BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ ऑग, २०२२

जोडणी नाही, विजेचे बिल मात्र सुरूच !



पंढरपूर : विजेची जोडणी दिलेली नसतानाही वीज वापरल्याचे बिल मात्र सुरूच असल्याचा धक्कादायक आणि प्रचंड सावळागोंधळ असलेला प्रकार समोर आला असून वीज ग्राहकांत अजब कारभाराचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


अत्यंत अत्यावश्यक असलेल्या महावितरणच्या कारभारातील अनेक त्रुटी समोर येतात आणि वीज ग्राहकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. महावितरणच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करणाऱ्या अनेक घटना घडत असतात. चुकीची बिले देणे आणि त्याची दुरुस्ती वेळेत न करणे, 'आधी बिले भरा, मग दुरुस्तीचे पाहू' असे सांगितले जाणे, वीज पुरवठा खंडित होणे तसेच वेळेवर दुरुस्ती न होणे अशा अनेक तक्रारी सतत ऐकायला मिळत असतात. अव्वाच्या सव्वा बिले आकारण्याचे अनेक प्रकार राज्यात आजवर समोर आले आहेत. अवास्तव वीज बिले पाहून रुग्णालयात दाखल होण्याची देखील वेळ नुकतीच एका वीज ग्राहकांवर आलेली आहे. सातत्याने असे प्रकार घडत असतानाही त्यात कायमस्वरूपी सुधारणा झालेली कधीच दिसून येत नाही. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे तर अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


चुकीची वीज देयके येणे हे मानवी अथवा संगणकीय चुकीमुळे घडू शकते परंतु वीज जोडणी नसतानाही विजेची बिले येण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. असाच एक प्रकार पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे घडला आहे. या घटनेने महावितरणच्या कारभारावर नेमका प्रकाश टाकण्याचेच काम केले आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कृष्णा अवघडे याना अशा अनुभवाचा 'शॉक' बसला आहे. अवघडे यांनी २०१७ मध्ये एचव्हीडीएस योजनेंतर्गत स्वतंत्र १६ केव्हीए च्या ट्रान्सफॉर्मरसाठी कोटेशन भरले होते. त्यांना १४८८/३ गटासाठी तो मंजूरही झाला  आणि मार्च २०२० मध्ये हा ट्रान्सफॉर्मर त्यांच्या शेतात उभा देखील राहिला.. प्रत्यक्षात ट्रान्सफॉर्मरला  वीज पुरवठा करण्यात आलाच नाही. सदर ट्रान्सफॉर्मरला विजेचे कनेक्शन जोडून द्यावे म्हणून शेतकरी कृष्णा अवघडे यांनी महावितरण भोसे शाखेशी पत्रव्यवहार देखील केला होता. 


ट्रान्सफॉर्मरला विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून मागणी केली जात असताना ती जोडणी तर दिलीच नाही पण २० मे २०२० पासून या ट्रान्सफॉर्मरला विजेची जोडणी दिली असल्याचे दाखवत बिलाची आकारणी देखील करण्यात आली. या उलट्या आणि अजब कारभाराने शेतकरी अवघडे अस्वस्थ झाले असून परिसरात देखील या प्रकारची चर्चा सुरु आहे. शासन शेतकरी हिताच्या गप्पा मारते परंतु प्रत्यक्षात प्रशासनाकडून वेगळाच अनुभव येत असल्याचे दिसत आहे. वीज तर  नाहीच पण संबंध नसलेल्या गोष्टीशी झगडण्यातच शेतकऱ्याची ऊर्जा खर्च होऊ लागली आहे. सदर शेतकरी महावितरण अधीक्षक अभियंता यांच्यापर्यंत दाद मागत राहिले आहेत. अधीक्षक अभियंता पडळकर यांनी १७ मे २०२१ रोजी पंढरपूर विभागाच्या कार्यकारी अभियंता याना देखील ही जोडणी देण्याच्या सूचना दिल्या पण प्रत्यक्षात अजून ही जोडणी दिलीच नाही अशी अवघडे यांची तक्रार आहे. 


ट्रान्सफॉर्मर उभारला पण त्याला विजेची जोडणी दिलीच नाही, शेतकरी कृष्णा अवघडे याना मात्र  ३७ हजार ७७०  रुपयांचे वीज बिल देण्यात आले आहे. आता त्यांना या अकारण दिलेल्या बिलासाठी महावितरणकडे खेटे घालण्याची वेळ आली आहे. सदर बिल रद्द करून ट्रान्सफॉर्मरला विजेची जोडणी द्यावी अशी मागणी ते अजूनही करीत आहेत. एक अर्जाद्वारे त्यांनी पुन्हा ही मागणी केली असून त्यावर कारवाई न झाल्यास मात्र ग्राहक मंचाकडे दाद मागण्याच्या तयारीत अवघडे आहेत. २०१७ साली भरलेल्या कोटेशनवर २०२२ साल अर्धे झाले तरी शेतकरी विजेसाठी धावाधाव करीत आहेत असेच यावरून दिसत आहे.  (No electricity connection, but the bill continues) हा विलंब अक्षम्य असून संबंधित शाखा अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे महावितरणची बाजू समजू शकली नाही.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !