातील नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

 

राज्यातील सरकार बदलले की बरेच बदल पाहायला मिळत असतात. या बदलत केवळ अधिकारीच बदलेले जातात असे नाही तर सत्तेत असलेल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्याना देखील हटवले जात असते. महामंडळे, समित्या अशा सगळ्यातच हा बदल दिसून येत असतो. आधीच्या सरकारने केलेल्या अनेक नियुक्त्या रद्द करून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश केला जातो. अशाच प्रकारे महाविकास आघाडी सरकारने अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केल्या आहेत. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय स्थगित केले असून 'स्थगिती देणारे सरकार' अशी टीका देखील या सरकारवर होत आहे. त्यातच आता आधीच्या सरकारने केलेल्या नियुक्त्या देखील रद्द करण्यात येवू लागल्या आहेत. 


महाविकास आघाडीचे सरकार असताना करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांचा नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असून यात ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य आमदार बबनदादा शिंदे आणि शिवाजी पाटील यांच्या नियुक्त्या रद्द केल्या गेल्या आहेत.  (Appointment of MLA Babandada Shinde cancelled) मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ऊस नियंत्रण मंडळाच्या सदस्यपदी आ. बबनदादा शिंदे, शिवाजी पाटील चांदजकर यांच्यासह अन्य दहा जणांच्या नियुक्त्या रद्द केल्या गेल्या आहेत. 


महाविकास आघाडी सरकारच्या काळात ऊस नियंत्रण मंडळावर मे २०२१ रोजी शासनाने या नियुक्त्या केल्या होत्या. या मंडळात सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिनिधीच्या तीन सदस्यांत आ. बबनदादा शिंदे, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जवाहन सहकारी साखर कारखान्याचे प्रकाश आवाडे (आमदार), नांदेड येथील भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे संचालक एड. सुभाष कल्याणकर यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने केली होती. 


ऊस नियंत्रण मंडळात असलेल्या खाजगी साखर कारखान्याच्या दोन प्रतिनिधींची नियुक्ती देखील रद्द करण्यात आली आहे. यात सिद्धी शुगर लातूरचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव आणि नाशिक जिल्ह्यातील द्वारकाधीश साखर कारखान्याचे (शेवरे, ता. सटाणा) चेअरमन शंकर सावंत यांचा समावेश आहे. सदर मंडळात शेतकरी प्रतिनिधींचाही समावेश असतो. माढा तालुक्यातील शिवाजी पाटील चांदजकर यांच्यासह पंडित सारंग, बाळासाहेब पठारे, कृष्ण कोकरे, कृषिभूषण संजय माने यांच्याही नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


महाविकास आघाडीने केलेल्या नियुक्त्या रद्द करून शिंदे - फडणवीस सरकार आता आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी या जागांवर लावणार आहे. राज्यातील सरकार बदलल्याचा हा परिणाम असून कुठलेही सरकार आले की ते आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी अशा नियुक्त्या करीत असते. त्याचाच हा एक प्रकार असून अशा प्रकारच्या आणखी अनेक नियुक्त्या लवकरच रद्द होतील हे उघड आहे.    


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !